- Marathi News
- Opinion
- Sakharam Binder Play Complete Performance; Sayaji Shinde Impresses, Director Abhijit Zhunzarrao Reduces Three Acts To Two
किरण येले18 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रातील भव्य आणि विस्तृत म्हणता येईल अशा अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर लोकार्पणानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित आठ नाटकांच्या महोत्सवात दिनांक 22 ऑक्टोबर रोजी विजय तेंडुलकरांचे सखाराम बाइंडर सादर झाले. यावेळी 650 आसनक्षमतेच्या नाट्यगृहात जवळपास 1000 प्रेक्षक खाली बसून उभे राहून नाटकाचा अनुभव घेत होते. विजय तेंडुलकर हे मराठी नाटकातील अजरामर नाव. आपल्या सर्व नाट्यकृतीतून त्यांनी माणसातील विकृती, लालसा, वासना, कृतकता, कृतघ्नपणा यावर प्रकाश टाकला. सखाराम बाइंडर हे मूळ नाटक तीन अंकी आहे. ते दोन अंकी करणे म्हणजे, म्हणजे सह्याद्री एका फोटोत बसवणे. पण हे अवघड काम दिग्दर्शक अभिजित झुंझाररावने चोख बजावले आहे. या नाटकातील अनेक फ्रेम्स लक्षात राहतील अशा बसवल्या आहेत.
लक्ष्मी, चंपा आणि सखाराम यांच्या लकबी आणि देहभाषा अभिजितने बारकाईने ठरवल्यामुळे ही तिन्ही पात्रे उठून दिसतात. त्यात तेंडुलकर यांचे लेखनाचे श्रेय असले, तरी दिग्दर्शक झुंझारराव यांनीही वर दिलेली फोडणी नाकारता येत नाही. सयाजी शिंदे, नेहा जोशी, अनुष्का बोराडे, चरण जाधव आणि स्वत:कडून चांगल्या जागा निर्माण करण्यास दिग्दर्शक मागे राहिला नाही. सयाजी आणि चरण हे दोघे तालवाद्य छान वाजवतात. त्याचाही त्याने चपखल वापर केला आहे. या सगळ्याला परिपूर्ण साथ लाभली आहे ती प्रकाश योजनाकाराची. लक्ष्मी आस्तिक तर चंपा नास्तिक. लक्ष्मी सोज्वळ तर चंपा उठवळ. लक्ष्मी नागरी तर चंपा ग्रामीण. लक्ष्मी दिवसाची स्त्री आणि चंपा ही रार्त्रीची स्त्री, हे सारे फरक लेखकाने आणि पात्रांनी गडद केले आहेत. तसेच प्रकाशयोजनाकार आणि संगीतकार आशुतोष वाघमारे या दोघांनीही केले आहेत. लक्ष्मीचा वावर प्रकाश दिवसा आणि चंपाचा वावर रात्र हा फरक प्रकाशयोजनाकाराने दाखवला आहे.
संगीतकार आशुतोष वाघमारे यांनीही या दोन पात्रांसाठी दोन टोकाच्या संगीतांचे नियोजन केल्याने ही दोन्ही पात्रे आणि त्यांच्या स्वभावांची दोन टोके उठून दिसली. सखाराम गणपतीच्या दिवशी लक्ष्मीला मारतो तेव्हा बाहेर भजन सुरू आहे. त्यामुळे लक्ष्मी मनात देवाला हाक मारते असे वाटते. तर चंपासोबत दसऱ्याच्या दिवशी प्रणय प्रसंगी बाहेर देवळात गोंधळाचे संगीत सुरू होते. लग्नाच्या रात्री अंगणात असलेला जागरण गोंधळ आठवून संगीतातून तो प्रसंग उंचावर जातो. (संगीत, प्रकाश, आणि हालचाली हे लेखकाने न लिहिलेले संवाद असतात. जे आपल्याला लिहावे लागतात हे संगीतकार, प्रकाशयोजनाकार आणि दिग्दर्शकाला कळले आहे याचे हे उदाहरण) अशा अनेक प्रसंगी संगीतभाषा जाणवते. आणि नाटकाला वेगळे परिमाण मिळते.
सखाराम बाइंडर या नाटकाचे नेपथ्य विचार करायला लावणारे आहे. त्याबद्दल नेपथ्यकार सुमीत पाटील या तरुणाचे कौतुक. डाव्या बाजूस पुढे स्वयंपाक घर आणि त्यामागे मोरी आहे. मोरीला लागूनच बाहेर जाण्याचा रस्ता वा आत येण्याचा रस्ता तीन अधिक दोन असा पाच पायऱ्या वर आहे. सखारामच्या खोलीत यायचे, त्याच्यासोबत राहायचे तर या पायऱ्या उतरुन खालच्या पातळीवर यावे लागेल असे सुचवणारे. इथे येणारे प्रत्येक पात्र कधी न कधी ती खालची पातळी गाठतेच. शांततेचाही आवाज असतो आणि तो अधिक भयावह असतो, ही बाब समजून घेत आशुतोष वाघमारे या तरुण संगीतकाराने, ज्या संयतपणे या उग्र नाटकाची प्रकृती समजून घेत कधी त्याची उग्रता अधोरेखित करणारी शांतता राखत, तर कधी त्याची उग्रता सहनीय करणारे संगीत देत, नाटकाचा तोल सांभाळला ते लाजवाब. या नाटकाचे संगीत ही सर्वात धोक्याची बाब होती. जरा अधिकच्या संगीताने हे नाटक बटबटीत झाले असते. हीच बाब कलाकारांबाबत विशेषत; सखाराम साकारणाऱ्या सयाजी शिंदे यांच्याबाबत म्हणता येईल.
सखारामच्या हिंस्त्रपणाला विकृतपणाच्या पातळीवर न नेता, त्याचे माणूसपण गणपती आणल्यावर आरतीच्या प्रसंगात, राग आल्यावर मृदंग वाजवण्याच्या व इतर प्रसंगात त्यांनी केलेला सखाराम आवडतो. शेवटी सखारामची कीव येऊ लागते इथवर त्यांनी हतबल सखाराम साकारला. नेहा जोशी यांनी कमी संवादात साकारलेली थंड खानदानी उच्चवर्णीय स्त्री देहभाषेसह अप्रतिम तर अनुष्का यांनी साकारलेली बोलभांड, बंड करणारी स्त्री, बोलीभाषेच्या हेलासह तंतोतंत रेखाटली. तेंडुलकर या नाटकातून सांगतात, की आपण समाजात अनेक सोज्वळ, साधी, पापभिरू माणसे पाहतो. त्यांचे गुणगान करत आसपास सखाराम चंपासारख्या उठवळ माणसांना विकृत आणि राक्षस वृत्तीची असंवेदनशील म्हणून नावे ठेवतो. पण वेळ आल्यावर कळते की या असंवेदनशील माणसांसारखेच देव देव करणारी, उपासतापास, व्रतवैकल्ये करणारी, पक्षी मुंगळे यांच्याशी बोलणाऱ्या लक्ष्मी सारख्या माणसांतही राक्षस लपून असतो.
चंपाचा खून झाल्यावर धक्का बसून गप्प झालेल्या सखारामला लक्ष्मी म्हणते, ‘बरे झाले तिला मारले. (त्या आधी लक्ष्मीला मारताना चंपा तिला वाचवते) ती वाईट होती. तुम्ही घाबरू नका. आपण हिला पुरू आणि सांगू ती निघून गेली.’ आणि लक्ष्मी स्वत: स्वयंपाकघर खणू लागते. इथे नाटक संपते. नाटकाचा हा संदेश पोहोचवण्याचे काम सयाजी शिंदे, अभिजित झुंझारराव आणि संघाने चोख केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक. हे नाटक नव्या दमाचे दिग्दर्शक अभिजित झुंझारराव, संगीतकार आशुतोष वाघमारे, नेपथ्यकार सुमीत पाटील यांची नाट्यक्षेत्रात नवी ओळख करून देईल हे निश्चित.
(लेखक सुप्रसिद्ध कवी आणि कथाकार आहेत.)






