
स्वप्नील जोशी15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सेवावृत्तीने श्रम करणाऱ्या आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीच्या कार्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे डॉ. प्रकाश आमटे लिखित ‘नवी पिढी, नव्या वाटा’. (स्व.) बाबा आमटेंच्या जीवनसाधनेतून मिळालेला निष्काम सेवेचा वारसा डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी निरंतर पुढे चालवला. या कार्यात व्यक्तींचे उन्नयन आणि समाजाची प्रगती यांचा विचार करताना श्रम आणि सेवा यांची त्यांनी सांगड घातली. हे कार्य बहुआयामी झालं, ते दोन्ही मुलं आणि सुना यांच्या अथक प्रयत्नातून. तरुण खांद्यावर आलेली ही जबाबदारी पेलताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? भामरागडचं दुर्गम आदिवासी जग आणि लोकबिरादरी प्रकल्पातील कार्य लोकाभिमुख कसं झालं? याची नेमकी गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते.
पुस्तकाच्या सुरूवातीला ‘थोडी उजळणी’ या प्रकरणातील एका चित्राला लागून लेखक लिहितात… “बाबा आम्हाला घेऊन भामरागडच्या जंगलात आले, तोवर इथल्या आदिवासींबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आदिवासींचं जगणं पाहून आम्ही हबकलो.” या हृद्य चित्रात दोन आदिवासी बांधवांशी बाबा काहीतरी चर्चा करत आहेत. आमटे कुटुंबाचं कार्य त्यांच्या श्वासाइतकंच नैसर्गिक आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या भागात महाराष्ट्रातील तर सोडाच, पण चंद्रपूर जिल्ह्यातीलही माणसं कधी फिरकलेली नव्हती, असं लेखक सांगतात. काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने काम सुरू झालं खरं, पण ते सोपं नव्हतं. मुळात डॉक्टर म्हणजे काय? हे त्या आदिवासींना माहिती नव्हतं. त्यामुळं वैयक्तिक आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करणं क्रमप्राप्त होतं. आपला समाज हेच कुटुंब मानत आमटे दाम्पत्याने काम सुरू केलं. आनंदवनात बाबा – ताई आणि कार्यकर्त्यांच्या कामाची पार्श्वभूमी असली, तरी डॉ. प्रकाश यांच्यासाठी हे एक नवीन आव्हान होतं.
लोकबिरादरी प्रकल्प महाराष्ट्राच्या एका टोकावरच्या दुर्गम, जंगली भागात असल्याने तब्बल २२ वर्षे या गावात वीज नव्हती. पाऊस आला की रस्तेही वाहून जात. अशा परिस्थितीत कित्येक दिवस गावाचा उर्वरित जगाशी संपर्क नसे. दरम्यान दिगंत आणि अनिकेत या दोघांचा जन्म झाला. त्याचं संस्कारक्षम मन हेमलकशातील असंख्य गोष्टी टिपत होतं. पुढं आरतीचे कुटुंबात आगमन, तिची जडणघडण या सगळ्याच गोष्टींचे वर्णन वाचनीय आहे. “आदिवासींचा विश्वास मिळवणं आणि त्याचं जगणं सुसह्य करण्यासाठी जास्तीत जास्त सोयी-सुविधा पुरवत राहणं, यात आमच्या आयुष्याची ३५ वर्षे कशी गेली हे कळलंच नाही, असे डॉ. प्रकाश सांगतात. कालांतराने मुलगा दिगंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा प्रकल्पात काम करण्याचा निर्णय असो किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावरही अनिकेतचे तिथल्या व्यवस्थापनात पूर्णवेळ झोकून देऊन देणे असो; या दोघांनीही आपापल्या परीने प्रकल्प चालवण्याची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. दोन्ही मुलांचे करिअर, त्यांची संवेदनशील वृत्ती, लग्न आणि नंतर प्रकल्पात काम करतानाचा प्रत्यक्ष अनुभव या सगळ्या टप्प्यांवर “हे काम माझं आहे आणि ते मी पुढे नेणारच!” हा भक्कम विश्वास डॉ. प्रकाश यांनी मुलांच्या मनात निर्माण केला. आमटे कुटुंबाच्या या सेवाकार्यात पत्नी, मुले – सुना तर होत्याच; पण असंख्य कार्यकर्त्यांची फौजही सोबतीला होती.
कितीतरी प्रकारचे रुग्ण आणि त्यांची वाढती संख्या यामुळे प्रकल्पाचे कार्य विस्तारणे आवश्यक होते. ही गरज ओळखून दिगंत – अनघा आणि अनिकेत – समीक्षा यांनी नव्या अत्याधुनिक हॉस्पिटलची केलेली निर्मिती असो किंवा शाळेच्या माध्यमातून केलेला एक अभिनव शैक्षणिक प्रयोग असो; अशा सगळ्या गोष्टी करताना या पुढच्या पिढीमध्ये कल्पकता आणि जबाबदारीची जाणीव होती. आजच्या तरुणाईने आदर्श घ्यावा, असे आमटे कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांचे सेवाव्रती कार्य या पुस्तकरूपाने जगासमोर आले आहे.
आदिवासींच्या कुटुंबातील शिक्षणाच्या प्रवाहात आलेली तरुण मंडळी आज प्रकल्पाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी काम करत आहेत. त्यापैकी आय सेंटरमध्ये डोळ्यांची तपासणी करणारे जगदीश बुरडकर आणि गणेश हिवरकर यांची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. डॉ. अनघा यांची प्रसुती विभागातील सहायक, तसेच प्रियांका मोगरकर, शारदा भावसार, दीपमाला लाटकर आणि समुपदेशन करणाऱ्या सविता मडावी हे सगळे या सेवाकार्याच्या नव्या पिढीचे शिलेदार आहेत. आश्रमशाळेतील काम असो वा वाड्या – वस्त्यांवर जाऊन आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा पोहोचवणे असो; ही आजची गरज असल्याचे ओळखून नव्या पिढीने उचललेले प्रत्येक पाऊल तिथल्या स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसिद्ध बनवत आहे. निकोप समाजाच्या निर्मितीसाठी सुरू असलेली आमटे कुटुंबाच्या पिढ्यांची ही व्रतस्थ, निरंतर वाटचाल समजून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.
पुस्तकाचे नाव : नवी पिढी, नव्या वाटा लेखक : डॉ. प्रकाश आमटे संपादन : सुहास कुलकर्णी प्रकाशक : समकालीन प्रकाशन पाने : १३६, किंमत : रु. २००
(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)