कापसाच्या हंगामाशिवाय पेंडखजूर कधी खायला मिळायची नाही. त्यामुळं वेचणीचा काळ म्हणजे पेंडखजुरीचा गोड काळ, असं आमच्या डोक्यात पक्कं बसलं आहे. सध्या सगळीकडं कापूस वेचणीची घाई सुरू आहे. रानात माणसं मिळत नाहीत. कापूस वेचणी खूप महागली आहे. रोजानं आलेल्या बायका वेळ काढत कसाबसा कापूस वेचतात, पण किलोनं म्हटलं तर त्या एकेका दिवशी तीस ते चाळीस किलो कापूस वेचतात. हे सगळं पाहताना मला माझं लहानपण आठवतं. घरातली सगळी माणसं लेकराबाळांसह या काळात कापूस वेचायला जायची. उलट रोजागारावरच्या बायका तेव्हा कमीच लागायच्या. आज मात्र सगळ्यांना स्वतःच्या शेतात काम करायचा कंटाळा येतो आणि रोजगारी बायका मिळणं मुश्किल झालं आहे. त्यामुळं आता कापूस वेचणी हे लोकांना महासंकट वाटू लागलंय. पण, आमच्या काळी वेचणी खूप आनंददायक होती. गाणी म्हणत, गप्पागोष्टी करत घरातली सगळी माणसं कापूस वेचायची. कापूस हे आमच्या मराठवाड्यातलं तसं जुनं पीक. त्या काळात आमच्याकडं ‘बगडा’ नावाची कापसाची एक जात होती. त्याची उंची गुडघ्याखालीच असायची. बगड्याला बोंडं आणि कापूसही कमीच असायचा. सुरूवातीच्या काळात, म्हणजे माझ्या शालेय जीवनात हा बगडा कापूस वेचायला मी नेहमी जायचो. स्वतःच्या घरचा कापूस वेचायला वहिनीसोबत आणि बहिणीच्या सासरी गेलं की तिथं तिच्यासोबत वेचायला जात असे. घरी कापूस वेचायचो, तेव्हा त्याचं मोल रोजगारी बायकांबरोबर मी हक्कानं मागून घ्यायचो. पैशाच्या लालचेनं का होईना, काम करायला शिकतोय ना! म्हणून घरचे लोकही पैसे द्यायचे. ते पैसे पुन्हा वडिलांकडं जमा असायचे. ते किती झालेत, याचा कायम घोळ असायचा. ते कधीच परत मिळायचे नाहीत. कारण नवे कपडे आणले की वडील सांगायचे, तुझ्या पैशातले एवढे कटले. आम्हालाही वाटायचं, आपण आपल्या पैशाचे कपडे घेतले, कटू दे कटले तर! शर्ट अंगावर घालताना तो आपण कमावलेल्या पैशाचा आहे, याचा आनंद प्रत्यक्ष हातात पैसे घेण्यापेक्षा जास्त असायचा. बहीण चतुरबाईच्या सासरी गेलो की तिच्यासोबत शेतात जायचो. कापसाच्या रानात आम्ही दोघंच असायचो. तेव्हा ती पाखरांच्या गोष्टी सांगायची. तिला पाखरांची भाषा कळायची. एकेक पाखरू शीळ घालतं म्हणजे काय म्हणतं? ते तसं का म्हणतं? त्याच्या पाठीमागची कथाही सांगायची. त्यातल्या काहींचा उपयोग मी माझ्या लेखनात करून घेतला. काही अशाच वाऱ्यावर गेल्या आहेत. आपला भोवताल जिवंत आहे आणि त्यातल्या प्रत्येक घटकाची एक कथा आहे, हे लक्षात येऊन तेव्हा इतकं उदात्त वाटायचं की रानावनातही खूप करमायचं. आपल्या भोवतीचं जग किती सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे, असं वाटायचं. हे सगळं करताना बहिणीचा सासुरवास हलका व्हायचा. तिच्या कथा – गाणी माझं आणि तिचंही मनोरंजन करायचे. तिचं मन हलकं हलकं व्हायचं. मी कापूस वेचायला जायचो, त्या दिवशी घरी परत आलं की बहिणीची सासू, ज्यांना मी आत्या म्हणायचो; त्या मला पेंडखजूर खायला द्यायच्या. एका अर्थानं मी शेतात केलेल्या कामाची ती गोड मजुरी असायची. शिवाय, मी गावी परत निघायचो, तेव्हा शंकर दाजी तालुक्याला जाऊन माझ्यासाठी कापड आणायचे. मला टेलरकडं न्यायचे. तो माझं माप घेऊन छान कपडे शिवायचा. त्याच्याकडं जाण्यात मला खूप आनंद वाटायचा, कारण त्याच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं एक कॅलेंडर लावलेलं असायचं. त्यात बाबासाहेब शाळेत जाताना, परदेशात जाताना, मंत्री असताना, राज्यघटना लिहिताना असे फोटो होते. ते मला फार पाहावे वाटायचे. शेतातून कापूस आला की, तो घरातल्या अंबारात भरून ठेवणे, हा एक कार्यक्रम असायचा. अंबरात कापूस भरताना तो तुडवून भरला जायचा. त्यासाठी आम्हा सर्व लेकरांना अंबारात उतरवायचे आणि कापूस टाकायचे. आम्ही तो तुडवून त्यावर उड्या मारून मारून जास्तीत जास्त कापूस अंबारात भरायचो. खूप मजा यायची. कापसावर उड्या मारताना फार आनंद वाटायचा. अंबार भरत आल्यावर कधी कधी त्यावर आम्ही झोपायचोही. कारण तेव्हा घरी गादी नव्हती, गादीवर झोपण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळं हा अख्खा कापूस आणि त्यावर झोपणं म्हणजे गादीपेक्षाही भारी वाटायचं. कापसाचा एक विशिष्ट गंध यायचा. तो छान वाटायचा. आम्ही लेकरं त्या कापसावर उड्या मारत राहायचो आणि थकलो की लोळत राहायचो. तिथंच एकमेकांना गोष्टी सांगत बसायचो. कापूस अंबारात भरण्यासारखाच तो विकायला नेताना गाडीवर भोत भरणे, हा एक कार्यक्रम असायचा. संध्याकाळी गाड्या लावल्या जात. त्यावर भोत उभे केले जात आणि त्यात कापूस भरला जाई. आम्ही मुलं तोही कापूस तुडवून द्यायचो. टच्चून कापूस भरला की भोत शिवले जायचे आणि पहाटेच गाड्या हिंगोली किंवा पूर्णेच्या आडतीवर जायच्या. या भोतावर बसून दादासोबत जायची संधी कधी तरी आम्हाला मिळायची. त्या निमित्तानं एक वेळ हॉटेलमध्ये भजी खायला मिळायची. कधी कधी दादा जिलबीही खाऊ घालायचा. ती मजा खूप भारी वाटायची. त्यामुळं कुठल्या तरी निमित्तानं एकदा कापसाच्या भोतावर जायला पाहिजे, असं वाटायचं. शेतातला कापूस गेला की, मग बोंदरी वेचणं सुरू व्हायचं. बोंदरी म्हणजे कापसाचा सरवा असायचा. राहिलीसाहिली बोंडं, झाडाझुडपात उडून गेलेला, खडोळीनं बाभळीवर खोप्यासाठी नेलेला कापूस आम्ही काढायचो. या संदर्भात एक कविताही मी लिहिली होती. ‘माझ्या काबाडाचे धनी’मध्ये ती आहे. शरद जोशी आणि मारुती चितमपल्ली यांना ती फार आवडली होती. शरद जोशींनी एका भाषणात तिचा उल्लेख केला होता. त्यांचं ते भाषण ‘मळ्यातील अंगार’ या पुस्तकात आलं आहे. मारुती चितमपल्लींनी मला या कवितेविषयी सविस्तर पत्र लिहिलं. भीमराव धोंडे यांच्या शेतकरी आत्महत्यांवर आधारित ‘तहान’ या सिनेमात ही कविता गाणं म्हणून वापरली आहे. प्रशांत मोरे या कवी मित्रानं ती गायली आहे. ठाकूर नावाच्या संगीतकारानं तिला संगीत दिलं आहे. ही बोंदरी म्हणजे आमच्या मालकीचा कापूस असायचा. त्यात थोडाफार कचरा असायचा आणि त्याचा रंगही मळकट असायचा. त्यामुळं त्याला चांगल्या कापसाइतका भाव मिळत नसे. पण, गावातले दुकानदार त्याच्या भारंभार पेंडखजूर द्यायचे. म्हणजे एका तागड्यात कापूस, दुसऱ्या तागड्यात पेंडखजूर टाकून कापसाच्या वजनाइतकी खजूर दिली जायची. पेंडखजूर खायला मिळायची, त्यामुळं आम्ही रानातला असा कापूस बोंदरीच्या रूपात गोळा करून न्यायचो. कापसाच्या हंगामाशिवाय आम्हाला पेंडखजूर कधी खायला मिळायची नाही. त्यामुळं कापूस वेचणीचा काळ म्हणजे पेंडखजुरीचा गोड काळ, असंच आमच्या डोक्यात पक्कं बसलं आहे. (संपर्कः inbhalerao@gmail.com)
Source link





