पुस्तकामागच्या गोष्टी: पूर्व – पश्चिमेत सांस्कृतिक पाट बांधणारी लेखिका

0
13
पुस्तकामागच्या गोष्टी: पूर्व – पश्चिमेत सांस्कृतिक पाट बांधणारी लेखिका


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Article Pustakamagchya Goshti Written By Aadubal | Pearl S., A Writer Who Built A Cultural Bridge Between East And West. Buck

आदूबाळ6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पर्ल एस. बक

‘लेखकाचं एकच काम असतं. त्याने लिहिलेलं एक वाक्य वाचल्यावर वाचकाला पुढचं वाक्य वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. बस्स, एवढं जमलं की झालं!’ असं कुणीसं म्हटलं आहे. आता हे म्हणायला सोपं आणि प्रत्यक्षात आणायला अवघड आहे, हे झालंच. तीक्ष्ण आणि मर्मभेदक कथनशैली असलेल्या लेखकांना मात्र ही कला साध्य होते. पर्ल एस. बक या अशा कादंबरीकार मानल्या जातात. पण, कथनशैलीबरोबरच दुसऱ्या संस्कृतीचं अंतरंग दाखवून वाचकांची सांस्कृतिक समज वाढवणारं हे विसाव्या शतकातील साहित्य क्षेत्रामधलं एक प्रमुख व्यक्तिमत्व.

बक यांचा जन्म 1892 मध्ये वेस्ट व्हर्जिनियातील हिल्सबोरोमध्ये झाला. त्यांचे वडील चीनमध्ये कार्यरत असणारे मिशनरी होते. बक यांचं बालपण चीन आणि अमेरिकेत गेलं. त्यांच्या लेखनाला आणि एकंदरीतच जगाकडे बघायच्या दृष्टीला प्रभावित करणारी ही पार्श्वभूमी होती. पूर्व – पश्चिमेचं सांस्कृतिक मिश्रण हा त्यांच्या संस्कारांचा भाग होता. त्यांच्या कथांमध्ये या दोन जगातील सांस्कृतिक अंतर मिटवण्याची क्षमता होती. बक यांचा कादंबरीकार म्हणून विकास चीनमधील त्यांच्या अनुभवांशी घनिष्ठपणे निगडित होता. तिसाव्या वर्षापर्यंत चीनमध्ये राहिल्यामुळे त्यांना चिनी समाज, भाषा आणि रीतिरिवाजांची आतून समज होती. त्यांची पहिली कादंबरी ‘ईस्ट विंड : वेस्ट विंड’ 1930 मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीत पूर्व – पश्चिम संबंधांविषयी एक वेगळाच दृष्टिकोन घेतला होता. समीक्षकांनी या कादंबरीची दखल घेतली खरी, पण ‘द गुड अर्थ’ (1931) या दुसऱ्या कादंबरीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली.

एका चिनी शेतकरी कुटुंबाने उपजीविकेसाठी आणि समृद्धीसाठी केलेल्या संघर्षाची कथा सांगणारी ही कादंबरी आहे. त्यातून चीनमधील ग्रामीण जीवनाची ओळख पाश्चात्त्य इंग्रजीभाषिक जगाला प्रथमच झाली. ही कादंबरी बेस्ट सेलर ठरली आणि तिला १९३२ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला. यात चिनी शेतकरी जीवनाचे जिवंत चित्रण हा भाग तर होताच, पण त्यामधील मानवतावादी विषयांनी जगभरातील वाचकांना हेलावलं. स्वतःच्या संस्कृतीपेक्षा वेगळ्या संस्कृतीची समज आणि सह-अनुभूती दाखवणारे बक यांचे लेखन लोकप्रिय ठरलं नसतं, तरच नवल! ‘द गुड अर्थ’शिवाय बक यांच्या इतर दोन महत्त्वाच्या साहित्यकृती आहेत, त्या म्हणजे ‘सन्स’ (१९३२) आणि ‘अ हाऊस डिव्हायडेड’ (१९३५). या कादंबऱ्यांना ‘द गुड अर्थ’ त्रयी म्हणतात. ‘द गुड अर्थ’मधील पात्रांचं जीवन अधिक गहिरेपणे या पुढील कादंबऱ्यांमध्ये येतं. जुन्या आणि नवीन मूल्यांमधील संघर्ष, एखाद्या सामान्य व्यक्तीची समाजातील भूमिका, समाजाप्रति असलेली बांधिलकी आणि वैयक्तिक व राजकीय उलथापालथीमुळे सामान्यांच्या जीवनावर होणारे खोल परिणाम यांसारख्या विषयांवर या कादंबऱ्या भाष्य करतात. बक यांच्या लेखनाचे विषय मानवाची स्थिती, सांस्कृतिक संघर्ष आणि सह-अनुभूतीच्या मानवी आयुष्यातील महत्त्वाभोवती फिरतात. माणसाने माणसाला समजून घेणं आत्यंतिक महत्त्वाचं आहे, हा ‘संदेश’ त्यांच्या त्यांच्या कादंबऱ्यांमधून मिळतो. त्यांच्या कथानकांमध्ये अनेकदा स्त्रियांची आणि गरिबांची दयनीय परिस्थिती दिसते. पण, त्यांची दुःखं जगाच्या चव्हाट्यावर मांडून त्यांचा बाजार करावा, असा बक यांचा हेतू नसतो. ही दुःखं त्या बारकाईने मांडतात, पण तेही या घटकांच्या आत्मसन्मानाची चाड राखून. चीनमधील दीर्घ वास्तव्यामुळे बक एकाच वेळी चिनी होत्या आणि जन्माने अमेरिकन असल्याने चिनी नव्हत्याही. अंतर्गत आणि बाह्यस्थ अशा दोन्ही भूमिकांमधून त्या चिनी संस्कृतीकडे बघू शकत होत्या. सामान्य चिनी लोकांच्या संघर्षांविषयी प्रामाणिकपणे लिहिण्यास या दुर्मिळ परिस्थितीमुळेच त्या सक्षम होत्या. त्यांच्या काळातील पाश्चात्य लेखकांमध्ये त्या याच कारणाने उठून दिसतात. पर्ल एस. बक यांचे साहित्यिक जगतातील महत्त्व इथेच थांबत नाही. १९३८ मध्ये त्या साहित्याचा ‘नोबेल पुरस्कार’ जिंकणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या. त्यांचे काम केवळ कथाकथनापुरते मर्यादित न राहता, दोन वेगळ्या जगांतील सेतू बनलं. पाश्चिमात्य जगात पौर्वात्य संस्कृतीविषयी समज आणि सहानुभूती वाढवण्याचे कार्य त्यांच्या लेखनाने केले. बक यांचा वारसा केवळ त्यांच्या लेखनापुरता मर्यादित नाही. त्या स्त्रीमुक्तीच्या सक्रिय सहानुभूतीदार आणि वर्णभेदविरोधी कार्यकर्त्याही होत्या. आशियाई – अमेरिकन मिश्रवंशीय मुलांना अमेरिकेत दत्तक घेतलं जावं, यासाठी त्या अविरत काम करत होत्या. त्यांच्या साहित्यिक यशाने त्यांना केवळ साहित्याच्या इतिहासातच अमर केले नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीच्या व्यापक संदर्भातही स्थान दिले आहे. बक यांचा वारसा सांस्कृतिक अडथळ्यांपलीकडे जाऊन साहित्याची ताकद दाखवतो आणि मानवतेच्या सामायिक अनुभवांना ठळकपणे प्रदर्शित करतो.

(संपर्क- aadubaal@gmail.com)



Source link