सातारा/कोडोली, पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथील शेतात काम करणार्या महिलांसाठी शनिवार घातवार ठरला. शेतात गेलेल्या महिला पावसामुळे टॉलीतून घरी परतत होत्या. मात्र, पावसाने झालेल्या चिखलामुळे ही ट्रॉली पुलावरील वळणावर घसरून कण्हेर उजव्या कालव्यात उलटली. त्यामुळे पाण्यात बुडून चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला व चालक बचावले आहेत. जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे. या हृदयद्रावक घटनेने कारंडवाडीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी 5 वा. सुमारास ही घटना घडली.
अरुणा शंकर साळुंखे (वय 58), लीलाबाई शिवाजी साळुंखे (60), सीताबाई निवृत्ती साळुंखे (65) व उल्का भरत माने (55, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुर्घटनेत लता गुलाबराव माने या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अपघातग्रस्त महिला गुलाब रामचंद्र माने यांच्या शेतात कामासाठी शनिवारी सकाळी 10.30 वाजता गेल्या होत्या. दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे गुलाब माने या महिलांना ट्रॅक्टर ट्रॉलीतून घरी घेऊन जात होते. पावसामुळे कालव्यालगतचा रस्ता निसरडा झाला होता. अगोदरच अरुंद रस्ता त्यात पावसाने झालेला चिखल यामुळे वाट धोकादायक बनली होती. महाडिक कॉलनीजवळआल्यानंतर चिखलामुळे टायर घसरल्यामुळे पुलाच्या वळणावर ट्रॉली थेट कालव्यात उलटली. ट्रॉलीमध्ये पाच महिलांसह शेळी व दुचाकीही होत्या. पाण्यात कोसळल्यानंतर दोन महिलांचा वाहत जाऊन तर दोन महिलांचा ट्रॉलीखाली सापडल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेने कारंडवाडी शोकसागरात बुडाली.
अपघाताची माहिती कळताच जो-तो घटनास्थळी पोहचला. या ठिकाणचे वातावरण भयावह झाले होते. मृत महिलांच्या कुटूंबिय व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. महिलांचे मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. तेथेही कारंडवाडीच्या नागरिकांनी गर्दी केली होती.