अरविंद जगताप6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लग्न दोन दिवसांवर आलं होतं. लग्नात दोघेही मनापासून नटले होते. सगळे आनंदात होते. अचानक तन्मयने स्टेजवर श्रावणीला विचारलं, ‘तू गिरीशला बोलवलं नाहीस ना?’
तन्मयला श्रावणी बघताक्षणी आवडली होती. दोघं एकाच जिममध्ये जायचे. एक दिवस तन्मय चुकून लवकर गेला आणि तिथं त्याला श्रावणी दिसली. ट्रेडमिलवर. एरवी उशिरा उठणारा तन्मय मग लवकर जिमला जाऊ लागला. श्रावणी कानात हेडफोन लावून व्यायाम करायची. खरं तर तिला व्यायाम करायची काय गरज आहे? असं प्रत्येकाला वाटायचं, एवढी ती मेंटेन होती. पण, तिला कायम तसंच राहायचं होतं. स्वतःबद्दल खूप जागरूक होती ती. तन्मय हळूहळू तिची माहिती काढू लागला. श्रावणीचा पर्सनल ट्रेनर होता.. गिरीश. तन्मयने त्याच्याशी मैत्री केली. दोघे दोन-तीन वेळा पार्टीला गेले. गिरीशकडून त्याला श्रावणीबद्दल खूप गोष्टी कळल्या. ती एका बँकेत आहे. चांगली पोस्ट आहे. स्वभाव खूप मनमिळाऊ आहे. तन्मय सगळ्या गोष्टी ऐकून मनोमन ठरवत होता की, लग्न करायचं तर श्रावणीशी. आणि त्यासाठी त्याला काही करायची गरजही पडली नाही. माहिती काढता काढता त्याला कळलं की, श्रावणीची आई आणी त्याची आई एकाच योगा क्लासला जातात. हळूहळू त्याने आईला आपली आवड सांगितली. आईने श्रावणीच्या आईकडे विषय काढला. बघायचा कार्यक्रम ठरला. श्रावणी आणि तन्मयच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
तन्मयला नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं. तो शहरातला प्रसिद्ध डॉक्टर होता. श्रीमंत होता. देखणा होता. श्रावणीने काही दिवसांतच होकार कळवला. लग्नाची तयारी सुरू झाली. तन्मय आणि श्रावणी अधूनमधून भेटत होते. दुपारी किंवा संध्याकाळी श्रावणी भेटायला लागल्यापासून तन्मयने सकाळी जिमला जाणं बंद केलं होतं. एक दिवस अचानक जाग आली आणि जिममध्ये गेला, तर गिरीश श्रावणीला काहीतरी शिकवत होता. तो पर्सनल ट्रेनर होता. नेहमीच काही ना काही सूचना करायचा. पण, गिरीशने श्रावणीच्या खांद्याला हात लावायची काय गरज आहे? आणि एवढ्या जवळून बोलायची काय गरज आहे? बरं, श्रावणीने एवढं हसायची काय गरज आहे? असे अनेक प्रश्न तन्मयच्या डोक्यात आले. एक तर जिमचा ट्रेनर म्हणजे बायकांशी लगट करणारा अशीच बिचाऱ्याची प्रतिमा बनलेली असते. त्यात तन्मयला तिथं येऊन दोन मिनिटं झाले असतील, पण अजूनही दोघांनी त्याच्याकडं लक्षही दिलं नव्हतं. काही वेळाने श्रावणीचं लक्ष गेलं, तर ती काहीच न घडल्यासारखी तन्मयशी बोलू लागली.
तन्मयला हे आणखी अस्वस्थ करणारं होतं. श्रावणीला वाटलं तन्मय जिममध्ये आलाय. पण, तसं नव्हतं. तन्मय तिला म्हणाला की, मी तुला घरी सोडतो. दोघे निघून गेले. जाता जाता श्रावणीने गोड हसत गिरीशचे आभार मानले. तन्मयचा अजूनच जळफळाट झाला. एरवी श्रावणी व्यायाम झाल्यावर कपाळावरचा घाम पुसायची तेव्हा खूप गोड वाटायची तन्मयला. पण, आज त्याचं या गोष्टीकडं लक्षच नव्हतं. कधी एकदा गिरीशचा विषय काढू, असं झालं होतं त्याला. पण, त्यानं तसं केलं नाही. तो शांत राहिला. आणि शहरातल्या एका अत्यंत महागड्या जिममध्ये श्रावणीला मेंबरशिप मिळवून दिली. श्रावणीने त्याला सांगून पाहिलं की, कशाला एवढा खर्च करायचा? पण, तन्मय म्हणाला, ‘हे गिफ्ट आहे. यू डिझर्व्ह धिस..’ श्रावणी मनामोन खुश झाली. तिला खरं कारण माहीतच नव्हतं. पण, काही दिवसांत भलतीच घटना घडली. एक तरुण जिममध्ये हृदयविकाराचा झटका येऊन पडला. जागच्या जागी गेला. जिम बंद होती काही दिवस. एका आठवड्याने सुरू झाली. पण, श्रावणी काही परत त्या जिममध्ये गेली नाही. तिची हिंमत झाली नाही. श्रावणीने घरीच व्यायाम सुरू केला. तन्मयची डोकेदुखी गेली. पाच-सहा दिवसांनी संध्याकाळी तन्मय श्रावणीच्या घराकडून जात होता. त्याला गिरीश घरातून बाहेर येताना दिसला. त्याला धक्का बसला. तो थेट श्रावणीकडं गेला. तिनं सांगितलं की, मी आता घरीच व्यायाम करते. गिरीश येतो आठवड्यातून दोन-तीनदा. ट्रेनिंगसाठी. तन्मयला आपला राग कसा लपवावा, प्रश्न पडला.
तन्मय आणि श्रावणी कॅफेमध्ये येऊन बसले. दोन तास झाले, ते गिरीशबद्दल बोलत होते. तन्मय सांगत होता की, गिरीश कसा चांगला माणूस नाही, त्याची नजर कशी वाईट आहे, हे जिमचे ट्रेनर कसे तसेच असतात.. आजपर्यंत श्रावणीच्या डोक्यात यापैकी कुठलीही गोष्ट आली नव्हती. पण, तन्मय एवढा सांगतोय तर ती ‘हो.. हो..’ म्हणत होती. पण हळूहळू तिलाही कंटाळा आला. त्या दिवशीपासून गिरीश हाच त्यांच्या दोघांच्या बोलण्याचा विषय झाला. श्रावणीने घरी गिरीशचं येणं बंद केलं. पण, तन्मयचा संशय काही जात नव्हता. एक-दोनदा तर त्याने श्रावणीचा मोबाइल पण चेक केला. श्रावणीच्या डोक्यात गेली ती गोष्ट. पण, शांत राहिली. लग्न दोन दिवसांवर आलं होतं. लग्नात दोघेही मनापासून नटले होते. सगळे आनंदात होते. अचानक तन्मयने स्टेजवर श्रावणीला विचारलं, ‘तू गिरीशला बोलवलं नाहीस ना?’ श्रावणी राग खूप कंट्रोल करून ‘नाही” म्हणाली. तन्मय सॉरी म्हणाला. हळूच तिच्या कानात म्हणाला,“मी वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर..’ मग त्यानं खास तिच्यासाठी घेतलेली डायमंड रिंग तिच्या हातात ठेवली. डोळे दीपवणारी अंगठी होती. श्रावणीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं हात पुढे केला. तन्मय तिला अंगठी घालू लागला. पण, अचानक तन्मयच्या बहिणीने अंगठी हिसकवून घेतली. क्षणभर सगळे अवाक् झाले. काही तरी गंभीर घडल्यासारखे. पण लगेच तन्मयची बहीण मोठ्याने हसून म्हणाली, ‘नाव घेतल्याशिवाय अंगठी मिळणार नाही..’ सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सगळे कान देऊन ऐकू लागले. श्रावणी नाव घेऊ लागली…
कळी फुलेल, फुल उमलेल,
घर होईल सुगंधी,
गिरीशरावांच्या सहवासात,
आयुष्य होईल आनंदी…
श्रावणीने घेतलेलं नाव ऐकून सगळेच शांत झाले. काहींना राग आला, काहींना हसू आलं. पण, कुणी काही बोललं नाही. सगळे शांत होते. एकमेकांकडं बघत होते. तन्मयच्या डोळ्यात पाणी यायचं बाकी होतं. श्रावणी तन्मयच्या कानात बोलली, ‘वेड्यासारखं प्रेम नको करुस. शहाणा हो.. तुझ्यामुळं हेच नाव डोक्यात घोळतंय माझ्या. अजूनही वेळ गेलेली नाही. संशय असेल तर थांबूया..’ तन्मय तिच्याकडं बघून हसला. आणि जमलेल्या लोकांना म्हणाला, ‘श्रावणीने माझं नाव गिरीश ठेवलंय. ती मला गिरीश म्हणते लाडाने..’ सगळे हसत टाळ्या वाजवतात. तन्मय तिच्या कानात म्हणतो, ‘एवढी शिक्षा पुरेशी आहे. पुन्हा तुझ्यावर संशय घ्यायची चूक करणार नाही..’ तो तिच्या बोटात अंगठी घालू लागतो. त्याचं लक्ष जातं. श्रावणीने हातावर ‘तन्मय’ असं गोंदवलंय. तन्मय तिच्याकडं बघतच राहतो…
(संपर्कः jarvindas30@gmail.com)





