माझ्या हिश्श्याचे किस्से: ‘आनंद बक्षीं’नी मृत्यूच्या काही दिवस आधी हॉस्पिटलमधून लिहून दिली होती गाण्याची कडवी

0
3
माझ्या हिश्श्याचे किस्से:  ‘आनंद बक्षीं’नी मृत्यूच्या काही दिवस आधी हॉस्पिटलमधून लिहून दिली होती गाण्याची कडवी


रूमी जाफरी, चित्रपट लेखक-दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आनंद बक्षी

गेल्या आठवड्यात मी खय्याम साहेबांबद्दल लिहिले होते. या आठवड्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार आनंद बक्षी यांच्याबद्दल काही लिहावं, असा विचार मनात आला. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये त्यांच्याबद्दल काही सांगणार आहे.

मी बक्षी साहेबांसोबत सात चित्रपट केले आहेत. मी नेहमी म्युझिक सीटिंगला जायचाे. बक्षी साहेबांच्या सहवासात असणे, त्यांना ऐकणे, त्यांना गाणी लिहिताना पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. बक्षी साहेब माझ्याकडून सिगारेट घ्यायचे, ती न पेटवताच एका हातात धरून झुरका मारायचे अन् म्हणायचे, ‘रूमी, ही सगळ्यात वाईट आणि घातक गोष्ट आहे. तिच्यापासून दूर राहा, सोडून दे..’ मी नंतर सिगारेट सोडूनही दिली. कधी दिग्दर्शकाला अथवा संगीत दिग्दर्शकाला उशीर झाला असेल किंवा कधी मीच लवकर पोहोचलो असेन, तर त्यावेळी त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायचो. ते देखील माझ्यावर लहान भावासारखे, मुलासारखे, एका लेखकाप्रमाणे प्रेम करायचे. आमच्या घरातच शायरी होती आणि माझी ही पार्श्वभूमी त्यांना माहीत होती. त्यामुळे त्यांच्यासोबत गप्पाही खूूप रंगायच्या. त्या सगळ्याच गोष्टी इथे एका भागात लिहिता येणार नाहीत. पण, त्यातील काही सांगतो.

‘हम किसी से कम नहीं’मधील ‘ओ सपनों के सौदागर…’ या गाण्यातील हे दृश्य. याच गाण्याची कडवी आनंद बक्षी यांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवरून लिहिली होती.

बक्षी साहेबांची गाणी लिहिण्याची शैली फारच अनोखी होती. ते कधी हातातल्या न पेटलेल्या सिगारेटचे झुरके मारायचे अन् दुसऱ्या हाताच्या बोटांनी भुवयांच्या केसांशी खेळायचे, तर कधी एका हातात पेन घेऊन विचार करायचे. मग अगदी काही मिनिटांतच गाण्याचा मुखडा लिहायचे. त्या मुखड्याच्या हिशेबाने रदीफ आणि काफिया (मुखड्याचा शेवटचा शब्द आणि शेवटून दुसरा शब्द) लिहायचे. उदाहरण द्यायचे तर ‘आपकी कसम’मधील हे प्रसिद्ध गाणं घ्या.. ज़िन्दगी के सफर में गुज़र जाते हैं जो मुकाम, वो फिर नहीं आते… आता ‘मुकाम’ हा रदीफ, तर ‘वो फिर नहीं आते’ हा काफिया झाला. मग मुकाम या शब्दाला धरून शाम, सलाम, नाम.. असे जितके शब्द आहेत ते लिहून घेतले. मग त्यांनी किती सुंदरतेने क्रॉस लाइनमध्ये (जिला मुखडा जोडला जातो, ती अंतऱ्याची शेवटची ओळ) त्याचा वापर केला आहे. जसे… बाद में भेजो चाहे प्यार के हज़ारों सलाम, वो फिर नहीं आते। किंवा.. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते। किंवा.. एक बार चले जाते हैं वो दिन रात सुबह शाम, वो फिर नहीं आते। असे अनोखे कसब केवळ एखादा कुशल उस्तादच दाखवू शकतो.

बक्षी साहेबांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, ते गाण्यातच त्या चित्रपटाची कथा इतक्या सुंदरपणे अशी काही गुंफायचे की दुसऱ्या कोणाही गीतकाराला ते जमायचे नाही. काही दिग्दर्शक तर हेसुद्धा सांगायचे की, बक्षी साहेब आमच्या स्क्रिप्टमधल्या चुकाही गाण्यांतूून दुरूस्त करायचे. आपण दोन अंतरे मागितले तर ते दहा लिहून द्यायचे, जेणेकरून आपल्याला त्यातील सर्वोत्तम निवडण्याचा पर्याय मिळावा. बक्षी साहेबांचा उल्लेख करताना मला बशीर बद्र साहेबांचा एक शेर आठवतोय…

हम भी दरिया हैं

हमें अपना हुनर मालूम है,

जिस तरफ़ भी चल पड़ेंगे,

रास्ता हो जायेगा।

बक्षी साहेब आपल्या कामाशी कमालीचे बांधील होते, ते त्यावर खूप जीव लावायचे. मला चांगलं आठवतंय, माझा “हम किसी से कम नहीं’ हा चित्रपट ३१ मे २००२ ला प्रदर्शित झाला होता. अजय देवगण आणि ऐश्वर्याचं एक गाणं शिल्लक होतं. या दोघांसह नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांची तारीख ठरलेली होती. बक्षी साहेबांनी गाण्याचा मुखडाही लिहून दिला होता. पण अचानक त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. सगळेच चिंतेत पडले.. आता काय करायचे? गाण्याची कडवी कुठून आणायची? निर्माते अफजल खान त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. तिथून आल्यावर मला सांगितले की, बक्षी साहेबांनी हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवरुनच गाण्याची कडवी लिहून दिली. आम्हा साऱ्यांना याचे खूप आश्चर्य वाटले. बक्षी साहेबांची उत्कटता ही अशी होती. ३० मार्चला हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले.

गाणे रेकाॅर्ड झाले, पण त्यांना ऐकवू शकलो नाही. ते आम्हा सर्वांना सोडून गेले होते. स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू होते. ऋषी कपूर माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि म्हणाले, “रूमी, मला माझं पहिलं हिट गाणं देणारा, ‘मैं शायर तो नहीं..’ म्हणणारा शायर गेला..’ बक्षी साहेबांच्या आठवणीत ‘हम किसी से कम नहीं’मधील ते गाणं, ज्याची कडवी त्यांनी रुग्णशय्येवर असताना लिहिली होती, ते जरुर ऐका…

ओ सपनों के सौदागर,

एक सपना दे दे,

सपना लेना है तो,

दिल अपना दे दे।

स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link