कबीररंग: पढा सुना सीखा सभी मिटी न संसै सूल…

0
13
कबीररंग:  पढा सुना सीखा सभी मिटी न संसै सूल…




आपल्याला बालपणीच पुस्तकांची ओळख होते. अननसाचं चित्र पाहत आपण ‘अननस’ या शब्दाचा आशय जाणून घेतो. पुढं जेव्हा कधी हे नाव कानावर पडतं, तेव्हा अननस डोळ्यांसमोर उभं राहतं. पुस्तकाच्या आधारानेच ही अशी वस्तू-ओळख होते. नामरूप प्रचलित असलेल्या जगात आपण शब्दज्ञान घेऊन वावरतो. पण, रोजच्या जगण्यात गुंतलेलं आणि स्वभावाच्या नि परिस्थितीच्या संस्कार-प्रभावातून मोकळं होऊ न शकणारं मन समजून घेताना आपल्यातल्या जीवन-साधकाला पुस्तकांचा आधार पुरा पडतो का? पुस्तकांनी आपल्या दृष्टीवर, जाणिवांवर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे संस्कार केलेले असतात. मनुष्यमात्राच्या प्रगतीसाठी हे संस्कार महत्त्वाचेही असतात. काही प्रमाणात साधकाला स्वतःला उलगडून घेण्यासाठी हे पुस्तकांचं जग सहाय्यक होऊ शकतं. मात्र, कबीरांना साऱ्या चराचराला सामावून घेणारं, जीवनाचं विशाल पुस्तक महत्त्वाचं वाटतं. या पुस्तकाच्या वाचनात साधकाच्या ‘मी’पणाला थारा नसतो.
मतामतांचा गलबला, संकल्पनांचे गुंते, वेगवेगळ्या विचारांची आक्रमणं आणि द्वंद्वाचा पसारा वाढवणारी पुस्तकं साधक वाचतात. हे पाहून कबीर आपली आध्यात्मिक निरीक्षणं नोंदवतात… लिखा पढी में सब पडे, यह गुन तजै न कोय। सबै पडै भ्रम जाल में, डारा यह जिय खोय।। कबीरांचा हा दोहा काही विद्याविकासाच्या विरोधातला नाही. पण, ज्या साधकांना आपल्या असण्याचं प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी कबीरांना सुचवायचं आहे की, लेखन आणि वाचनाने साधकाची वृत्ती शब्दांच्या मोहजालात, भ्रमजालात अडकू शकते. तो शब्दज्ञानावर अवलंबून राहू शकतो. आपण कुणीतरी मोठे नि वेगळे आहोत, हा अहंकार साधकाच्या मनात वाढू शकतो. स्वतःला जाणून घेण्याची आवश्यकता त्याच्या ठायी उरत नाही. मग शब्दांपलीकडचं, जाणिवांपलीकडचं जग त्याला कसं दिसेल? हृदयाचं परिवर्तन करणारे गुरु कसे लाभतील? आपल्या असतेपणाच्या अमर्याद जगावर प्रेम करण्याची इच्छा त्याच्या मनात कशी उमलेल? कबीर आत्मज्ञानाच्या आड येणाऱ्या तथाकथित पांडित्याविषयी बोलतात, पुस्तकी ज्ञानाविषयी बोलतात. हे सारं जीवन- साधकानं शब्दप्रामाण्याच्या अधीन होऊ नये यासाठीच आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात शब्दांचं अवडंबर माजलेलं पाहून कबीर म्हणतात… नहिं कागद नहिं लेखनी, नि:अक्षर है सोय। बाँचहि पुस्तक छोडि के, पण्डित कहिये सोय।। साधक आपल्याला असण्याचे ज्ञान झाल्याचे कोणत्या शब्दांतून व्यक्त करील? असं वर्णन कागद आणि लेखणी या साधनांच्या आवाक्यापलीकडचं आहे. आत्मज्ञान शब्दांत बांधून ठेवता येत नाही. ही शब्दांची मर्यादा आहे. म्हणूनच साधकानं पुस्तकाचं वाचन, त्याचा संस्कार याचं सखोल चिंतन करायचं आहे. समग्र जीवनाचं पुस्तक वाचण्यासाठी पूर्वसंस्कारांविषयी अवधान ठेवायचं आहे. कबीरांचं हे सूचन आत्मज्ञानासाठी आसुसलेल्या साधकासाठी महत्त्वाचं आहे. साधक पुस्तकं वाचतो. मनोरंजन, बुद्धिरंजन आणि आत्मरंजनासाठी वाचतो. हे वाचन त्याच्या मेंदूला म्हणजेच मनालाही व्यापून टाकतं. यामुळं त्याचं विचार करणं ज्ञाताच्या जगातलं असतं. ज्ञातापासून मुक्त होऊ पाहणारा साधक ज्ञात जगातच बुडत जातो. कबीर साधकाला सावध करताना म्हणतात… पढा सुना सीखा सभी, मिटी न संसै सूल। कहैं कबीर कासों कहूं, यह सब दुख का मूल।। साधकानं पुस्तकं वाचू नयेत, अशी कबीरांची सूचना नाही. मात्र, स्वतःला नीट जाणून घेतल्याशिवाय वाचनातून, लेखनातून, शिकण्यातून, ऐकण्यातून आणि मननातून घडणारा शब्दांचा सहवास मनाला संदेह-संशयाच्या पलीकडचं जीवन दाखवू शकत नाही. कबीरांना शब्दांतून निर्माण होणाऱ्या आभासी जगापासून साधकाला मुक्त ठेवायचं आहे. व्यावहारिक जगात वस्तूंच्या देवघेवीसाठी शब्दांना मूल्य आहे; पण आत्मज्ञान होण्यासाठी शब्दांचं काहीच मोल नाही. व्यावहारिक आणि आंतरिक जगांमध्ये साधकानं दोन पातळ्यांवर राहू नये, यासाठी कबीरांचं हे सांगणं आहे. आणि हे सांगणं जीवन – साधकासाठी पुस्तकांतल्या शब्दांहून अधिक मोलाचं आहे. (संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link