Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे. मिरज लोहमार्ग पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन परिसरातील घटनेने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ दरोडा पडला आहे. सातारा व सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री घटना घडली आहे. सिग्नलशी संशयितांनी छेडछाड करत हा सिग्नल बंद पडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबल्याचे पाहून संशयितांनी प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केला आहे. घटनेनंतर माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील, चार जणांकडून टोलनाक्याची तोडफोड
बीडच्या सेलुअंबा येथील अंबाजोगाई-लातुर महामार्गावरील टोलनाक्यावर काल रात्री 1.20 वा. आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील असे म्हणत अज्ञातांनी हॉकीस्टिक आणि धारदार शस्त्राने हल्ला करत टोलनाक्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली. तर त्यांच्यातीलच एका व्यक्तीने व्हिडिओ काढत कर्मचाऱ्यांना धमकावले आणि टोल नाक्यावर बराच वेळ दहशत माजवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तोडफोडीचे फुटेज समोर आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
भिवंडीत 64 लाखांचा गुटखा डंप केल्यानंतर पुन्हा चोरी
भिवंडी ग्रामीण भागात भिवंडी क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत सुमारे 64 लाखांचा गुटखा जप्त केला होता. न्यायालयाच्या परवानगीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा गुटखा चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड येथे वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा करून काल दुपारच्या सुमारास डंप करण्यात आला.
मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होताच गुटखा माफिया घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबीच्या मदतीने डंप केलेला खड्डा उकरून मोठ्या प्रमाणात गुटखा पुन्हा बाहेर काढला आणि टेम्पोमध्ये भरून नेण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात गुटखा घेऊन जाण्यात ते यशस्वीही झाले.
दरम्यान, ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गुटखा माफियांना अडवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस येत असल्याचे कळताच माफिया गुटख्याने भरलेला टेम्पो सोडून पसार झाले. या प्रकारामुळे डम्पिंग ग्राउंड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या आरोपानुसार, अशा प्रकारे डंप केलेला गुटखा पुन्हा बाहेर काढून नेण्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार गुटखा पूर्णतः निकामी होईपर्यंत त्यावर देखरेख ठेवणे आवश्यक असताना अशी घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे राज्यात गुटखा बंदी असताना दुसरीकडे डंप केलेला गुटखा पुन्हा बाहेर काढण्यासाठी माफियांची सक्रियता दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण जबाबदार आणि गुटखा माफियांवर कडक कारवाई होणार का, पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा







