
नागपूर : भारतातील पहिले “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” जवळजवळ आठ ते दहा वर्षांपूर्वी नागपुरात तयार झाले. वनखात्याच्या अखत्यारीतील या सेंटरमध्ये फक्त वन्यजीवांवर उपचारच केले जात नाहीत, तर उपचारानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. याच सेंटरमध्ये पक्ष्यांच्या पंखात बारीक रॉड टाकून त्याला उडण्यास सक्षम केले गेले. तर हरणाच्या पायात रॉड टाकून त्याला चालण्यायोग्य स्थितीत आणले. पॅरालाईज झालेल्या बिबट्याला चालण्याच नाही तर धावण्यायोग्य केले आणि आता नवा आयाम या केंद्रात जुळला आहे. सेंटरमधील “इनक्यूबेटर” मध्ये ठेवलेल्या अंड्यांमधून अजगराची पिल्लं जन्माला आली आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात देखील मुक्त करण्यात आले.
तापमान, आर्द्रता, हवेचा प्रवाह यासारख्या पर्यावरणीय परिस्थितीला “इनक्यूबेटर”च्या माध्यमातून नियंत्रित करता येते. बहुतेकदा हे “इनक्यूबेटर” सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी, अंडी कृत्रिमरीत्या उबवण्यासाठी, रासायनिक किंवा जैविक अभिक्रिया करताना योग्य परिस्थिती प्रदान करण्यासाठी वापरली जातात. वन्यजीव प्रजातीसाठी “इनक्यूबेटर”चा वापर कदाचित नवखाच आहे. काही दिवसांपूर्वी सेमीनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये अजगर आणि त्याची सहा अंडी आणली गेली. एक शेतकऱ्याने त्याच्या शेतात अजगर व त्याची अंडी असल्याचे पाहिले. त्यामुळे शेतीची कामे रखडल्याने त्याने सर्पमित्राला याची माहिती दिली.
सर्पमित्राने अजगराच्या “रेस्क्यू” केले आणि ती अंडी गोळा करून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणून दिली. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाने त्या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आणि त्याची अंडी “इनक्यूबेटर” मध्ये ठेवली. सुमारे २५ दिवसांनी त्या अंड्यांमधून अजगराची सहा पिल्लं बाहेर आली. ही पिल्लं बाहेर येताच सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना देखील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. यापूर्वी देखील या “इनक्यूबेटर” मध्ये अजगराची अंडी उबवण्यात आली होती आणि त्यातून अजगराची १३ पिल्लं बाहेर पडली होती. त्यावेळी देखील या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
आता वन्यप्राण्यांच्या बचड्यांसाठी देखील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्यें “इनक्यूबेटर” आणले जाणार आहे, जेणेकरून वन्यप्राण्यांची कमजोर असलेली पिल्ले या माध्यमातून तंदुरुस्त करण्यात येतील. भारतातील या पहिल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची संकल्पना तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी मांडली होती.
वनखात्याचे तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. २०१५-१६ मध्ये त्याचे उदघाटन झाले. राज्यात याच धर्तीवर ११ ठिकाणी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहे. तर इतर राज्यात देखील नागपूरच्या या सेंटरची पाहणी करून तसेच सेंटर उभारले जात आहे.