
समीर गायकवाड7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी दक्षिणेतील एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने बंगळुरूमधील भीक मागणाऱ्या माफियांबद्दल एक चौकशी अहवाल प्रकाशित केला होता. त्यासाठी संबधित महिला पत्रकाराने एका बाळाला ‘भाड्याने’ घेऊन शहरातील रस्त्यांवर भीक मागण्यासाठी गुप्तपणे नेले होते. तिने बाळाला कसे मिळवले आणि पुढे जाऊन त्यातून काय घडले, याच्या तपशिलातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेले असते, तिथले अख्खे जगच आपल्याला अनभिज्ञ असते, हेही जाणवले. त्यामुळे विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये लक्ष वेधणाऱ्या पृथ्वी कोनानूरचा ‘पिंकी एली’ (पिंकी कुठे आहे?) हा कन्नड चित्रपट अशाच गोष्टींपासून प्रेरणा घेऊन निर्मिला असावा, असे वाटते.
आपला पती मंजुनाथ (दीपक सुब्रमण्य) याच्यापासून दुरावलेली बिंदुश्री (अक्षता पांडवपुरा) तिचा पार्टनर गिरीश (अनुप शून्या) आणि आठ महिन्यांची मुलगी पिंकीसोबत राहते. गृहिणीखेरीज नोकरदार महिला असणारी बिंदुश्री आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी सनम्मा (गुंजालम्मा) या मदतनीस महिलेच्या भरवशावर घर सोडत असते. आपल्या मुलीच्या अंगाला कसला तरी विचित्र वास येतोय, हे एकदा तिच्या लक्षात येते. तर, आणखी एका प्रसंगी तिच्या एका सॉक्समध्ये दोन रुपयांचे नाणे अडकते, तरीही बिंदुश्रीला त्यातून कुठल्या मिसप्लेचा संशय येत नाही. वास्तवात बिंदुश्री घराबाहेर पडली की, सनम्माचं खरं रूप समोर येत असतं. पिंकीला गुंगी यावी म्हणून सनम्मा अल्कोहोलयुक्त दूध पाजत असते, जेणेकरून अनसू नावाचा तिचा मित्र रस्त्यावर भीक मागण्यासाठी साधन म्हणून पिंकीला वापरू शकेल. सनम्माचा हा उद्योग बिनबोभाट सुरू असतो. बिंदुश्रीला याची भनक देखील नसते. मात्र एकेदिवशी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अनसूकडून पिंकी हरवते! त्यानंतर पिंकीच्या शोधाची जी जीवघेणी कसरत सुरू होते त्याचा हा सिनेमा. अंगावर काटे आणणारा अन् विचार करण्यास भाग पाडणारा!
कथेला मुख्य प्लॉट पॉइंटवर नेण्यात सिनेमा वेळ घालवत नाही. पहिल्या पाच मिनिटांतच कथेतली मुख्य पात्रे – एक जोडपं, एक मूल, घरातली मदतनीस आणि लहानगी मुलगी यांच्या विश्वात आपण शिरतो. त्यानंतर लगेचच पिंकीचे बेपत्ता होणं आपल्यासमोर येतं. या तान्हुलीला शोधण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करत असतानाच दिग्दर्शकाने चतुराईने काही उपकथानके एकत्र विणलीत. पिंकीच्या आडून काही अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी सनम्मावरचा संशय, पिंकीच्या पालकांचे ताणले गेलेले परस्परसंबंध, पोलिसांचा तिरकस तपास हे सर्व रंजक पद्धतीने समोर येतं. एखादे मूल चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाते तेव्हा काय होऊ शकते, याचा हा थरारक प्रवास आहे. पृथ्वीचा हा चित्रपट कोणत्याही सेलिब्रिटी नायक-नायिकेला घेऊन निर्मिलेला नाही. सनम्माचे पात्र साकारणारी गुंजालम्मा असो, अनसूच्या भूमिकेत तिची चुलत बहीण अनसूयम्मा असो की कॉर्पोरेशनचे सफाई कामगार, त्यांचा सावळा एजंट, इतर लोक आणि उलगडत जाणाऱ्या वेगवान घटना असोत; हे सर्व गणित वास्तववादी लोकेशनमधील नॉन-अॅक्टर्सच्या ‘परफॉर्मन्स’वर पेललं आहे. अर्जुन राजाच्या हँडीकॅमेऱ्याने केलेलं चित्रीकरण अफलातून आहे. धडधडत जाणाऱ्या कॅमेऱ्यातून चित्रित केलेली अनेक दृश्ये अक्षरशः अंगावर येतात.
‘पिंकी एली’ हा ईझी वॉच मूव्ही नाही. आपण संवेदनशील असू आणि प्रत्येक सिग्नलवर भीक मागण्यासाठी वापरलेली लहान मुले जवळपास नेहमीच गुंगीत असल्यासारखी का दिसतात, असा प्रश्न जर कधी पडला असेल, शिवाय जोडीला आपण तरुण पालक असू, नोकरीसाठी रोज घराबाहेर पडत असू आणि आपले घर हेच सर्वात सुरक्षित ठिकाण असेल, असे गृहीत धरून दीर्घकाळ बाहेर राहत असू, तर हा सिनेमा आयओपनर ठरावा! असे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येतं की, आपल्या बालपणी घरात कुणी वृद्ध माणूस असणं किती महत्त्वाचं आणि गरजेचं होतं. ज्यांच्या घरी आजी-आजोबा होते, त्यांच्यासाठी तर घर म्हणजे स्वर्गच होता. मात्र, ज्यांना सांभाळण्यास रक्ताचं कुणी घरी नसतं त्यांचं काय, यावर हा सिनेमा अप्रत्यक्ष भाष्य करतो. ‘पिंकी एली’ अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलेला असल्याने सिनेमागृहांमध्ये तो पुरस्कार विजेता सिनेमा म्हणून मिरवतच दाखल होतोय. एरवी फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजणारे सिनेमे ठराविक विचार आवडणाऱ्या गर्दीचे लक्ष्य असतात. सुदैवाने पिंकीचे तसे होणार नाही, कारण हा एक गंभीर मास मूव्ही आहे, जो पाठलागावर भर देतो. कोणतीही अतिरिक्त सजावट नसणाऱ्या, मात्र विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या सिनेमाला पार्श्वसंगीतही नाही! हा जसा नेहमीच्या पठडीतील सिंगल स्क्रीन सिनेमा नाही, तसा तो चकचकीत मल्टिप्लेक्स मूव्हीसुद्धा नाही. याचा कंटेन्ट लोकांना आवडेल असा असला, तरी त्याचे स्क्रीन टाइम स्लॉटदेखील महत्त्वाचे ठरतील. कारण सगळ्यांनाच असे चित्रपट आवडतील, याची ग्वाही कुणीच देऊ शकणार नाही. या सिनेमाचे ओटीटी रिलीज जूनअखेरीस आयएमडीबी आणि नेटफ्लिक्सवर होईल.
समीर गायकवाड sameerbapu@gmail.com संपर्क : ९७६६८३३२८३