माझ्या हिश्श्याचे किस्से: सचिन भौमिक यांनी मेहमूदसोबत जिंकली होती पैज, पंचमदांनी केली मदत

0
14
माझ्या हिश्श्याचे किस्से:  सचिन भौमिक यांनी मेहमूदसोबत जिंकली होती पैज, पंचमदांनी केली मदत


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Article By Rumi Jafari Coloumn | Sachin Bhowmik Had Won The Bet With Mehmood, Helped By Panchmad

रूमी जाफरी | बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

 पंचमदांसोबत सचिन भौमिक.

आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये सचिन भौमिक यांच्याबद्दल.. लोक त्यांना आदराने अन् प्रेमाने सचिनदा किंवा दादा म्हणत. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत हिट चित्रपटांची कथा लिहिणाऱ्या लेखकांची यादी केली, तर दादा त्यातील टॉप ४-५ लेखकांमध्ये होते. माझे त्यांच्याशी खूप घनिष्ट संबंध होते. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे.

दादांनी मला सांगितले होते की, मुंबईत आल्यावर सुरुवातीला त्यांनी मोहन सहगल यांच्याकडे लेखन विभागात नोकरी सुरू केली होती. सुटीच्या दिवशी किंवा काम संपल्यावर ते लोकांना भेटून आपल्या कथा ऐकवायचे. अशातच हृषिकेश मुखर्जींंना त्यांची एक कथा आवडली. त्या वेळी ते ‘मुसाफिर’ सिनेमाचे काम संपवत होते. ते म्हणाले, ‘सचिन, मला तुझी कथा आवडली, मी त्यावर चित्रपट बनवेन.’ पण, त्यानंतर त्यांनी “अनाडी’ सुरू केला. तेव्हा दादा हृषिकेश मुखर्जींकडे गेले आणि विचारले, ‘तुम्हाला माझे कथानक आवडलंय, मग तुम्ही दुसऱ्या कहाणीवर का काम सुरू केलं? ऋषीदा हसले आणि म्हणाले, अनाडी सुपरहिट झाला आणि चालला, तर मी तुझे कथानक नक्की करेन, हे माझे वचन आहे.’

अनाडी हिट झाला तेव्हा दादा ऋषीदांकडे गेले आणि म्हणाले, ‘तुम्ही मला वचन दिले होते. आता तुमचा सिनेमा हिट झालाय. मीसुद्धा तुमच्या या सिनेमासाठी प्रार्थना केली होती. आता तुम्ही माझ्या कथानकावर सिनेमा बनवा. मी मोहन सहगल यांच्या “लाजवंती’ची कथा लिहिली होती, त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ऋषीदा तयार झाले. कथानकही चांगले होते आणि त्यांनी सचिनदांच्या कथानकावर “अनुराधा’ हा सिनेमा बनवला. तो फारसा चालला नाही, पण त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दरम्यान, दादांनी आणखी एका कथानकाची संकल्पना ऋषीदांना ऐकवली होती. ऋषीदांनी त्यावरही “छाया’ नावाचा सिनेमा बनवला. त्यातील भूमिकेसाठी निरूपा रॉय यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सचिनदांनी विचार केला की, आपल्या तिन्ही कथांना पुरस्कार मिळाल्याने आता आपलं करिअर नक्की उभारी घेईल.

सचिनदा सांगत होते… जेव्हा ते एखाद्याला भेटून सांगायचे की, मी ‘लाजवंती’, ‘अनुराधा’ आणि ‘छाया’ या सिनेमांचे लेखन केले आहे, या सिनेमांना २ राष्ट्रीय पुरस्कार, १ फिल्मफेअर मिळाला आहे, तेव्हा निर्माते-दिग्दर्शक म्हणायचे की आम्हाला पुरस्कार नको, पैसा हवा. हिटची ट्रॉफी नको, सुपरहिटचा टॅग पाहिजे. मग आपण या तीन सिनेमांच्या कथा लिहिल्याचे सांगणेच मी बंद केले. त्याउलट, आपण अजून नवीन आहोत, एकही कथानक लिहिलेले नाही आणि ब्रेक मिळण्याच्या शोधात आहे, असे सांगू लागलो. मग मला ‘आयी मिलन की बेला” आणि “जिद्दी” हे सिनेमे मिळाले आणि ते सुपरहिट झाले. त्यानंतर सचिनदांकडे कामाची रांग लागली. एकापाठोपाठ एक जेवढे हिट फिल्ममेकर होते, त्या सर्वांसाठी दादांनी स्क्रिप्ट लिहिल्या. आणि ‘आराधना’च्या नंतर तर सचिनदांच्या स्क्रिप्टमधून इंडस्ट्रीला राजेश खन्नांच्या रूपाने पहिला सुपरस्टार मिळाला. त्यानंतर त्यांनी शक्ती सामंत, सोहनलाल कंवर यांच्यासाठीही कथा लिहिल्या.

सचिनदांचा मला बराच सहवास लाभला. त्यांनी मला अनेक किस्से सांगितले. त्यातील एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतो तो असा- तेव्हा मेहमूद सुपरस्टार होते, हीरोपेक्षाही मोठे होते. सचिनदांचा एक मित्र अमेरिकेहून आला होता आणि त्याने सचिनदांंना एक झिप्पो लायटर भेट दिला होता. सचिनदांनी सांगितले की, असा लायटर आम्ही फक्त काऊबॉय सिनेमांत पाहिला होता. मी तो लायटर शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जायचो. सेटवर अगदी स्टाइलमध्ये बसून त्या झिप्पो लायटरने सिगारेट पेटवायचो. उद्देश हाच की, आपल्याकडं हे लायटर आहे हे सगळ्यांना दिसावं. मग लोक तो लायटर हातात घेऊन बघायचे. मेहमूद यांनी तो बघितला आणि आपल्या खिशात ठेवला. सचिनदांनी तो मागितला, तर मेहमूद म्हणाले की, आता लायटर माझा झाला. दादांना वाटलं, मेहमूद मस्करी करताहेत.

दादा पुढं सांगत होते.. मग लंच ब्रेक झाल्यावर मी मेहमूदकडे गेलो आणि म्हणालो की, मला माझा लायटर द्या. तर ते म्हणाले, माचिस वापरा, लायटर माझा झाला आहे. दादा गप्प बसले. मग पॅकअप झाल्यावर पुन्हा मेहमूदकडे गेले. ते आपल्या गाडीत बसले होते. त्यांना म्हणाले, ‘मला माझं लायटर द्या, ही माझ्या मित्राची निशाणी आहे. त्याने मला दिलंय.’ त्यावर, ‘लायटर तर माझा झाला..’ असं म्हणत ते गाडीतून निघून गेले. दादा म्हणाले, मला खूप वाईट वाटलं, कारण मला लायटर आवडला होता आणि ती माझ्या मित्राची िनशाणी होती. मी घरी आलो आणि मेहमूदना फोन केला. म्हणालो, ‘प्लीज, मला माझा लायटर परत करा.’ मेहमूद म्हणाले, “मी देणार नाही सचिन..’ त्यावर दादा बोलले, ‘आता मी पण परत घेऊनच दाखवेन!’ मेहमूद म्हणाले, “चला, लागली पैज! तो परत घेऊन दाखवला, तर तुम्हाला मानलं. आत्ता माझ्याकडं वेळ नाही, मी एका पार्टीला चाललोय. उद्या शूटिंगच्या ठिकाणी बोलू..’ एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला.

दादा पुढं म्हणाले… मला एक कल्पना सुचली. मी थेट आर. डी. बर्मन (पंचमदा) यांच्याकडे गेलो. त्यांनी विचारलं, “अरे सचिन, एवढ्या रात्री कसा काय?’ मी त्यांना सांगितलं, ‘मेहमूदनी माझा लायटर घेतलाय आणि ते पार्टीला गेले आहेत. मला शंभर टक्के खात्री आहे की त्यांनी लायटर आपल्या बेडरूममध्ये ठेवला असणार. ते नसताना त्यांच्या बेडरूममध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवेश करू शकते आणि ती म्हणजे तुम्ही. कारण तुम्ही त्यांचे सर्वात चांगले मित्र आहात. प्लीज चला अन् मला माझा लायटर आणून द्या.” मग पंचमदांना बळेबळेच आपल्या गाडीत बसवून सचिनदा मेहमूद यांच्या बंगल्यावर गेले.

तिथला नोकर म्हणाला, “साहेब तर नाहीत..’ पंचमदा म्हणाले, ‘हो, मला माहितेय, चल, आत जाऊ..’ आम्ही आत बेडरूममध्ये गेलो आणि पाहिलं तर तिथं टेबलवर लायटर ठेवला होता. पंचमदांनी तो उचलून मला दिला. आम्ही परत आलो. दुसऱ्या दिवशी मी शूटिंगच्या ठिकाणी गेलो तेव्हा मेहमूद माझ्याकडं बघून हसत म्हणाले, ‘काय? मी म्हणालो होतो ना, लायटर मिळणार नाही..’ मग मी लायटर काढला अन् हसत हसत सिगारेट शिलगावली. मेहमूद बघतच राहिले. म्हणाले, ‘तुझ्याकडं कुठून आला?’ मी म्हणालो, ‘मी सांगितलं होतं ना की परत घेईनच! मी रात्री पंचमदांना घेऊन तुमच्या बंगल्यावर गेलो अन् लायटर घेऊन आलो.’ मेहमूद यांचा चेहरा रागाने लाल झाला. मला तर वाटलं की, आता ते माझ्याशी एक शब्दही बोलणारही नाहीत. पण, नंतर ते हसले अन् ‘सचिन, मानलं तुम्हाला!’ असं म्हणत मला मिठी मारली. सचिनदांच्या या किश्श्यावरून अहमद फ़राज़ यांचा एक शेर आठवतोय… अगर तुम्हारी अना का है सवाल तो फिर चलो मैं हाथ बढ़ता हूँ दोस्ती के लिए। सचिनदांचे अनेक मोठे किस्से आहेत. पुढे ऋषिकेश मुखर्जींंनीही सचिनदांकडून ‘गोलमाल’, ‘बेमिसाल’, “किसी से ना कहना’ अशा अनेक सिनेमांच्या कथा लिहून घेतल्या. दादांनी राकेश रोशन, सुभाष घई, सोहनलाल कुंवर, मोहन कुमारी, शक्ती सामंंत अशा सगळ्या मोठ्या निर्मात्यांसाठी चित्रपट लिहिले. मी त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खूप संस्मरणीय आहे. सचिनदांंच्या आठवणीत, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजा रानी’मधील हे गाणे ऐका… शहरों की गलियों में जब अंधेरा होता है आधी रात के बाद एक चोर निकलता है। काली सी सड़क पे ये आवाज़ आती है चोर-चोर चोर-चोर चोर-चोर चोर-चोर… स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. —



Source link