कबीररंग: मनुवा तो पंछी भया, उडिके चला अकास…

0
14
कबीररंग:  मनुवा तो पंछी भया, उडिके चला अकास…




आपलं मन मोठं गमतीदार आहे! ते कधी एके ठिकाणी अधिक काळ थांबत नाही. कधी गतकाळातल्या सुख-दुःखात गुंतून राहतं, तर कधी भविष्यकाळातल्या गोष्टींची स्वप्नं पाहत बसतं. आपलं मन असं का करतं? ते भिरभिरत का राहतं? त्याला अखेर काय हवं असतं? या प्रश्नांचा प्रामाणिक शोध घेत राहणं, हा आध्यात्मिक जीवनाचा एक भाग असतो. पण, मन असंच असतं, असं आपण समजू लागलो आणि मनाच्या मागून डोळे मिटून चालू लागलो, तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या घटना-प्रसंगांचे अर्थ आपल्याला कळणार नाहीत. नात्यांतील आंदोलनांचं मर्म आपल्याला जाणवणार नाही. व्यापक असलेली निसर्गाची व्यवस्था आपल्या असण्यापासून दूर राहील. मनाचा स्थायीभाव उमजणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कबीरांनी मनाच्या या भिरभिरण्याला, पसाऱ्यात हरवण्याला, अस्तित्व नसलेल्या गोष्टींच्या मागं धावण्याच्या सवयीला वेचून चिंतनात आणलं आहे. आपल्या मनाला थाऱ्यावर आणणारं हे चिंतन आहे. कबीर म्हणतात… मनुवा तो पंछी भया, उडिके चला अकास। ऊपर ही ते गिरि पडा मन माया के पास।। आपलं मन पक्ष्यासारखं आहे. सुखाच्या कल्पनेनं त्याला आकाशात भरारी घ्यावी वाटते. ते आपले पंख फडफडत जे आहे त्याला सोडून उंच उडतं. पण, आकाशातून उडता उडता त्याला खाली जमिनीवर मोहवणारी वस्तू दिसते. त्याची फडफड थांबते, तो जमिनीवर उतरतो. मोहाच्या जाळ्यात अडकतो. कबीर मनाच्या या द्वंद्वात्मक स्थितीचं वर्णन जसंच्या तसं करतात. एका बाजूला कामनेमुळं, मोहामुळं निर्माण होणारी बंधनं आणि दुसऱ्या बाजूला मनाला त्याच्या पलीकडं नेऊन मोकळं ठेवणारं आकाश यांच्या द्वंद्वात मन अडकतं. मोह म्हणजे भासमान सुख असतं आणि मन सत्याला सोडून भासात गुंतून पडतं. कबीरांचं हे सांगणं संवेदनशील मनाला सहज स्पर्शणारं आहे. मनाला ताब्यात ठेवावं तर ते हातून निसटून जातं. त्याचे लाड करावेत तर ते शेफारतं. त्याची आंदोलनं नजरेआड करावीत तर ते प्रत्येक कामात अडसर होतं, अस्तित्व दाखवत राहतं. त्याला विरोध करावा तर ते अंगावर उसळून येतं. हे असलं मन मायेनं कुठं गुंतलं तर तुटून-मोडून जातं, पुन्हा जोडलं जात नाही. माणसाच्या मनाचा स्वभाव जाणून कबीर आपल्याला एक मनासंबंधीचं सत्य उघड करून सांगतात… धरती फाटै मेघ मिलै कपडा फाटै डौर। तन फाटै को औषधि मन फाटै नहिं ठौर।। उन्हाचा ताप वाढला की जमिनीला भेगा पडतात. मातीची ढेकळं चुरचूर होतात. पण, पावसाची पहिली सर येते आणि या जमिनीच्या भेगा सांधल्या जातात. पाण्यानं भरून जातात. कबीर आणखी दोन उदाहरणं देतात. अंगावरलं वस्त्र फाटलं, तर ते दोऱ्यानं पुन्हा शिवून घेता येतं. शरीर कधी आजारी पडलं, तर योग्य औषधोपचारानं त्याला मूळ स्थितीला आणता येतं. पण, मन फाटलं, विदीर्ण झालं तर ते कसं शिवणार? असतेपणाच्या जाणिवेपासून दूर झालेलं मन सत्याच्या दर्शनानं मूळ स्थितीला येऊ शकतं आणि मनाचं खरं दर्शन गुरूंसारखा आरसा समोर असल्यावरच होऊ शकतं, हे कबीरांना सूचित करायचं आहे. आपल्यासाठी हे सूचन खूप मोलाचं आहे. मन मनसा जब जायगी तब आवैगी और। जबही निहचल होयगा तब पावैगा ठौर।। मन म्हणजे मनाचा आशय. साऱ्या विकार-विचारांचा गठ्ठा. राग-लोभासारखे विकार तशाच विचारांना मनात थारा देतात. मन सुखाची हाव घेऊन दाही दिशेला वणवणत राहतं. सुख देणाऱ्या विषयांत रमतं. सतत बाहेरच राहू पाहतं. पण, कबीर म्हणतात, मनाचं हे आत-बाहेरील दुहेरीपण गुरूंच्या सहवासात संपतं. ते स्वत:पाशी येतं. स्वतःतच स्थिरावतं. त्याला स्वतःचं ज्ञान होतं. हा आपल्या मनाला झालेला बोध असतो. हा बोध खऱ्या सुखाची चव आपल्याला चाखवतो. मग हे मन पुन्हा मृगजळाला ओंजळीत घेऊन आपली तहान शमवत नाही. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link