मुंबई : राज्यातील शिक्षक भरती घोटाळा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता, तर पुण्यात एका आयएएस अधिकाऱ्याने चक्क बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा प्रकारही उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर, आता दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शिक्षक (teacher) भरतीचा घोटाळा साताऱ्यात झाल्याचे समोर येत आहे. त्याच अनुषंगाने सातारा (Satara) जिल्ह्यात 581 दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्या सुरू असून आत्तापर्यंत 162 दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्या झाल्या आहेत. या तपासणीमध्ये आत्तापर्यंत 25 शिक्षक अपात्र तर 11 शिक्षक गैरहजर राहिल्यामुळे एकूण 36 शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटीसा धाडल्या आहेत. त्यामुळे, शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अपात्र शिक्षकांनी आरोग्य विभागाकडे बोट दाखवलं आहे.
सातारा जिल्ह्यात दिव्यांग शिक्षकांना आरोग्य यंत्रणेने यापूर्वी दिलेली ऑनलाइन प्रमाणपत्र खोटी ठरवून आता अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा दिल्या जात आहेत. या नोटिसांमुळे दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेलीच प्रमाणपत्रे खोटी ठरवली जात असल्याने प्रमाणपत्र देणारी यंत्रणा बोगस आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. दिव्यांग शिक्षकांना अपात्र कोणत्या कारणाने ठरवले याचे कारण दिले जात नसल्याने त्या विरोधात आता शिक्षक न्यायालयाच्या गेले आहेत.
राज्यात दिव्यांग शिक्षक असल्यास त्याचा लाभ पती-पत्नीला तसेच शिक्षक मुलगा दिव्यांग असल्यास आई-वडिलांना मिळतो. आता, या अपात्र दिव्यांग शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असून जे शिक्षक अपात्र ठरतील त्यांच्यावर फौजदारी किंवा निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती देखील जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिश नायकवडी यांनी दिली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून होत असलेल्या या कारवाईवरच शिक्षकांनी प्रश्न उपस्थित करत आरोग्य विभागाकडे बोट दाखवलं आहे.
शिक्षकांचे म्हणणे काय?
यापूर्वी दिव्यांग तपासणीत हात लावून चेक केले जात होते आणि रिपोर्ट पाहून प्रमाणपत्र ऑनलाइन दिले जात होते. आत्ताच्या तपासणीत शिक्षकांना 10 फुटावर उभे करून केवळ शरीराचा अवयवाची हालचाल करायला सांगून पात्र-अपात्र ठरवले जात आहे. विशेष म्हणजे तपासणी डॉक्टरांच्या टीमने केली तर अपात्र का ठरवलं जात आहे, याची कारणे शिक्षकांनी द्यावीत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. अपात्र ठरवण्याचे निकष काय याची शिक्षकांना माहिती दिली जात नाही, शिक्षक किती टक्के अपंग आहे हे न सांगता केवळ पात्र-अपात्र शेरा मारला गेला. तीन दिवसात म्हणणे मांडा अथवा कारवाईला सामोरे जायचं, अशी भूमिका अधिकाऱ्यांची असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. तर, केंद्र सरकारच्या युडीआय कार्ड असलेल्या दिव्यांग शिक्षकांनाही अपात्रतेची नोटीस पाठविण्यात आली आहे.
निकष बदलल्याने शिक्षक अपात्र – डीएचओ
दरम्यान, यापूर्वी आरोग्य विभागाने पात्र ठरवलेले दिव्यांग शिक्षक आता अपात्र कसे? यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपली बाजू मांडली आहे. पूर्वीचे राज्य शासनाने दिलेले निकष बदलल्याने आत्ताच्या निकषानुसार दिव्यांग शिक्षक अपात्र ठरत आहेत. आरोग्य यंत्रणा कोणालाही चुकीचे प्रमाणपत्र देत नाही, अशी माहिती जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
आणखी वाचा