अरविंद जगताप6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सासऱ्यांनी दिव्याला सांगून प्रथमेशला महापालिकेच्या निवडणुकीत उभं केलं. ते सरकारी नोकरीत असल्याने उभे राहू शकत नव्हते. पण, जावयाला उभं करून बघू म्हणाले.
प्रथमेश जन्मला तेंव्हापासून त्याचं जिंकायचं राहूनच गेलं. म्हणजे त्याच्या आईवडिलांची खूप इच्छा होती की मुलगी व्हावी. सगळे म्हणायचे, मुलगा होईल. बरेच नातेवाईक मुलगा होईल म्हणून पैजही लावून बसले होते. पण, आईवडिलांना विश्वास होता, मुलगीच होईल. पण, झाला प्रथमेश. त्या काळात पैजेवर पंचवीस हजार तरी हरले होते प्रथमेशचे आईवडील.
अर्थात त्यात बिचाऱ्या प्रथमेशचा काय दोष? पण, शाळेतही त्याच्या नशिबात कधी विजय आला नाही. म्हणजे चहाचा कप सोडला, तर दुसरा कप त्याच्या हाती आलाच नाही. नाही म्हणायला पाचवीत एकदा तो धावण्याच्या शर्यतीत पहिला येत होता. अंतिम रेषा अगदी पन्नास मीटरवर होती. पण, नेमकी त्याची चड्डी सुटली. ती सावरत तो एका जागी उभा राहिला, बाकी सगळे पुढे निघून गेले. पहिला येता येता बिचारा शेवटचा आला.
नशीबसुद्धा चड्डीसारखं त्याला ऐनवेळी धोका द्यायचं. तरी प्रथमेशला मानलं पाहिजे. आजवर त्याने प्रयत्न सोडले नाहीत. कधी खचला नाही. दुसरा कुणी असता, तर त्याने कुठल्या स्पर्धेत भागच घेतला नसता. पण, प्रथमेश हार मानणारा नव्हता. त्याने पाच वर्षे बुद्धिबळपटू होण्यासाठी कसून मेहनत केली. लोकांशी खेळून आपण हरतो म्हणून तो संगणकाशी खेळायचा. सराव करायचा. त्याला विश्वविजेता व्हायचं होतं. पण, पहिल्याच स्पर्धेत अवघ्या पाचव्या चालीत त्याला एकाने चेकमेट केलं. प्रथमेशने दुसरा खेळ निवडला. तो क्रिकेटचा सराव करू लागला.
सगळा दोष प्रथमेशचा नव्हता. त्याचे वडील त्याला जिंकलेलं बघण्यासाठी वेडे झाले होते. मुलगा कपिलदेव व्हावा, ही त्यांची इच्छा. मग प्रथमेशला ते स्वतःच मैदानात नेऊ लागले. गल्लीतली पोरं गोळा करून त्यांना फलंदाजी करायला लावायची. प्रथमेश गोलंदाजी करायचा. प्रथमेशच्या सुमार गोलंदाजीला वैतागून पोरांनी येणं बंद केलं. वडील पोरांना पैसे देऊ लागले. एक रुपया, दोन रुपये करता करता हजारो रुपये गेले. पण, प्रथमेशची गोलंदाजी काही सुधारत नव्हती. उलट दोन पोरं या नादात चांगले फलंदाज झाले. जिल्ह्याच्या संघात गेले. हजारो रुपये घालवल्यावर वडिलांनी मुलाला यशस्वी गोलंदाज बनवायचा नाद सोडून दिला. आई नाराज झाली.
एक दिवस प्रथमेशचा मामा आला. मामाने प्रथमेशला वसीम अक्रम बनवायचं ठरवलं. त्याने नवीनच युक्ती केली. कुणाला फलंदाजी करायला न लावता त्याने फक्त एक स्टम्प लावला. मामा विकेट कीपर झाला. प्रथमेश गोलंदाजी करू लागला. पण, तो स्टम्प काही उडायचं नाव घेईना. मामाही थकला होता. पण, भाचाला नाराज करायचं त्याच्या जीवावर आलं. त्याने एक आयडिया केली. त्याने प्रथमेशशी एक पैज लावली. मामाने आपली सोन्याची अंगठी स्टम्पवर ठेवली. आता प्रथमेशने तो स्टम्प उडवला, तर ती अंगठी मामा प्रथमेशला देणार, असं ठरलं.
अर्धा तास गोलंदाजी करून थकलेला प्रथमेश जरा उत्साहात आला. दहा-पंधरा चेंडू टाकल्यावर एकदाचा तो स्ट्म्प उडाला. हो एकदाचा उडाला. आणि प्रथमेश पहिल्यांदा पैज जिंकला. छे! प्रथमेशने स्टम्प एवढ्या जोरात उडवला की, तो लांब अगदी चुलीत गेला. पण, अंगठी काही दिसेना. दीड तास मामा-भाचे आणि बघे अशा सगळ्यांनी मिळून ती सोन्याची अंगठी शोधली. अंधार झाला. दुसऱ्या दिवशी प्रथमेशच्या वडिलांनीही येऊन अंगठी शोधली, पण ती मिळाली नाही. पुढं मामा वर्षभर भाचाच्या घरी आला नाही.
तर, असा प्रथमेश कसाबसा पास झाला. त्यानं कशीबशी नोकरी मिळवली. पण, त्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे, तो कधीच निराश नसायचा. कुणालाही मदत करणं, हा त्याचा स्वभाव. त्याबद्दल सगळ्या कॉलनीत त्याची ख्याती होती. कुणीही त्याचं कौतुकच करायचं. पण, हे कौतुक डोक्यात जायला वेळ लागला नाही. यावेळी हे कौतुक सासरच्या लोकांच्या डोक्यात गेलं.
आता प्रथमेश आईवडिलांसोबत राहात नव्हता. सासऱ्याने त्याला वेगळ्या भागात घर घेऊन दिलं. प्रथमेश एकुलता एक मुलगा असून त्याचा कधी फायदा झाला नाही. पण, एकुलता एक जावई असल्याने लाड सुरू होते. सासऱ्यांनी मुलीला म्हणजे दिव्याला सांगून प्रथमेशला महापालिकेच्या निवडणुकीत उभं केलं. सासरे सरकारी नोकरीत असल्याने उभे राहू शकत नव्हते. पण, जावयाला उभं करून बघू म्हणाले. तसे ते वेगळ्या शहरात राहायचे. पण, जावयासाठी त्यांनी पैसे खर्च केले. दोन दिवस मुक्काम ठोकून प्रचार केला. जो तो जावयाबद्दल छान बोलायचा, त्यामुळं त्यांना आनंद व्हायचा. प्रथमेशची बायकोही खुश होती. निकालाचा दिवस उजाडला. शेवटपर्यंत प्रथमेशच्या मतात वाढ झाली नाही. सुरूवातीला त्याला एक मत पडलं. तेवढंच. बाकी कुणाचंच मत नाही. प्रथमेशला पहिल्यांदा खचलेलं पाहिलं लोकांनी.
प्रथमेशची बायको मात्र जास्त अस्वस्थ होती. तिला सारखं वाटत होतं की, प्रथमेशला काय वाटत असेल? एकच मत पडल्यामुळं सगळा गोंधळ झाला होता. आपण नवऱ्याला मत दिलं नाही, अशी लोक चर्चा करताहेत, हे तिच्या कानी येऊ लागलं. तशी ती खूपच टेन्शनमध्ये आली. प्रथमेश घरी आलाच नव्हता. फोनही उचलत नव्हता. तो काय विचार करत असेल, हाच विचार दिव्याच्या मनात चालू होता. रात्री उशिरापर्यंत प्रथमेश घरी आला नाही, तेव्हा ती बिचारी रडवेली झाली. तरी वडिलांनी फोन करून तिला धीर दिला. पण, दिव्याला दिसत होतं..
एका मतामुळं संसार मोडणार. खूप विचार करून डोळे लाल झाले. जेवायची तर इच्छाही उरलेली नव्हती. शेवटी एकदाचा प्रथमेश आला. त्याला पाहून दिव्या हैराण झाली. तो चक्क शिट्टी वाजवत आला होता. आल्यावर तिला ‘सॉरी’ म्हणाला. दिव्याला हे सगळं वेगळंच वाटत होतं. प्रथमेश सॉरी म्हणाला कारण त्याला उशीर झाला होता. त्याला उशीर झाला होता कारण तो दिव्यासाठी गिफ्ट आणायला गेला होता. तिच्या आवडीची पर्स. ती काही केल्या मिळत नव्हती. मिळाली. पण, पर्स का? प्रथमेशने सांगितलं की, त्याचं स्वतःचं मत त्याच्या चुकीने बाद झालं होतं.
निकालाची त्याला एवढीच भीती होती की, शून्य मतं पडू नयेत. पण, तसं झालं नाही. दिव्याच्या एका मतामुळे त्याची अब्रू वाचली. ते खरंच होतं. दिव्या संध्याकाळपासून विचार करत होती की, आपलं मत बाद झालं नाही ना? आता विनाकारण प्रथमेशचा आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही ना? पण, तसं झालं नाही. प्रथमेश त्या एका मतामुळं आनंदी होता. त्याला पहिल्यांदाच जिंकल्यासारखं वाटत होतं…
(संपर्कः jarvindas30@gmail.com)




