- Marathi News
- Opinion
- Rasik Article Written By Sameer Gaikwad On Netstream Kabuliwala And Three Of Us
समीर गायकवाड8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘थ्री ऑफ अस’मधील एक दृश्य.
‘काबुलीवाला’बद्दल आपल्यापैकी अनेकांच्या मनात बालवयातील स्मृती असतील. कारण ही कथाच तितकी प्रसिद्ध नि भावस्पर्शी आहे. आता याच कथेवर आधारित ‘काबुलीवाला’ हा चित्रपट जिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. रहमत (मिथुन चक्रवर्ती) आपली लहान मुलगी रझिया आणि आईला सोडून पैसे कमवण्यासाठी कोलकत्याला येतो. तिथे तो लहानग्या मिनीला (अनुमेघा) भेटतो. मिनीमध्ये रहमानला त्याची मुलगी दिसते..
या कथेवर चित्रपट बनवताना दिग्दर्शिका सुमन घोष यांच्यासमोर दोन प्राथमिक आव्हाने होती – टागोरांच्या क्लासिक कथेला कालानुरूप स्वीकारणे आणि तपन सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला, बंगालमधील प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक मानला जाणारा जुना मास्टरपीस नव्या ताकदीने पेश करणे! यातून आलेल्या दडपणाला तोंड देत अगदी सहजतेने त्यांनी दोन्ही आव्हाने स्वीकारली. हा चित्रपट त्यांनी अगदी तरलतेने मांडलाय नि हीच या चित्रपटाची जादू आहे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, यातली मिथुन चक्रवर्तींची लीड भूमिका. रहमतच्या भूमिकेत इथे मिथुन नसते तर सगळे काही असेच सेंटी वाटले नसते. मिथुन यांनी आपल्या पूर्वसुरींचे अनुकरण केले नाही किंवा त्यांना नाकारलेही नाही. उलट प्रत्येक फ्रेममध्ये ते केवळ आणि केवळ रहमत झाले आहेत. जलालाबादच्या निर्मळ भूमीतला एक अफगाण एका मोठ्या शहरातल्या कोलाहलाशी आणि अविश्वासाशी कसा झगडतो, हे त्यांच्या भूमिकेतून सहजगत्या उलगडत जाते नि आपण त्यात गुंतून पडतो. रहमत आणि त्याच्या सहकारी अफगाण रहिवाशांच्या जीवनातील विरोधाभास आणि संघर्ष मिथुन यांनी नजाकतीने टिपले आहेत. रहमतच्या साधेपणातला, तत्त्वनिष्ठ जीवनातला आणि पितृप्रेमातला अश्रू ढाळणारा हरेक क्षण त्यांनी जिवंत साकारलाय.
मिथुन चक्रवर्तींसोबत अबीर चटर्जी आणि सोहिनी सरकार हे देखील मिनीचे पालक म्हणून शोभतात. अबीर एक दयाळू आणि उदारमतवादी व्यक्तिरेखा साकारण्यात कमालीचा यशस्वी झालाय, तर सोहिनी दूरच्या भूमीतल्या माणसाविषयीची आईची दुविधा मनमोहकपणे टिपते. लहान अनुमेघा तिच्या सुंदरतेने प्रेक्षकांचे हृदय पिळवटून टाकण्यात कोणतीही कसर सोडत नाही. मायेचा केवळ मोहक देखावाच न करता ती मिनीची व्यक्तिरेखा साकारताना कसलेल्या अभिनेत्रीसारखे काम करते. याशिवाय, सुमीत समद्दार आणि गुलशनारा खातून यांच्या भूमिका चांगल्या जमल्यात.
‘काबुलीवाला’ असा अभिनयाच्या पातळीवर दमदार कामगिरी करत असताना, दुसऱ्या बाजूने तो एक असा लँडस्केप दाखवतो, जो बंगाली सिनेमात सहसा टिपला जात नाही. रहमतच्या गावातले मनोहारी निसर्गसौंदर्य सुभंकर भर यांनी अप्रतिमपणे टिपले आहे. अगदी साठच्या दशकातील कोलकता खूप चांगल्या रीतीने सादर केलाय. ओल्ड सिटीमधील ख्यातनाम परिसर परिश्रमपूर्वक सेट केलेल्या कालखंडात बदलले आहेत. गाणी कालबाह्य वाटतात, पण ती रवींद्र संगीताच्या विश्वासार्हतेची मर्यादा ओलांडत नाहीत, ही जमेची बाजू. चित्रपटाचे पार्श्वसंगीतही अप्रतिम आहे. प्रेक्षकांच्या हृदयात भक्कम भावनात्मक उंची असलेली कथा निवडण्यासाठी खूप धैर्य लागते. सुमन घोष यांनी हे धाडसी आव्हान लीलया पेलले आहे. मिथुन चक्रवर्तींचा हा एक ऑफबीट सिनेमा म्हणावा लागेल. प्रत्येक फ्रेममध्ये ते प्रेक्षकांना भुरळ घालतात. एकूणच‘काबुलीवाला’ हा एक नितांतसुंदर चित्रपट आहे, जो कधीही चुकवू नये या श्रेणीत मोडतो!
‘थ्री ऑफ अस’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात मुंबईत राहणाऱ्या शैलजा देसाईची (शेफाली शाह) कथा आहे. बऱ्याच कालावधीनंतर आपल्या गावी – वेंगुर्ल्यात जायची तिला इच्छा होते. त्यासाठी ती पती दीपांकरकडे (स्वानंद किरकिरे) हट्ट करते. पत्नीच्या हट्टाखातर दीपांकर तिला घेऊन आठवडाभरासाठी कोकणात जातो. तिथं गेल्यावर तिची भेट प्रदीप कामतशी (जयदीप अहलावत) होते. शैलजाला भेटल्यावर प्रदीपला त्याची हरवलेली कविता गवसते. या चित्रपटात वयाच्या विविध टप्प्यावरच्या आठवणीचा कोलाज दाखवण्यात आलाय. अल्लड शैशव, शाळा, घर, शेजार, बालवयातले निर्विष प्रेम, मामाचे गाव, गावची जत्रा, नानाविध गमतीजमती.. या सगळ्या घटकांभोवती चित्रपटाची कथा फिरते. शैलजा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या उंबरठ्यावरती उभी असलेली पाहायला मिळते. तिला डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) झालेला असतो. तिचा मुलगा आणि पती तिची काळजी घेत असतात. काळाच्या विविध खंडांवरचा तिचा प्रवास कोकणच्या नितांत तरल, देखण्या अन् बोलक्या कॅनव्हासवर अगदी उठून दिसतो. कोकणच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरून तिच्यासमवेत आपण कधी चालू लागतो, हे उमगतच नाही!
‘थ्री ऑफ अस’ २४ नोव्हेंबर २०२२ ला प्रदर्शित झाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, तेव्हा त्याची फारशी चर्चा झाली नव्हती. आता तो ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि त्याविषयी प्रेक्षकांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळतेय. एक गट याचे बेहद्द कौतुक करताना दिसतोय, तर दुसऱ्या गटाला हा सिनेमा तितकासा रुचलेला नाही. चित्रपटात संवाद कमी आहेत, पण ते मार्मिक आहेत. इथे कॅमेरा पात्रांहून अधिक बोलतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोकण हे सिनेमाचे मुख्य बलस्थान वाटावे, इतके देखणे चितारले गेले आहे. केवळ कोकणच नव्हे, तर शैलजाचे मुंबईतले नागर जीवनही रसरशीतपणे आकळते. मात्र, ज्या प्रेक्षकांना या आजाराविषयी नि अशा व्यक्तिरेखांविषयी वैयक्तिक आस्था नसेल, त्यांना हा सिनेमा कमालीचा संथ नि रुक्ष वाटू शकतो, हीदेखील एक बाजू आहे. अखेर ज्याची त्याची जडणघडण नि विचारसरणी इथे मॅटर करते. ‘काबुलीवाला’ आणि ‘थ्री ऑफ अस’ या दोन्हीही कलाकृती भिन्न कालखंड दर्शवणाऱ्या, पण मानवी भावविश्वातील अनुबंध अलगदपणे उलगडणाऱ्या तृप्तरचनाच होत!






