माझ्या हिश्श्याचे किस्से: राजेश खन्नांची नेकी, सुरिंदर कपूरांचा प्रामाणिकपणा!

0
13
माझ्या हिश्श्याचे किस्से:  राजेश खन्नांची नेकी, सुरिंदर कपूरांचा प्रामाणिकपणा!


रूमी जाफरी, लेखक।दिग्दर्शक10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘शहज़ादा’च्या एका दृश्यात राजेश खन्ना.

गेल्या आठवड्याचा कॉलम मी निर्माता बोनी कपूर यांच्यावर लिहिला होता. मला अनेक लोकांचे कॉल आणि मेसेज आले की, आता तुम्ही बोनी कपूर यांचे वडील सुरिंदर कपूर यांच्यावरही लिहिलं पाहिजे. त्यामुळं आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये सुरिंदर कपूर यांच्याविषयी…

सुरिंदरजींबाबत मी बोनी साहेबांकडून खूप किस्से, गोष्टी ऐकल्या आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व स्वयंभू होते. एका मोठ्या निर्मात्याआधी ते एक मोठा माणूस होते. त्यांचा किती मान होता, याविषयीचा एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे.

सुरिंदरजींंनी बनवलेला “श्रीमान श्रीमती’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यानंतर त्यांनी राजेश खन्नांना साइन केले होते. त्या काळात राजेश खन्ना स्टार होते आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. त्यावेळी प्रोड्यूसर कौन्सिलने, कोणताही नायक एकावेळी ६ पेक्षा जास्त चित्रपट करणार नाही, अशी मर्यादा घातली होती. त्यामुळे राजेश खन्नांंचे सेक्रेटरी गुरनाम यांनी सुरिंदरजींंच्या चित्रपटाचा करार रद्द केला. त्यामुळे सुरिंदरजींंना टेन्शन आले. त्यांनी राजेश खन्नांशी संपर्क साधला. राजेश खन्नांंनी गुरनामला विचारले की, तू हा चित्रपट का कॅन्सल केलास‌? गुरनामने उत्तर दिले की, सुरिंदरजींचा ‘श्रीमान-श्रीमती’ फ्लाॅप झालाय आणि त्यांच्यावर पैशांबाबत २०-२५ केस सुरू आहेत. मग पैशांशिवाय ते पुढचा चित्रपट कसा बनवतील?’ राजेश खन्ना म्हणाले, “ते तुझे काम नाही, मला लाँग जॉनवर विश्वास आहे. ते बनवतील.’

शम्मी कपूर हे सुरिंदरजींच्या खास मित्रांपैकी एक होते, ते सुरिंदरजींंना ‘लाँग जॉन’ म्हणायचे. त्यामुळे राजेश खन्नाही त्यांना लाँग जॉन असेच संबोधायचे. असो. गुरनाम तेथून निघून गेले आणि त्यांनी सुरिंदरजींंना मुद्दामहून शनिवारी रात्री फोन केला आणि म्हणाले, ‘काकाजींना उद्या रोख ५० हजार रूपये पाहिजेत.’ हे ऐकून सुरिंदरजींंची झोपच उडाली. त्यांना टेन्शन आले. सकाळी उठल्यावर त्यांनी आपला मुलगा बोनी यांना गाडी काढायला सांगितली. बोनी साहेबांनी मला सांगितले.. मी गाडी चालवत होतो, डॅड खूप टेन्शनमध्ये होते. ते वाटेत एकही शब्दही बोलले नाहीत. थेट आपल्या फायनान्सरच्या घरी गेले. मला म्हणाले, तू बाहेरच बस, मी आलोच. ते फायनान्सरही डॅडचा खूप आदर करत होते. आत जाऊन त्यांनी सांगितले की, आज मला राजेश खन्नांना ५० हजार रूपये रोख द्यायचेत. फायनान्सर म्हणाले, सुरिंदरजी, कमाल आहे तुमची. तुम्हाला मी कधी ना म्हटले आहे का? फायनान्सरने त्यांच्या पत्नीला सांगितले आणि त्यांनी ५० हजार आणून दिले.

बोनी साहेब मला पुढे सांगत होते.. डॅड आत गेले तेव्हा टेन्शनमध्ये होते आणि परत आले तेव्हा खूपच उत्साहित होते. त्यांची चाल बदलली होती. ते आले आणि म्हणाले, “चल, आता राजेश खन्नांच्या बंगल्यावर.’ मी थेट गाडी घेऊन राजेश खन्नांंच्या बंगल्यावर पोहोचलो. तेथेही ते म्हणाले की, तू इथेच थांब, मी येतो. मी तेथेच बसलो आणि डॅड राजेश खन्नांंना पैसे देण्यासाठी आत गेले. डॅडनी राजेश खन्नांना ५० हजार रूपये दिल्यावर ते म्हणाले, ‘लाँग जॉन, हे ५० हजार कसले?’ डॅड म्हणाले, ‘रात्री मला गुरनामचा फोन आला होता की तुम्ही ५० हजार रोख मागितलेत. म्हणून मी घेऊन आलो.’ हे ऐकल्यावर राजेश खन्नांंनी गुरनामला फोन केला आिण लगेच यायला सांगितले.

बोनीजींनी सांगितले.. मी बाहेर बसलो होतो. तेवढ्यात एक फियाट येऊन थांबली. त्यातून उतरून गुरनाम पटकन् आत गेले. राजेश खन्नाजींनी त्यांना थेट विचारले, ‘कुणाच्या सांगण्यावरुन तू हे ५० हजार मागितले? आणि का मागितले?’ गुरनाम म्हणाला, ‘मी यांची परीक्षा घेत होतो की रविवार असूनही ५० हजार रूपये आणू शकले हेे चित्रपट बनवू शकतात, याची मला खात्री पटेल.’ हे एेकून राजेश खन्ना खूप नाराज झाले. ते गुरनामला म्हणाले की, तू लाँग जॉनची टेस्ट घेण्याची हिंमतच कशी केली? मी हा चित्रपट करेन असे सांगितले असतानाही तू अशी टेस्ट कशी काय घेतली? मग राजेश खन्नांनी सुरिंदरजींना ५० हजार परत केले आणि म्हणाले की, मी चित्रपट करणार आहे. एकवेळ दुसऱ्याचा चित्रपट कट करेन, पण तुमचा नक्की पूर्ण करेन. काही दिवसांतच या चित्रपटाचे काम सुरू झाले.

आता शूटिंग सुरू झाले होते. सुरिंदरजी राजेश खन्नांना म्हणत होते की तुमचे पैसे घ्या. राजेश खन्ना सांगत होते, पैसे कुठे जाणार आहेत लाँग जाॅन? गरज असेल तेव्हा घेईन. चित्रपट पूर्ण झाला, पण राजेश खन्नांनी सुरिंदरजींकडून पैसे घेतले नाहीत. चित्रपटाचा शेवटचा दिवस होता. डबिंगही पूर्ण झाले. काकाजींनी सुरिंदरजींना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, तुमचा चित्रपट पूर्ण झालाय आणि माझे कामही संपले आहे. सुरिंदरजी त्यांना म्हणाले, तुमचे मानधन तर घ्या. त्यावर काकाजी म्हणाले, घरी जाऊन बोलूयात. सुरिंदरजी राजेश खन्नांच्या घरी आले. त्यांना खूप टेन्शन आले होते, कारण आता राजेश खन्ना सुपरस्टार झाले होत. त्यांना सुपरस्टार बनवणाऱ्या शक्ती सामंत यांच्यासोबत राजेश खन्नांनी नुकताच ‘अमरप्रेम’ चित्रपट सुरू केला होता आणि त्यासाठी त्यांंनी १० लाख रुपये मानधन घेतले होते. आता त्यांनी मलाही १० लाख मागितले तर काय करायचं, या विचाराने सुरिंंदरजी उदास झाले होते. ते पुन्हा म्हणाले की, तुम्ही तुमचे मानधन किती ते सांगा. त्यावर राजेश खन्नांंनी त्यांनाच विचारले, ‘तुम्ही सांगा, माझे मानधन किती असावे?’ सुरिंदरजी म्हणाले, ‘मी कसे सांगू? तुम्हीच सांगा, मी किती पैसे दिले पाहिजेत?’ राजेश खन्ना म्हणाले, हे बघा लाँग जॉन, तुमचे डबिंग संपले आहे आणि माझे कामही संपले आहे. आता तुम्ही जी रक्कम द्याल, ती मला घ्यावी लागेल. सुरिंदरजी म्हणाले, ‘नाही. मला याचा कोणताही फायदा घ्यायचा नाही. तुम्ही मागाल ती रक्कम मी तुम्हाला देईन.’ काकाजी म्हणाले, ‘ठीक आहे. एक गोष्ट सांगा, तुम्ही बजेट तयार करताना माझ्यासाठी काही रक्कम लिहिली असेल..’ यावर सुरिंदरजी म्हणाले की, मी तुमचे बजेट चार लाख लिहिले होते आणि प्रश्नचिन्ह लावून साडेचार लाख रुपये. राजेश खन्ना क्षणभर विचार करत म्हणाले, ‘ठीक आहे लाँग जॉन, तुमच्यासाठी माझे मानधन ४ लाख रुपयेे.’ हे ऐकून सुरिंदरजी रिलॅक्स झाले. म्हणाले, “ठीक आहे, मी तुम्हाला पैसे आणून देतो.’ त्यावर काकाजी म्हणाले, ‘पाच हजार तुम्ही चित्रपट सुरू होण्यापूर्वी दिले आहेत. आता उरले ३ लाख ९५ हजार. ते आताच देऊ नका. मला गरज असेल तेव्हा मी मागून घेईन.’

सुरिंदरजींना पुन्हा टेन्शन आले. त्यांना वाटले, राजेश खन्ना पैसे मागतील तेव्हा माझ्याकडे नसतील तर काय करायचे? मग त्यांनी ३ लाख ९५ हजार रुपये शक्ती सामंत यांना दिले आणि म्हणाले की, हे तुमच्याकडे अनामत ठेवा. राजेश खन्ना मला त्यासाठी फोन करतील, तेव्हा मी तुम्हाला फोन करेन. तुम्ही त्यांना हे पैसे द्या. तर असे होते भले लोक. राजेश खन्नांनी आपला मोठेपणा दाखवला आणि सुरिंदरजींनीही असा प्रामाणिकपणा जपला. यावरून ज़हीर देहलवींचा एक शेर आठवतोय…

ख़ैर से रहता है

रौशन नाम-ए-नेक

हश्र तक जलता है

नेकी का चराग़

राजेश खन्नांंनी सुरिंदरजींकडे तीन वर्षे पैसे मागितले नाहीत. एकदा त्यांंचे सीए रोशनलाल मल्होत्रांचा फोन आला की, इन्कम टॅक्सचा काही क्लेम आहे, त्यासाठी त्यांना ३ लाख ९५ हजार रुपयांची गरज आहे. सुरिंदरजींंनी सांगितले की, हे पैसे तर तीन वर्षांपासून शक्ती सामंत यांच्याकडे आहेत. त्यानंतर हे पेमेंट झाले. सुरिंदरजींनी राजेश खन्नांसोबत बनवलेल्या त्या चित्रपटाचे नाव होते “शहज़ादा’. याच चित्रपटातील हे गाणे ऐका…

ठोकर में है मेरी

सारा ज़माना,

बहारो से पूछो

मेरी कहानी।

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link