पुस्तकामागच्या गोष्टी: विज्ञानाचा अफलातून ‘टॉवेलधारी’ सोयरा

0
15
पुस्तकामागच्या गोष्टी: विज्ञानाचा अफलातून ‘टॉवेलधारी’ सोयरा


आदूबाळ7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

डग्लस अॅडम्स

“मी डग्लसला एक अलौकिक बुद्धिमत्तेचा माणूस – जिनियस – समजतो. त्याने विज्ञान-तंत्रज्ञानामुळे लोकांच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या आणि तो दृष्टिकोन वाचकांपर्यंत पोचवायला तो सक्षम होता. आणि एकदा वाचक त्या दृष्टिकोनाला सरावला की, मूळ पद्धतीने पाहणे त्याला जवळजवळ अशक्य होते.’ डग्लस अॅडम्स या लेखकाबद्दल नील गेमन या वाचकप्रिय लेखकाने काढलेले हे गौरवोद्गार आहेत. अॅडम्स यांच्या लेखनाने प्रेरित झालेले अनेक लेखक, चित्रकार, शास्त्रज्ञ, चित्रपट निर्माते, खगोलशास्त्रज्ञ, कलाकार, अभियंते, अंतराळवीर असेच उद्गार काढतात. कोण होता हा इसम?

अॅडम्स यांचा जन्म केम्ब्रिजमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं शालेय शिक्षण पूर्व लंडनमधील शाळेत झालं. लहानपणापासूनच अॅडम्स गोष्टी सांगण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे इंग्रजी भाषेचे शिक्षक अत्यंत कडक होते, पण त्यांचेही ते लाडके होते. शाळा संपल्यानंतर त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांनी चालवलेला ‘फूटलाइट्स’ नावाचा विनोदी नाटके करणारा क्लब आहे. त्यात अर्ज करून प्रवेश मिळत नाही, दिला जातो. अॅडम्स लवकरच त्या क्लबात शिरले आणि रुळले. केम्ब्रिजच्या वर्षांत त्यांनी लेखनात करिअर करायचं निश्चित केलं.

साठीच्या त्या दशकात रंगभूमी आणि रेडिओसाठी लिहिणं मानाचंही होतं आणि भरपूर पैसेही मिळवून देत असे. फूटलाइट्समुळे त्यांची ओळख ‘मॉन्टी पायथन’ या प्रसिद्ध ब्रिटिश विनोदी पथकाच्या ग्रॅहम चॅपमनशी झाली आणि अॅडम्सना रंगभूमी आणि रेडिओची दारं खुली झाली. पण, तिथे यश मिळवणं सोपं नव्हतं. त्यांना बराच काळ झगडा करावा लागला, पुरेसं लेखनकाम मिळत नसे. या काळात त्यांनी अनेक लहान-मोठे उद्योग केले – गोठा साफ करण्यापासून ते एका कतारी- अरब कुटुंबाचा शरीररक्षक बनण्यापर्यंत! पण, लेखन त्यांचं पहिलं प्रेम होतं आणि लेखन करायला न मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळत चालला. अॅडम्स यांची लोकप्रियता आजही टिकून आहे, ती ‘हिचहायकर्स गाईड टू द गॅलॅक्सी’ या मालिकेमुळे. याची सुरूवात १९७७ मध्ये बीबीसी रेडिओ ४ या स्टेशनवरून प्रसारित झालेल्या पाच-सहा भागांच्या लहानशा मालिकेमुळे झाली. ‘वोगॉन्स’ नावाने ओळखले जाणारे परग्रहवासी एके दिवशी एकाएकी पृथ्वी नष्ट करून टाकतात. कारण काय, तर अंतराळातील महामार्गाला एक बायपास बांधायचा असतो आणि पृथ्वी वाटेत आलेली असते! हा उद्योग करणारे वोगॉन्स हे अत्यंत खाकी डोक्याचे बोरिंग लोक असतात. कादंबरीचा नायक आर्थर डेन्ट या भानगडीत कसातरी वाचतो आणि आकाशगंगेत लिफ्ट मागत फुकट प्रवास करणारा प्रवासी (हिचहायकर) म्हणून हिंडतो. त्याला भेटलेले लोक, आलेले अनुभव म्हणजे ही पाच कादंबऱ्यांची ‘त्रयी’! (माझ्याकडे असलेल्या प्रतीवर A trilogy in five parts असाच उल्लेख आहे!)

वरच्या वर्णनावरून अॅडम्स यांच्या लेखनशैलीची कल्पना वाचकांना आलीच असेल. अॅडम्सना विज्ञानकथालेखकही मानलं जातं आणि विनोदी लेखक म्हणूनही. त्यांच्या विनोदाला अनेक विशेषणं लावता येतील : “हे काहीही आहे!” असं वाटायला लावणारा, विक्षिप्त, अब्सर्ड, टोपी उडवणारा, तिरकस, विनम्रपणे उर्मट, पण उपरोधिक आणि मार्मिक. याची एक-दोन उदाहरणं देणं अप्रस्तुत ठरणार नाही. एक परग्रहवासी विचारतो, ‘माणसा, तुझं नाव काय?’ ‘डेन्ट. आर्थर डेन्ट.” जेम्स बॉण्डच्या शैलीची नक्कल करत डेन्ट उत्तरतो. पुढे सबंध पुस्तकभर तो परग्रहवासी कायम त्याचा उल्लेख ‘डेन्टआर्थरडेन्ट’ असा करतो! एके ठिकाणी आकाशात दिसणाऱ्या यानांचं वर्णन करताना अॅडम्स लिहितात, “परग्रहवासीयांची यानं आकाशात अशी लटकत होती, जशा विटा कधीही लटकत नाहीत.’

अॅडम्स पक्के नास्तिक होते. त्यांच्या लेखनात अनेकदा श्रद्धेची उघड खिल्ली उडवलेली दिसते. ‘द गॉड डिल्युजन’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या रिचर्ड डॉकिन्सने ते अॅडम्सला अर्पण केलं आहे. अॅडम्स यांच्या मृत्यूनंतर डॉकिन्स लिहितो, ‘विज्ञानाने आपला मित्र गमावला, साहित्यसृष्टीचा प्रकाशमान तारा निखळला, जंगली गोरिला आणि काळ्या गेंड्यांचा संरक्षक आता उरला नाही.’ शेवटचा उल्लेख अॅडम्स यांच्या वन्यप्राण्यांचं संरक्षण करायच्या कार्याला केलेलं नमन होतं.

दरवर्षी २५ मे या दिवशी अॅडम्स यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘टॉवेल दिवस’ साजरा केला जातो. ‘आकाशगंगेतल्या प्रवाशासाठी टॉवेलइतकी अतिप्रचंड उपयुक्त गोष्ट दुसरी कुठलीच नाही,’ या विक्षिप्त वाटणाऱ्या त्यांच्याच वाक्याचा संदर्भ याला आहे. या दिवशी अॅडम्स यांचे जगभरातील चाहते (आपापल्या टॉवेलसह) एकत्र येऊन ‘हिचहायकर्स गाईड’ची आठवण ताजी ठेवतात.

(संपर्कःaadubaal@gmail.com)



Source link