
ज्ञानेश्वर मुळे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सुसंस्कारी समाजात अपघात हे अपघातानेच होतात. तिथे बेजबाबदार वाहनचालक, खराब रस्ते तयार करणारे अभियंते / ठेकेदार, लाचखोरी करणारे पोलिस आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर त्वरित, कडक कारवाई होते. अशा समाजात प्रत्येकाला न्याय मिळतो, दोषींना शिक्षा होते.
आपल्या देशात दरवर्षी रस्त्यावरील अपघातांमध्ये अगणित लोक मृत्युमुखी पडतात. आणि आपल्या सर्वांच्या नाकर्तेपणामुळे अशा प्रकारे अपघातातील बळींची संख्या वाढत चालली आहे. २०२१ मध्ये १ लाख ५३ हजार ९७२ लोकांची जीवनज्योत अपघातात मालवली. आपण काळजी घेतली असती तर ही संख्या कमी झाली असती. पण, २०२३ मध्ये ही संख्या १ लाख ७३ हजार इतकी वाढली. एक लाख लोकांमागे १४ बळी हा अपघाती मृत्यूचा दर इतर देशांच्या तुलनेत खूप अधिक आहे.
शिवाय, भारतात अपघाती मृत्यूंची संख्या प्रत्यक्षातील आकड्यापेक्षा कमी दर्शवली जाते. हे अपघात होण्यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले- मानवी चुका. दुसरे- रस्त्यांची अवस्था आणि तिसरे- वाहनांची स्थिती. त्यातही मानवी चुका आणि वेगमर्यादा ओलांडणे हेच ७२.३ टक्के अपघातांमागचे कारण आहे. पण, अन्य दोन कारणेही मानवनिर्मित आहेत. आणि या दोन्हींमध्ये माणसाचा निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमता अथवा रस्त्यांच्या स्थितीबाबत बोलायचे झाले तर त्याला भ्रष्टाचार कारणीभूत आहे, हे आपल्या लक्षात येते.
साधारण १९ वर्षांपूर्वीची घटना. अश्विनी जप्तीवाले ही चमकदार डोळ्यांची बुद्धिमान मुलगी वाडिया कॉलेजला जात होती. नुकताच तिने ‘एमएससी-टेक’ला प्रवेश घेतला होता. अश्विनी अतिशय साहसी, गिर्यारोहण, ट्रेकिंग यांची आवड असलेली आणि चेहऱ्यावर सतत हास्य असणारी खेळकर तरुणी. तो कॉलेजचा पहिला दिवस होता. पाऊस भरपूर पडत होता आणि रस्त्यात खड्ड्यांचाही तुटवडा नव्हता. अशात अश्विनीचा अपघात झाला आणि ती गेली. कितीतरी आशा-आकांक्षांचा, स्वप्नांचा आणि एका उज्ज्वल भविष्याचा क्षणार्धात शेवट झाला. आईवडिलांच्या डोळ्यासमोर दिवसा अंधार झाला. आज १९ वर्षे उलटली तरी अश्विनीच्या आठवणी तिच्या आईच्या मनातून जात नाहीत. काही वर्षांपूर्वी अश्विनीचे वडील चंद्रहास जप्तीवाले यांचे निधन झाले.
मुलीच्या अपघातानंतर या जप्तीवाले दाम्पत्याने आपली वेदना जगासमोर न दाखवता मुलीची स्मृती कायम राहावी म्हणून ‘अश्विनी स्मृती प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या प्रतिष्ठानचे काम बहुआयामी आहे. सर्वप्रथम त्यांनी ज्या शाळा- कॉलेजात अश्विनी शिकली, त्यांना देणगी देऊन तिथे कायमस्वरुपी शिष्यवृत्ती, पुरस्कारांची व्यवस्था केली तसेच स्मृती सभागृह बांधले. एवढ्यावर न थांबता, वृद्धाश्रमापासून ते अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंत विविध कार्ये करणाऱ्या समाजसेवी संस्थांना वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करण्याचे काम अविरत सुरू ठेवले आहे.
अश्विनीच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी एका समाजसेवी व्यक्तीचा आणि काही संस्थांचा सत्कार करण्याचा उपक्रमही राबवला जात आहे. आणि हे सगळे कार्य शासकीय मदत न घेता सुरू आहे. या वर्षीच्या स्मृती कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला मिळाली. विदेशात संकटात सापडलेल्या भारतीयांची सुटका करुन त्यांना भारतात परत आणण्याचे काम करणाऱ्या रेडियो संस्थेची सीइओ धनश्री पाटील हिचा माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला. या संस्थेचा मी संस्थापक असलो, तरी सगळे काम धनश्रीच करते. ज्या तळमळीने ती हे काम करते, ते शब्दांत सांगणे कठीण आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने, भारतात वाहन अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंविषयी मी काहीशी कटू शब्दांत आपली वेदना मांडली. रस्त्यावरील बहुतांश अपघात हे अपघात नव्हे, तर ती हत्या असते. या हत्या व्यवस्था आणि समाज करत आहेत. योग्य प्रकारे रस्ते न बांधणे, रस्त्यांची देखभाल न ठेवणे, त्यात भ्रष्टाचार करणे, मॅनहोल उघडी ठेवणे, पादचारी मार्गांचा अभाव या सगळ्या मानवनिर्मित गोष्टी आहेत.
कामात केलेली हलगर्जी, सर्रास पैसे खाण्याची व्यवस्था आणि त्याला आज असलेली समाजमान्यता या गोष्टी बहुसंख्य अपघातांना जबाबदार आहेत. याशिवाय, जेव्हा नागरिक स्वत: वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघर असलेल्या शहरात हेल्मेटसक्ती नको म्हणून आंदोलने होतात, आपल्या मुलांना सुसाट वेगात वाहने चालवू देतात, तेव्हा होणारे अपघात हे अपघात नसून संपूर्ण समाजव्यवस्थेने केलेल्या त्या हत्या असतात.
सुसंस्कारी समाजात अपघात हे अपघातानेच होतात. तिथे बेदरकार वाहने चालवून बळी घेणारा चालक, खराब रस्ते तयार करणारे अभियंता / ठेकेदार, ट्रॅफिकच्या गुन्ह्यांकडे कानाडोळा करत लाचखोरी करणारा पोलिस आणि वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर त्वरित, कडक कारवाई होते. अशा समाजात प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतो आणि दोषींना शिक्षा होते. रस्त्यावरच्या अपघातात एकाही युवक – युवतीचा बळी जाणे हा संपूर्ण समाजावरचा कलंक आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मानाने जगण्याचा आणि स्वत:च्या आशा-आकांक्षांना, स्वप्नांना मूर्त रुप देण्याचा अधिकार अशा मृत्यूंमुळे नाकारला जातो. रस्त्यांवरचे अपघात ही गंभीर गोष्ट आहे आणि त्यांची वाढती आकडेवारी ही लाजिरवाणी बाब आहे.
तथापि, एखादा अपवाद वगळता या विषयावर गंभीरपणे बोलताना मी एकाही नेत्याला पाहिलेले नाही. दररोज वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या अपघातांच्या बातम्यांची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, आपण ते मानसिक पातळीवर स्वीकारले आहेत. मध्यंतरी बिहारमध्ये एकाच महिन्यात १० – १५ पूल कोसळले; पण त्याबाबत राजकीय नेते, प्रशासक आणि समाजधुरिणांनी एकही शब्द काढला नाही. कोसळणारे पूल हे कोसळणाऱ्या समाजाचे प्रतीक आहे. परवा गुगल मॅप लावून जाणारी गाडी एका अर्धवट काम झालेल्या पुलावरुन कोसळल्याने तीन युवकांचा बळी गेला. या घटनेतून काय अर्थ काढायचा? आपल्याला आपल्या नागरिकांच्या जीविताची यत्किंचितही काळजी नाही, हेच ना?
विकसित आणि सुसंस्कृत भारतात एकाही नागरिकाचा रस्त्यावरच्या अपघातात नाहक बळी जाता कामा नये. अश्विनीच्या बाबतीत जे झाले, ते तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या बाबतीत व्हायला नको. त्यासाठीची व्यवस्था तयार करुया.
(संपर्कः dmulay58@gmail.com)