इंद्रजित भालेराव4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
दसरा आणि दिवाळीच्या मधल्या काळात साळीची कापणी सुरू व्हायची. त्यामुळं आम्ही सकाळ-संध्याकाळ शेतात असायचो. या काळात साळीच्या शेतात खूप करमायचं.
सध्या साळवनाचे दिवस आहेत. साळवन म्हणजे साळीचं शेत. विशिष्ट पीक ज्या शेतात आहे, त्या शेताला तात्कालिक नाव पडतं. ज्या शेतात गव्हाचे पीक आहे, त्याला गव्हाळी म्हणतात. १९७० पर्यंत आमच्या गावाला गहू, साळ, भुईमूग, ऊस, केळी ही पिकं माहीत नव्हती. त्यानंतर आमच्या गावात धरणाचं पाणी आलं आणि गावात नवी पिकंही आली. जमिनीला बारमाही पाणी मिळालं. त्यामुळं या पाण्यावर येणारी ऊस, केळी, संत्री, मोसंबीसारखी अनेक पिकं आली. पूर्वी वर्षात एकच पीक यायचं. आता तीन-तीन येऊ लागली. त्यात गहू आला, भुईमुगाच्या शेंगा आल्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साळीचं पीक आलं. आमच्या खारीच्या रानात वराड्याच्या ठिकाणी हे साळीचं पीक घेतलं जाऊ लागलं. तिकडं पलीकडं चोपणातल्या रानातही साळ पिकवली जाऊ लागली. त्या आधी क्वचित कधी सणावाराला भात खायला मिळायचा. आता अधूनमधून नेहमीच भात खायला मिळू लागला. गव्हाची पोळीही नेहमीचीच झाली.
गावाच्या पूर्वेला, शेवटी आमचं घर होतं. घरासमोरूनच आमचं शेत सुरू व्हायचं. तिथूनच पळशीकडं जाणारा रस्ताही निघायचा. त्या रस्त्याच्या उजव्या हाताला शिवेपर्यंत सगळं आमचं शेत होतं. ते नंतर वडील आणि चुलत्यांच्या वाटण्यांमध्ये तीन जागी विभागलं गेलं. आम्ही शाळेत बसलो की पाठीमागं आमच्या खारीतलं साळवन दिसायचं. आम्ही घरून निघालो की उजव्या हाताला साळवनाच्या काठाकाठानं शाळेत जायचो. तेव्हा या साळीचा सुगंध छाती भरून घ्यायचो. ही नवीन साळ आणि तिचा हा सुगंध सर्वांच्याच कौतुकाचा विषय होता. त्यामुळं रस्त्यानं जाणारे-येणारे शेजारच्या गावचे लोकही छाती भरून हा वास घेऊन जायचे. आम्ही वर्गात बसलेलो असताना या शेतावरून वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत आली की तिच्यासोबत हा सुगंध यायचा आणि मस्त वाटायचं. माझी ‘पेरा’ या संग्रहात असलेली एक कविता त्याच काळाचं प्रतिबिंब आहे. ती कविता अशी आहे…
साळ पिवळी पिकली।
ओल्या भारानं वाकली
सुगंधली ओटीपोटी।
जणू चंदनाची उटी
चिक झाला घट्ट घट्ट।
जणू साखरेचे पीठ
कुसळाचा करव।
जणू तल्वारीचं पातं
आता कोवळ्या हातानं।
चिमणीच्याच दातानं
नाळ कापावी कापावी।
आणि अग्नीला ओपावी
तेव्हा भावानं नवीन मढीसाळ आणली होती. ती सरत्याने पेरावी लागत नसे, तर तिची रोपं आणून शेतात लावावी लागत. परभणीच्या कृषी विद्यापीठाकडून सुरूवातीला या सगळ्या पिकाच्या लागवडीचं शिक्षण दिलं गेलं. आमच्या गावचे सरपंच सखारामजी यांच्या शेतात या साळीची रोपं मिळत असे. ती आणून आमच्या खारीच्या शेतात लावली जायची. रोपं लावायच्या आधी शेतात मढ्या तयार कराव्या लागायच्या. या मढीत घेतलेली साळ म्हणून तिला मढीसाळ असं नाव पडलं होतं. मढी म्हणजे काय? तर मोठं संपूर्ण वावरच वाकानासारखं बांध घालून तयार करायचं आणि त्यात चिखलाचा राडा करायचा. त्या राड्यात ही रोपं नुसती ठेवली की आपोआप आत जायची. आम्ही आमच्या पाहुणेरावळ्यांच्या गावी जुनी साळ पाहिली होती, तशी ही साळ नव्हती. ती बारीक जिऱ्यासारखी होती आणि तिच्यात सुगंधी तांदूळ होता. या साळीचं आमच्या शेतात आलेलं पीक एवढं सुंदर होतं की कृषी विद्यापीठाचे लोकही आश्चर्य करू लागले. विद्यापीठाकडून आदर्श शेतकरी म्हणून दत्तू दादाचा सत्कारही करण्यात आला होता. या नवीन पिकाची पाहणी करायला विद्यापीठाची टीम गावात आली होती.
दसरा आणि दिवाळीच्या मधल्या काळात या साळीची कापणी सुरू व्हायची. त्यामुळं आम्ही सकाळ-संध्याकाळ शेतात असायचो. शाळा असेल तोवर शाळेत असायचो. नेमकीच थंडीची सुरूवात झालेली असायची. या काळात साळीच्या शेतात खूप करमायचं. ही साळ कणाकणानं वाढताना पाहता यायची. तेव्हापासूनच तिचा सुगंध छातीत भरलेला असायचा. खळं सुरू झालं की, आम्ही शेतातच रमायचो. खळ्याचं गुत्तं दिलं असेल, तर आमच्या गावचे बुद्धाचे शंकरमामा आणि त्यांचं कुटुंब साळ कापून तिची सुडी घालीत. सगळी साळ कापून झाली की, दुसऱ्या दिवसापासून तिचं खळं घालीत. जमीन सवान करून, पाण्यानं भिजवून, ठोकून, तुडवून गच्च केली जायची आणि आत औताची खोडं किंवा बाज आणून ठेवली जायची. त्याच्यावर चारी बाजूनं उभं राहून सगळे जण साळ बडवायचे. त्यातून साळी बाजूला पडायच्या आणि तणसाच्या पेंढ्या खळ्याबाहेर फेकल्या जायच्या. साळीची रास तयार व्हायची. मग तिव्ह्यावर उभं राहून साळ उधळून तिच्यातला कचरा बाहेर काढला जायचा आणि पोती भरली जायची. साळ काढून झाली की शेतातली उंदराची बिळं खोदण्यासाठी वडार, कैकाडी गावात बांधव येत. ते त्या बिळांतून खूप साळ बाहेर काढत. उंदरांनी साळीचे तुरे बिळात नेऊन ठेवलेले असत. रानात पडलेल्या साळीच्या एकेका कणासाठी माणसं, उंदरं, पाखरं, जनावरं यांची स्पर्धा सुरू व्हायची. हे सगळं दृश्य मी लहानपणी पाहिलं होतं, तेच पुढं माझ्या एका कवितेत आलं. ‘पीकपाणी’ या माझ्या संग्रहातली शेवटची सर्वा नावाची कविता याच प्रसंगावर आधारित आहे.
या साळीच्या शेताच्या आठवणी खूपच रम्य आहेत. कधी कधी रात्रीच्या वेळी शेतातल्या गड्यांसोबत बाजेवर आम्हीही सुडीला राखण म्हणून झोपायचो. तेव्हा दसरा-दिवाळीच्या दरम्यान स्वच्छ आभाळ आणि चांदणं पडलेलं असे. सालगडी आकाशातल्या एकेका ताऱ्याची ओळख करून देत असे. त्याला हे सगळं आकाशवाचन येत असायचं. पण अर्थातच ते पुस्तकातल्यासारखं नसायचं. वेगवेगळ्या ताऱ्यांची नावं, त्यांचे आकार, त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या पाठीमागच्या लोककथा हे सगळं ऐकायला मिळायचं. हे ऐकत ऐकत आम्ही त्या साळवनात रात्री सुडीच्या शेजारी बाजेवर झोपी जायचो. कधी झोप लागली, तेही कळायचं नाही.
पुढं आमच्या या शेताचं गावाकडच्या भावानं प्लॉटिंग केलं. तुकडे करून ही जमीन लोकांना घर बांधण्यासाठी विकली. आता तिथं एक पर्यायी गाव उभं राहिलं आहे. कधीमधी गावाकडं गेलं आणि या नव्या वस्ती शेजारून जाऊ लागलो की, काळजात कळ उठते. याच ठिकाणी आपल्याला लहानपणी साळवन होतं. तिथं माणसं राबायची आणि उंदरा-मांजराच्या जीवजित्राबांसह एक सृष्टी नांदायची. ती सगळीच सृष्टी आता नाहीशी झाली आहे. तिथं सिमेंटची घरं उभी राहिली आहेत. गावातलीच माणसं तिथं राहतात. आपलीच माणसं आहेत ती. त्यांच्याविषयी प्रेमच आहे. पण, आपण आपल्या स्मृतीच्या डोहात शिरलो की आपोआपच डोळ्यांचा डोह होऊन जातो.
(संपर्कः inbhalerao@gmail.com)







