कबीररंग: इस घट अंतर सात समुंदर, इसी में नौ लख तारा…

0
4
कबीररंग:  इस घट अंतर सात समुंदर, इसी में नौ लख तारा…


हेमकिरण पत्की12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कबीरांची भक्ती ईश्वराप्रति परम प्रेमरूपा आहे. या भक्तीचं स्वरूप आपण कसं समजून घेऊ शकतो? भक्तीची व्याख्या करून की भक्तीची परिभाषा जाणून घेऊन, असे प्रश्न सहज मनात येतात. काही गोष्टी अशा असतात की, त्या गोष्टींचा अनुभव आल्यावर केवळ त्यांचं वर्णन केलं जाऊ शकतं. त्या विषयी थोडं सूत्रातून सांगता येतं.

पण, हे सर्व आपण चाखलेल्या एखाद्या पदार्थाच्या स्वादासारखं आहे. या स्वादाचं वर्णन ज्यांच्याकडं लवचिक धारणाशक्ती आहे, समजून घेण्याचं साधं कुतूहल आहे, उत्साह आहे आणि खरी तळमळ आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. कबीर आपल्या परमप्रेम रूप असण्याच्या स्थितीचा अनुभव सर्वपरिचित प्रतिकांतून आपल्याला असाच घडवतात. आपण भक्तिमय व्हावं, यासाठी केलेला त्यांचा हा प्रेमळ प्रयास आहे. या संदर्भातील एका पदात कबीर म्हणतात…

इस घट अंतर बाग-बगीचे,

इसी में सिरजनहारा।

आपल्याला लाभलेला देह, हे मन आणि ही विचार-विवेकाची बुद्धी म्हणजेच आपला सकल नरदेह होय. नरदेहाच्या ठायी असलेलं जगण्याचं शहाणपण ही खूप मोठी गोष्ट आहे. ते शहाणपण कुठं बाहेर नाही. बाहेरच्या सृष्टीचा बोधही अंतरातच होतो; पण आपण मात्र सुख, दुःख, आनंद आणि मुक्तीचा बोध बाहेर असल्याचं जन्मभर मानत राहतो. इंद्रियांसोबत राहून बाहेरच्या जगात आतल्या सुखाचा शोध घेत राहतो. ही क्रिया उफराटी आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही आणि आपण त्याचे परिणाम भोगत राहतो. कबीरांच्या दृष्टीने, आपल्याला लाभलेला नरदेहाचा घट हाच बोधप्राप्तीचं उत्तम साधन आहे.

हे आपल्या हृदयात उतरवण्यासाठीच कबीरांचं हे पद आहे, या पदांतील प्रतीकं आहेत. कबीर म्हणतात, जीवनसाधकाच्या या देहघटातच हे आनंद-सुखाचे फुलबाग आहेत. त्या बागेची लावणी, निगराणी, त्याला बागपण देणारा माळीसुद्धा याच घटात आहे. तो आपल्या देह, मन आणि बुद्धीचा सिरजनहारा म्हणजे सृजनात्मा आहे. आणखी काही प्रतिकांतून या विधात्याकडून लाभलेल्या देहघटाचं मोल अधोरेखित करताना कबीर म्हणतात…

इस घट अंतर सात समुंदर,

इसी में नौ लख तारा।

इस घट अंतर पारस मोती,

इसी में परखनहारा।।

याचा अर्थ असा की, सात समुद्र, नऊ लाख तारे याच देहाच्या आत असलेल्या अंतरीच्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो. इथं सात आणि नऊ लाख असं या सृष्टीचं संख्यात्मक दर्शन आपण करून घ्यायचं का? तर हे कबीरांना अपेक्षित नसावं. दृश्यकेंद्र आतच तर आहे! ते निसर्गदत्त सृष्टीचं आणि आपल्या आतल्या सृष्टीचं एकाच वेळी पूर्ण दर्शन करून देऊ शकतं. आपणच विश्व आहोत, हे अद्वैत आत्मानुभूतीतून किती सहजपणे कबीर येथे सांगतात! परीस म्हणजे आपलं हृदय परिवर्तन करणाऱ्या गुरुचा स्पर्श असू शकतो.

डोळ्यांतले आनंदाचे अश्रू मोती असतात. मोत्यांचं शुद्धपण पारखणारा रत्नपारखी बाहेर कुठं नाही, तर तो आपल्या अंतरातच आहे, असं कबीर म्हणतात. नरदेहातला अंतरात्मा एक आहे आणि तो दृश्यात नाही, तर तो असा सदासर्वकाळ आपल्या अंतरीच आहे. कबीर म्हणतात की, या अद्भूत देहघटाला चेतनेचं अधिष्ठान आहे, हे असलं घटाचं साधन पशुदेहात नाही. केवळ माणसाकडंच बोधप्राप्तीसाठीचं अवकाश आणि अवसर आहे. यमयातनेचे अरिष्ट चुकवण्यासाठीची युक्ती केवळ माणसाकडं आहे आणि हा अवघा देहघट अंतःकरणाच्या स्वाधीन आहे.

इस घट अंतर अनहद गरजै,

इसी में उठत फुहारा।

कहत कबीर सुनो भाई साधो,

इसी में साईं हमारा।।

हा देहघटच प्रकट – अप्रकट जगाचा आधार आहे. त्याच्या ठायी दृश्य आणि ते पाहणाऱ्या द्रष्ट्याला जाणून घेऊ शकणारी चेतना आहे. ही चेतना प्राण्यांजवळ नाही. ते या घटातच असण्याशी जोडलेलं स्फुरण – केंद्र आहे. नवनवीन कल्पना सुचण्याचं! त्या नीटपणे व्यक्त करण्याची कला साधकाच्या अंतरात आहे. कबीर म्हणतात, तो सृष्टीचा निर्माता, समग्र सृष्टीचा अनुभवक आणि आत – बाहेरचा भेद नसलेल्या सृष्टीचा स्वामी नरदेहाच्या घटातच आहे. या सान्त घटातच अनंत आकाश सामावलेलं आहे.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link