माझ्या हिश्श्याचे किस्से: माधुरी दीक्षित : ‘अंजाम’ चित्रपटातील ते अवघड गाणे वन शॉटमध्ये पूर्ण केले होते

0
24
माझ्या हिश्श्याचे किस्से: माधुरी दीक्षित : ‘अंजाम’ चित्रपटातील ते अवघड गाणे वन शॉटमध्ये पूर्ण केले होते


  • Marathi News
  • Opinion
  • Madhuri Dixit That Difficult Song In The Movie Anjaam Was Completed In One Shot |Rumi Jaffrey Bollywood Films Divya Marathi Rasik Supplement

रूमी जाफरी8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राहुलजी म्हणाले, केवळ माधुरी दीक्षितच हे गाणं एकाच शॉटमध्ये चित्रित करू शकेल. माधुरीजींनाही या गाण्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आणि त्यांनी त्यासाठी होकार दिला. त्यापूर्वी केवळ ‘आराधना’मधील ‘रूप तेरा मस्ताना..’ हे गाणे असेच एका शॉटमध्ये चित्रित झाले होते.

काही दिवसांपूर्वी ‘गणपत’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी बऱ्याच काळानंतर माझी माधुरी दीक्षित यांच्याशी भेट झाली. त्या वेळी गप्पा मारताना ‘अंजाम’ चित्रपट तयार झाला, त्याला जवळपास तीस वर्षे झाल्याची आठवण निघाली. ‘बडे मियां छोटे मियां’ प्रदर्शित होऊन पंचवीस वर्षे उलटली. मी माधुरीजींना म्हणालो, इतक्या वर्षांनंतरही तुमच्यामध्ये काहीच बदल झाल्यासारखे जाणवत नाही. त्या वेळी ‘अंजाम’च्या सेटवर, ‘बडे मियां छोटे मियां’च्या सेटवर ज्या माधुरी दीक्षित होत्या, त्याच आजही तशाच आहेत, असं तुमच्याशी बोलताना वाटतंय. माझ्या या बोलण्यावर माधुरी यांनी स्मितहास्य केले. असो. त्यानंतर मी घरी आलो आणि तेव्हापासून मला काही किस्से आठवू लागले. त्यापैकी काही खास किस्से तुम्हाला सांगायला हवेत असं मला वाटू लागलं. तर माझ्या हिश्श्याच्या आजच्या किश्श्यांमध्ये माधुरी दीक्षित यांच्याविषयी बोलूया… मला आजही आठवते की, जेव्हा दिग्दर्शक राहुल रवैल यांनी पहिल्यांदा माझी माधुरी दीक्षित यांच्याशी भेट घालून दिली होती त्या वेळी त्या आश्चर्याने म्हणाल्या होत्या, ‘हे लेखक आहेत..? मला वाटले हे चित्रपटात माझ्या पतीची भूमिका करणार आहेत..’ वास्तविक चित्रपटात ही भूमिका दीपक तिजोरींनी केली होती. पण, माझ्याबाबतीत माधुरीजींचा असा समज होण्यात नवं असं काही नव्हतं. कारण माझा चेहरा आणि वय पाहून अनेकांना मी लेखक नव्हे, तर अभिनेता वाटायचो. आणि मी नाटकांमध्ये कामे केलीही होती… असो.

चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, त्यादरम्यान माधुरी यांच्याशी माझ्या भेटीगाठी होत राहिल्या. अनेकदा सिनेमातील दृश्यांवर चर्चा करण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरीदेखील जाणे झाले. या भेटीगाठींतून माझ्या लक्षात आले की, माधुरीजी एवढ्या मोठ्या सुपरस्टार असल्या, तरी व्यक्तिगत आयुष्यात खूप साध्या आहेत. सेटवरही त्या खूप साधेपणाने वावरायच्या. त्यांच्यासोबत काम करताना त्या एक सुपरस्टार आहेत हे कधीही जाणवायचे नाही. आणि त्यांनीही कधी तसे जाणवू दिले नाही. ‘अंजाम’ हा एक अॅक्शनपट होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दाखवला होता. मला आठवतंय की, पप्पू वर्मा यांच्या फार्महाऊसवर या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आणि माधुरीजींनी राहुलजींच्या सांगण्यावरून वीस फूट उंचीवरून उडी मारली. त्याचप्रमाणे टिनू आनंद यांचे हात कापण्याच्या प्रसंगासारखी कठीण दृश्ये चित्रित करण्याला माधुरी यांनी कधीही नकार दिला नाही. त्या प्रत्येक काम खूप मन लावून, समरसून करायच्या. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, माधुरी या भारतातील अशा मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, पण चांगल्या नृत्यांगनाही आहेत. या सिनेमातील एक गाणे ध्वनिमुद्रित झाले होते आणि ते पिक्चराइज कसे करायचे याचा सगळे जण विचार करीत होते. त्या वेळी राहुलजींच्या मनात विचार आला की, हे संपूर्ण गाणे एकाच शॉटमध्ये चित्रित केले तर..? सिनेमाच्या संपूर्ण क्रूला ही कल्पना आवडली, त्यांच्यात उत्साह निर्माण झाला. पण, ही गोष्ट तितकीच अवघड असल्यामुळे ती कशी होईल याची प्रत्येकाला धास्तीही होती. त्या वेळी राहुलजी म्हणाले, केवळ माधुरी दीक्षितच हे गाणं एकाच शॉटमध्ये चित्रित करू शकेल. माधुरीजींना हे कळल्यावर त्यांनाही त्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आणि त्यांनी या गाण्यासाठी होकार दिला. त्यापूर्वी केवळ ‘आराधना’ चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना..’ हे गाणे असेच एका शॉटमध्ये चित्रित झाले होते. मात्र, त्या गाण्यात नृत्य किंवा फारशा हालचाली नव्हत्या.

माधुरीजींनी होकार दिल्यानंतर सरोज खान यांनी कोरिओग्राफी सुरू केली आणि रिहर्सल सुरू झाल्या. इकडे राहुलजींनी मेहबूब स्टुडिओमध्ये एक मोठा सेट लावला. त्या वेळी नव्यानेच स्टेडीकॅम आला होता. त्याच्या साहाय्याने राहुलजींनी पूर्ण गाणे कंपोज केले. कारण गाण्यामध्ये केवळ उभ्या उभ्या नृत्य करायचे नव्हते, तर गाण्यात अनेक हालचाली होत्या. तो ३६० अंशात फिरवायचा होता, माधुरी यांच्या जवळ आणि लांबही न्यायचा होता. माधुरी शाहरुख खानच्या जवळ जातात, त्यांची व्हीलचेअर फिरवतात, त्यांच्या कुशीत विसावतात.. असे इतक्या हालचाली असलेले हे गाणे होते, जे एका शॉटमध्ये पूर्ण करण्याचा विचारही कुणी करू शकत नव्हते. खरे तर हा सगळ्यांसाठीच एक अनोखा आणि आयुष्यभर आठवणीत राहील असा अनुभव होता. त्यामुळे मीसुद्धा पूर्णवेळ सेटवर उपस्थित होतो. जेव्हा म्युझिक सुरू झाले आणि ‘अॅक्शन’ म्हटलं गेलं तेव्हा माधुरी यांनी नृत्य सुरू केले. राहुलजी, मी आणि इतर सगळे लोक कॅमेऱ्याच्या मागे होतो. कॅमेरा जिथे जिथे जात होता, तिथे तिथे आम्ही त्याच्या मागे पळत होतो. संपूर्ण शॉट चित्रित झाला अन् आमच्या अंगावर शहारे उभे राहिले. जेव्हा ‘कट’ म्हटलं गेलं तेव्हा एक परिपूर्ण शॉट चित्रित झालेला होता. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

राहुलजींनी शॉट ओके केला होता. शॉट चांगला झाला असल्याबाबत सर्वांनाच खात्री होती. पण, खबरदारी म्हणून आणखी एक टेक घ्यायला हवा, असे अनेकांचे मत होते. मात्र, राहुलजी आणि सरोजजी याबाबतीत इतके कॉन्फिडंट होते की त्यांनी एकापेक्षा जास्त टेक घेतले नाहीत. हे गाणे चित्रित होताना पाहणे हा एक अनोखा अनुभव होता. कारण एखादे गाणे तयार होण्यासाठी काही आठवडेही लागतात. मग ते एडिट होते. त्यानंतरच ते गाणे बघता येते. पण, इथे हे गाणे एडिट करण्याची गरजच नव्हती. दुसऱ्या दिवशी माधुरी यांच्यासह राहुलजी, मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून राजेंद्रकुमार यांच्या स्टुडिओमध्ये हे गाणे बघितले. माधुरीजींच्या त्यावेळच्या स्मितहास्यावरून फिराख गोरखपुरी यांचा एक शेर आठवतोय…
दिलों को तेरे तबस्सुम की याद यूं आई
कि जगमगा उठें जिस तरह मंदिरों में चराग़

त्या काळात सामान्य लोकांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेवढे कलाकार, निर्माते, लेखक, दिग्दर्शक होते, ते सर्वच जण माधुरीजींचे चाहते होते आणि सगळ्यांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. जेव्हा मी ‘बडे मियां छोटे मियां’ची कथा लिहीत होतो तेव्हा मला एक आयडिया सुचली. अमिताभजी आणि गोविंदा यांच्या व्यक्तिरेखा या उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या दोन चोरांच्या आहेत. बहुतांश लोकांना सिनेमाचे वेड असते. अनेक जण हिरोइनच्या प्रेमात पडतात. हीच गोष्ट मी त्या कथेत लिहिली की, हे दोघे मुंबईत येतात आणि माधुरीला शूटिंग करत असताना पाहतात आणि तेसुद्धा तिच्या प्रेमात पडतात. माधुरी त्यांना रागावून हाकलून देते. हा प्रसंग लिहून झाल्यावर मी तो माधुरीजींचे सेक्रेटरी राकेशनाथ यांना ऐकवला. तेव्हा ते म्हणाले की, मी माधुरीजींशी याविषयी बोलेन, पण खात्री आहे की त्या हे काम करणार नाहीत. पण, माधुरीजींनी होकार दिला. आम्ही या विचारात पडलो होतो की, माधुरीजींनी नकार दिला तर त्यांच्या जागी कुणाला घ्यायचे? कारण या व्यक्तिरेखेसाठी दुसरा काही पर्यायच नव्हता.
‘अंजाम’मधील माधुरीजींचे वन शॉटमध्ये चित्रित करण्यात आलेले ते गाणे ऐका..
बरसों के बाद आई मुझको याद एक बात
तेरे बिन नहीं गुजरे दिन, तेरे बिन नहीं गुजरे रात…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदात राहा.

(रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link