
ज्ञानेश्वर मुळे11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पर्यावरण रक्षण, विस्थापितांचे पुनर्वसन अशा प्रश्नांची योग्य पद्धतीने उकल करुन एका नव्या, आदर्श शहराच्या निर्मितीची संधी राज्याने सोडता कामा नये. गुजरातेत सध्या ‘गिफ्ट सिटी’चे काम पूर्ण होत आले आहे. इतिहास महाराष्ट्राला विचारणार आहे की, राज्याच्या निर्मितीनंतर नेमके कोणते ‘नवे’ शहर तुम्ही वसवले?
त्या डोंगराच्या खांद्यावर उभे राहून तुम्ही खाली पाहिले, तर तुम्हाला एखाद्या स्वप्नासारखा सुंदर नजारा दिसतो. डाव्या बाजूला पर्वतांची रांग आणि तिला लगटून वाहणारी नदी. समोर, उजवीकडे आणि ज्यावर आपण उभे आहोत, या सगळ्याच देखण्या रांगा. अगदी समोर खाली दरीत पाहिले, तर आपण उभे असलेल्या आणि समोरच्या डोंगरांच्या मधोमध एक सुंदर तलाव आपले ध्यान आकर्षित करतो. डावीकडची पर्वतराजी आणि अगदी उजवीकडची, थोडी दूरवरची पर्वतराजी गर्द हिरव्या झाडांनी भरुन गेलीय. समोरच्या डोंगरावर आणि आपण उभे आहोत त्या डोंगरावर मात्र अधूनमधून झाडांमध्येच लपलेली घरे, अन्य इमारती अंधुकशा दिसताहेत. ढग मस्तपैकी मनमानी करीत हुंदडताहेत. तलावाच्या बांधाचा पूल या तीरावरुन त्या किनाऱ्याकडे जात निवांत पहुडला आहे. एक छोटीशी लहरही तलावाची ध्यानस्थ अवस्था भंग पाऊ देत नाही. आणि चारी बाजूचे डोंगर आश्चर्यचकित होऊन स्वत:ची तंतोतंत प्रतिमा त्या पाण्यात बघत रममाण झाले आहेत…
हे वर्णन स्वित्झर्लंडचे नाही, अॅमेझॉनचे नाही की इटलीतील पोर्टोफिनोचे नाही. पुण्यापासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या ‘लवासा’चे हे वर्णन. आतापर्यंत आपण या पहाडांच्या अत्युच्च बिंदूवरुन खालचे, आजूबाजूचे स्वर्गीय सौंदर्य पाहिले. आता खाली उतरुया आणि पोर्टोफिनो या इटलीच्या नगरीची प्रतिकृती म्हणून उभारलेल्या लवासाकडे जाऊया. थोडक्यात, स्वप्नातून सत्याकडे…
तलावाच्या बाजूलाच ‘पोर्टोफिनो’ या नावाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या आणि तलावाच्या मध्ये बहुमजली इमारतींची माळ आहे. कुठुनही तलाव दिसावा अशा बेताने बांधलेली ही घरे आहेत. पण, तिथं माणसांचा वावर नाही. किंवा फारच कमी आहे. इमारती मूलत: चांगल्या असाव्यात, पण रंगरंगोटी आणि देखभाल नसल्यासारख्या. संपूर्ण परिसरात एक उदासी दाटलेली. उजवीकडे टेकडीवर अर्धवट सोडून दिलेल्या बंगल्यांचे आणि व्यवसायासाठी उभारलेल्या इमारतींचे सांगाडे. काही घरांच्या बाल्कनीत वाळायला घातलेल्या कपड्यांची रांग. संपूर्ण रस्ता ओलांडून तलावाच्या दुसऱ्या बाजूला गेलो. जाताना एखाद्या मोठ्या गावात असावे तसे, पण अत्यंत तकलादू बांधकाम असलेले दुकानांच्या रांगेने भरलेले मार्केट. इथले एकमेव. तलावाच्या दुसऱ्या बाजूलाही अशाच अर्धवट बांधलेल्या निर्जीव इमारतींचे सांगाडे. जिकडे पाहावे तिकडे असेच दृश्य. रम्य परिसराच्या पार्श्वभूमीवर मनाला खंत वाटावी असे ओरखडे.
मात्र, अजूनही आशा वाटावी असे दोन ओअॅसिस इथे तग धरुन आहेत. एकेकाळी इथे ऑक्सफर्ड विद्यापीठ येईल, अशी अपेक्षा होती. ते काही आले नाही. पण, बेंगळुरुच्या क्राइस्ट युनिव्हर्सिटीची शाखा इथे आहे. त्यामुळे आजही इथे शिक्षक आणि विद्यार्थी मिळून दोनेक हजार रहिवासी आहेत. दुसरे ओअॅसिस म्हणजे, आशियाना कंपनीचा ‘ज्येष्ठ नागरिक अधिवास’. या दोन संस्थांमुळे आणि खरे तर क्राइस्ट युनिव्हर्सिटीमुळे लवासाच्या हृदयाची धडधड जिवंत आहे. तलावाकाठची दुकाने, काही घरांमधले रहिवासी यांचा वावर यामुळे हा परिसर थोडाफार टिकून आहे. अपोलो हॉस्पिटलच्या भव्य इमारतीत फक्त एक डॉक्टर आहे.
या मृत्युपंथाला लागलेल्या लवासाचे करायचे तरी काय? इथे अजूनही एक आदर्श, मध्यम आकाराचे शहर उमलू शकेल का, या प्रश्नाने खरं तर मी अस्वस्थ झालोय. मान्य आहे, पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केले असतील. मान्य आहे, विस्थापनाचे आणि पुनर्वसनाचेही काही गंभीर मुद्दे असतील. मान्य आहे की, या प्रकल्पावर ८ हजार कोटींचे कर्ज आहे, दिवाळखोरी प्रकरणी न्यायालयाने एका कंपनीला एकचतुर्थांश किमतीला तो देऊनही सदर कंपनी वेळेत पैसे भरु शकली नाही आणि प्रकल्प पुनरुज्जीवनाचा मार्ग पुन्हा शून्यापासूनच सुरू करावा लागेल.
पण, हे सगळे प्रश्न इतके अवघड आहेत का? पुण्यासारखी, मुंबईसारखी शहरे पर्यावरणाच्या विनाशावरती आजही विस्तारत आहेत. परिसरातील नद्या, टेकड्या, वृक्षराजी, शेतजमीन सगळे अशा वाढत्या शहरांनी गिळंकृत केले आहेत. तरीही त्यांच्याच विकासासाठी नवे पूल, नवे रस्ते यांच्या गोष्टी आपण करत असतो. आपण नवी शहरे केव्हा उभारणार?
महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रशासनाने पुढाकार घेऊन हा प्रकल्प ताब्यात घ्यायला हवा. पर्यावरण रक्षण, विस्थापितांचे पुनर्वसन अशा प्रश्नांची योग्य पद्धतीने उकल करुन एका नव्या, आदर्श शहराच्या निर्मितीची ही संधी राज्याने सोडता कामा नये. स्वातंत्र्यानंतर एक चंदीगड वगळता दुसरे नाव घ्यावे असे नवे शहर भारताने वसवले नसावे. गुजरातेत सध्या ‘गिफ्ट सिटी’चे काम पूर्ण होत आले आहे. इतिहास महाराष्ट्राला विचारणार आहे की, राज्याच्या निर्मितीनंतर नेमके कोणते ‘नवे’ शहर तुम्ही वसवले?
प्रश्न भ्रष्टाचार, पर्यावरण व्यवस्थापनाचा नाही. प्रश्न भूतकाळात काय झाले, याचाही नाही. प्रश्न प्रगतिशील, आधुनिक तरीही मानवी जीवन उंचावणाऱ्या संकल्पनांच्या अभावाचा आहे. जोपर्यंत अशा संकल्पनांचे बगीचे लोकशाहीला समृद्ध करत नाहीत, तोपर्यंत आपल्या स्वप्नांचे थवे हवेतच विरणार आहेत.
(संपर्कः dmulay58@gmail.com)