
नेरळ येथील गंगानगर परिसरात दिवगंत कवी नारायण सुर्वे यांचे घर आहे. सध्या या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे विरार येथे गेले होते. घर बंद असल्याचे हेरत चोराने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतेही दागिने, पैसे चोराला सापडले नाहीत. त्यामुळे चोराने घरातील एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसेच धान्याकडे मोर्चा वळवला. सलग दोन-तीन दिवस चोर घरातील साहित्यावर डल्ला मारत होता.








