
पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता. रस्त्यातच पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक गाडला गेला आहे. या ट्रकसह दोन दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचे सांगितले जात आहे. ट्रक मागे घेत असताना पेव्हर ब्लॉक खचून ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला. घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान तातडीने पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





