तुमची घोरण्याची सवयच ठरतेय हृदय विकाराचे कारण, आत्ताच सावध व्हा!

0
1
तुमची घोरण्याची सवयच ठरतेय हृदय विकाराचे कारण, आत्ताच सावध व्हा!


Snoring can Lead To Heart Attack: अनेकांना रात्री झोपताना घोरण्याची सवय असते. या सवयीमुळे इतरांच्या झोपेत तर अडथळा येतोच, अनेकदा या घोरण्याकडे ‘हे साधारण आहे’ किंवा ‘वयानुसार असे होतच राहते’ असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या घोरण्याच्या समस्येचा थेट संबंध हृदयाच्या आरोग्याशी असू शकतो. संशोधनानुसार, जे लोक झोपेत मोठ्याने घोरतात; त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढतो. तुमच्या घोरण्याचा शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? यावर उपाय काय आहेत? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

झोपेत घोरण्याची मुख्य कारणे कोणती? 

1. श्वसनसंस्थेच्या समस्या: सर्दी किंवा अॅलर्जीमुळे नाक चोंदलेले असेल तर, श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे घोरण्याच्या समस्या उद्भवू शकते. तसेच घशात टॉन्सिल्स वाढल्यामुळे श्वसननलिकेचा मार्ग लहान झाल्यामुळे किंवा नाकाचे हाड वाकडे असल्यास एका नाकपुडीतून श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळेही घोरण्याची समस्या होऊ शकते. 

2. वाढलेले वजन: ज्यांचे वजन अधिक असते, त्यांच्या मानेभोवती चरबीचे प्रमाण अधिक असते. या चरबीमुळे झोपताना श्वसननलिकेवर दबाव निर्माण होतो. ज्यामुळे श्वसनप्रक्रियेत अडथळा येतो. 

3. झोपण्याची चुकीची पद्धत: जेव्हा तुम्ही पाठीवर झोपता तेव्हा, गुरुत्वाकर्षणामुळे जीभ घशाच्या मागील बाजून झुकली जाते. यामुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होऊन घोरण्यचा आवाज येतो. 

4. धूम्रपान किंवा थकवा: झोपण्यापूर्वी धूम्रपान केल्याने सिगारेटमुळे श्वसननलिकेला सूज आल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच खूप जास्त थकवा असल्यास शरीर गाढ झोपेत असल्यामुळे स्नायू जास्त सैल पडतात आणि घोरण्याचा त्रास होतो. 

5. स्लीप अॅप्निया: ही झोपेची एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. या स्थितीत झोपेत काही सेकंदांसाठी श्वास पूर्णपणे थांबतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

 

सततच्या घोरण्यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या जाणवतात? 

सतत घोरण्यामुळे रात्री झोपेत रक्तदाब वाढतो, जे हृदयासाठी घातक ठरते. तसेच जर तुम्ही दीर्घकाळापासून या समस्येला सामोरे जात असाल तर, हृदयाच्या स्नायूंवर ताण येऊन हृदयाचा आकार वाढू शकतो. घोरण्यामुळे हृदयाचे ठोके अनियमितही होऊ शकतात. याशिवाय इतरही धोके उद्भवतात जसे की, दिवसभर थकवा जाणवणे आणि सतत डुलकी येणे, एकाग्रतेची क्षमता कमी होणे आणि चिडचिड वाढणे, मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता. 

 

घोरणे कमी करण्यासाठी सोपे उपाय: 

पाठीवर झोपण्याऐवजी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याची सवय करा. निरोगी पचनसंस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे अधिक फायदेशीर ठरते. मानेभोवती अतिरिक्त चरबी असेल तर, वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. झोपताना डोक्याखाली उंच थोडी उंच उशी घ्या. तसेच महत्त्वाचे म्हणजे, स्लीप अॅप्निया सारख्या समस्येची लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांना संपर्क करा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link