99th All India Marathi Literary Conference: साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (99th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) दिमाखात सुरुवात झाली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानं आणि ध्वजवंदनानं शुक्रवारी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगुल वाजलं. सायंकाळी शहरातून मोठ्या उत्साहात निघालेल्या ग्रंथदिंडीनं वाचन संस्कृतीच्या जागराला दिमाखदार सुरुवात झाली. पण, अशातच साहित्य संमेलनात घडलेल्या एका प्रकारानं मोठी खळबळ माजली आहे. साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी साताऱ्याला आलेल्या एका युवकानं काळे कपडे घातले म्हणून त्याला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला जाऊ दिलं नाही. केवळ काळे कपडे घातले म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त विजेता लेखक प्रदीप कोकरे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आत जाऊ दिलं नाही.
फेसबुक पोस्टमध्ये लेखक प्रदीप कोकरे यांनी काळे कपडे घातले असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम स्थळी पोलिसांनी जाऊ दिलं नाही, असं सांगितलं आहे. तसेच, अडवणूक झाल्याबद्दल विचारणा केल्यानंतर वरिष्ठांचा आदेश आहे आणि कार्यक्रमात उभं राहून कुणी निषेध नोंदवू नये म्हणून काळे कपडे घालणाऱ्यांना आत सोडू नये असं पोलिसांनी सांगितल्याचंही लेखक प्रदीप कोकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे.
फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले लेखक प्रदीप कोकरे?
नमस्कार,
मी साहित्य संमेलनासाठी सातारा येथे आलोय. आज उदघाटन समारंभ आहे. त्यासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. मी काळया रंगाचे कपडे घातले म्हणून पोलिसांनी मला मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडवलं. वरिष्ठांचा आदेश आहे आणि कार्यक्रमात उभं राहून कुणी निषेध नोंदवू नये म्हणून आज काळे कपडे घालणाऱ्यांना आत सोडू नये असं पोलिसांचं म्हणणं पडलं.
मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे पोलिसांची,मुख्यमंत्र्यांची आणि आयोजकांची तिथे अक्कल काढली. काळे कपडे घालणाऱ्यांची किंवा काळ्या रंगाची इतकी भीती वाटते तर आयोजकांनी पत्रिका करताना ठळक अक्षरात तसं नोंदवून आपला बिनडोकपणा दाखवून द्यायला काहीच हरकत नव्हती. बरीच बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांकडे काहीही उत्तर नव्हतं.
तर पोलिसांना आणि असा आदेश काढणाऱ्या थोर लोकांना न जुमानता मी संमेलनात काळ्या रंगासहित पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. ज्यांना ज्यांना गेटवर अडवलं त्यांनाही मी आत घेऊन आलोय.
मुख्यमंत्र्यांना निषेधाची इतकी भीती वाटत असेल तर त्यांनी गपचूप घरी बसावं.
प्लिज निषेध वगैरे नोंदवू नका. यांची तेवढी कुवत नाही.
आणखी वाचा







