
Peeing Every Hour Health Sign: पावसाळ्यात लोकांना वारंवार लघवीला जावे लागते, कधी-कधी तर दर तासाला जावे लागते. पावसाळ्यात आपल्याला हे नॉर्मल वाटतं. अनेकदा जास्त पाणी प्यायल्यामुळेच सारखं सारखं लघवीला होतं, असा आपला समज असतो. पण अनेकदा हे असंच असेल असं नाही. वारंवार लघवीला होणं हे आजाराचं लक्षणदेखील असू शकतं. आरोग्य तज्ञांनी याबद्दल माहिती दिलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आरोग्य समस्यांचे लक्षण कोणती?
उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात लघवीचे प्रमाण वाढते, कारण थंड हवामानात घाम कमी येतो आणि शरीरातील अतिरिक्त पाणी लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. थंडीमुळे मूत्राशयावर परिणाम होतो. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, आणि श्वासाद्वारे शरीरात ओलावा प्रवेशतो, ज्यामुळे फुफ्फुसांना कमी पाण्याची गरज भासते. परिणामी, लघवीचे प्रमाण वाढते. तथापि, दर तासाला लघवीचा दबाव येणे हे काही आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
कितीवेळा लघवी होणे सामान्य?
नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील मूत्ररोग तज्ञ डॉ. अमरेंद्र पाठक यांनी याबद्दल माहिती दिलीय. 24 तासांत 7 ते 8 वेळा लघवी होणे सामान्य आहे. परंतु जर एखाद्याला प्रत्येक तासाला लघवीला जावे लागत असेल, तर ही समस्या गंभीर असू शकते.
पुरुषांमध्ये समस्या?
पावसाळ्यात लोक जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी पितात, ज्यामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असतात, ज्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शिवाय 40 ते 45 वयानंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. इतर काही आरोग्य समस्यांमुळेही ही समस्या उद्भवू शकते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.
वारंवार लघवी होतेय?
मूत्राशयात साधारण 300 ते 400 मिली लघवी साठवण्याची क्षमता असते. परंतु मूत्राशय संवेदनशील झाल्यास, 100 मिली लघवी जमा झाल्यावरही लघवीचा दबाव जाणवतो. याला ‘ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर’ म्हणतात. प्रोस्टेटच्या समस्या, मूत्रमार्गाचा संसर्ग, किंवा रक्तातील साखरेची उच्च पातळी यामुळेही वारंवार लघवी होऊ शकते. काही हृदयरोग्यांना रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दिली जाणारी औषधेही लघवीचे प्रमाण वाढवू शकतात, अशी माहिती डॉ. पाठक यांनी दिली.
काय घ्याल काळजी?
मधुमेहींना वारंवार लघवीला जावे लागते, कारण साखर लघवीद्वारे बाहेर टाकली जाते, ज्यामुळे मूत्रमार्ग संसर्गाचा धोकाही वाढतो.मूत्ररोग तज्ञांच्या मते, हिवाळ्यात लघवीचे प्रमाण वाढणे सामान्य आहे, परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करावे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवावा. मूत्रमार्ग संसर्गाची शंका असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासणी करावी. वारंवार लघवीची समस्या असल्यास प्रथम मूत्ररोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.
चाचण्यांचा निकाल?
शारीरिक तपासणीनंतर डॉक्टर औषधे सुचवू शकतात. यानंतर, लघवीचा प्रवाह तपासणी, अल्ट्रासाऊंड, लघवी चाचणी आणि रक्तातील साखरेची चाचणी केली जाऊ शकते. या चाचण्यांच्या निकालांवरून समस्येचे मूळ कारण समजेल, आणि त्यानुसार औषधोपचाराने वारंवार लघवीची समस्या कमी होऊ शकते.