भारतीयांचा आभासी चलनाकडे ओढा वाढतोय का?

0
7
भारतीयांचा आभासी चलनाकडे ओढा वाढतोय का?



बिटकॉईन या आभासी चलनाचे मूल्य १ लाख २३ हजार डॉलरवर पोहोचले आहे. यातून जागतिक पातळीवर क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनाला वाढलेली मागणी समोर येत आहे. याच वेळी भारतातही आभासी चलन गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात तरुणाईचे प्रमाण पहिल्यापासून अधिक आहे. देशातील गुंतवणुकीच्या मुख्य प्रवाहात आभासी चलनाचा समावेश होऊ लागल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. हे देशात आभासी चलनाची एक परिसंस्था विकसित होत असल्याचे निदर्शक आहे. याच वेळी भारतीय गुंतवणूकदार केवळ एकाच प्रकारच्या आभासी चलनात गुंतवणूक करण्याऐवजी त्यात वैविध्य आणत आहेत. त्यातून त्यांचा परतावाही वाढल्याचे दिसून कॉईनस्वीच या आभासी चलन मंचाच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.

शहरनिहाय स्थिती काय?

आभासी चलन वापरणाऱ्या २ कोटी ग्राहकांच्या माहितीच्या आधारे दुसऱ्या तिमाहीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातून देशातील आभासी चलन गुंतवणुकीत होणारे मोठे बदल, शहरनिहाय होणारी कमीजास्त गुंतवणूक, जास्त परतावा मिळविणारी शहरे, गुंतवणूकदारांचा स्वभाव आदी बाबी समोर आल्या आहेत. देशातील एकूण आभासी चलन गुंतवणुकीत तीन महानगरांचा सर्वाधिक २६.६ टक्के वाटा आहे. त्यात दिल्ली १४.६ टक्के, बंगळुरू ६.८ टक्के आणि मुंबई ५.२ टक्के आहे. देशातील आभासी चलन गुंतवणुकीत सर्वाधिक ७५.६१ टक्के गुंतवणूकदार कोलकत्यातील आहेत. याच वेळी जयपूर, लखनौ आणि पाटणा यांसारख्या शहरांमधूनही आभासी चलनाचा स्वीकार वाढला आहे. यातून महानगरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही आभासी चलनाचा होणारा विस्तार आणि त्याबाबत निर्माण होत असलेली जागरूकता दिसून येत आहे.

वयोगट कोणता?

आभासी चलन गुंतवणुकीत ३५ वर्षांखालील व्यक्तींचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. एकूण गुंतवणूकदारांमध्ये या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ७१.७ टक्के आहे. त्यात २६ ते ३५ वयोगटातील गुंतवणूकदारांचे प्रमाण ४४.४ टक्के असून, १८ ते २५ वयोगटातील गुंतवणूकदारांचे प्रमाण २७.३ टक्के आहे. मात्र, महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण कमी आहे. एकूण गुंतवणूकदारांमध्ये केवळ १२.०२ टक्के महिला आहेत. त्यामुळे आगामी काळात महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढण्यास भरपूर वाव असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

प्राधान्य कशाला?

भारतीय गुंतवणूकदार हे प्रामुख्याने ब्लू-चिप आणि लार्ज-कॅप चलन प्रकाराला प्राधान्य देत आहेत. कारण हे चलन प्रकार स्थिर आहेत. त्यातही पहिल्या स्तरावरील आभासी चलनांना मागणी जास्त आहे. कारण या आभासी चलनांकडे स्वत:ची चलन व्यवहार यंत्रणा असते. याचवेळी चलन व्यवहारासाठी त्रयस्थ यंत्रणांचा वापर करणाऱ्या दुसऱ्या स्तरावरील आभासी चलनांकडे ओढा कमी आहे. पहिल्या स्तरावरील आभासी चलनांचा वाटा गुंतवणुकीत ३५.५२ टक्के आहे. याच वेळी डीफाय म्हणजेच विकेंद्रित वित्तीय व्यवस्था आणि गेमिंग प्रकारातील आभासी चलनांनाही गुंतवणूकदारांकडून मागणी वाढताना दिसून येत आहे.

सर्वाधिक गुंतवणूक कधी?

यंदा आभासी चलनात सर्वाधिक गुंतवणूक मे महिन्यात झाली. त्यातही ९ ते १२ मे या कालावधीत जास्त गुंतवणूक झाली. यामागे जागतिक पातळीवरील मोठी तेजी कारणीभूत होती. अमेरिका, ब्रिटन आणि चीनने त्यावेळी व्यापार शुल्क कपातीची घोषणा केल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यातून जागतिक पातळीवर व्यापार तणाव कमी झाला. याचाच परिणाम होऊन आभासी चलन व्यवहारांत मोठी वाढ झाली होती. यामुळे जागतिक पातळीवरील घडामोडींचा मोठा परिणाम देशातील आभासी चलन व्यवहारांवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणत्या चलनाला पसंती?

आभासी चलनामध्ये बिटकॉईनला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. एकूण गुंतवणुकीत बिटकॉईनचा वाटा ६.५ टक्के आहे. त्याखालोखाल डॉजकॉईनचा वाटा किंचित कमी असून, तो ६.४९ टक्के आहे. इथिरियमचा वाटा ५.२ टक्के आहे. आभासी चलन वर्गवारीचा विचार करता मीम कॉईन्सचा वाटा एकूण गुंतवणुकीत १३.२ टक्के असून, त्यात डॉजकॉईन आघाडीवर आहे. त्यानंतर शिबू इनू आणि पेपे यांना पसंती मिळत आहे. सर्वाधिक व्यवहार होणारे आभासी चलन बिटकॉईन हे असून, एकूण व्यवहारांमध्ये त्याचा वाटा ७.२ टक्के आहे. त्याखालोखाल रिपल (एक्सआरपी) आणि इथिरियमचा वाटा प्रत्येकी ४.२ टक्के आहे.

sanjay.jadhav@expressindia.com



Source link