स्ट्रोकच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

0
2
स्ट्रोकच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष


जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, तेव्हा स्ट्रोक येतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि जीवनशैलीसंबंधी चुकीच्या सवयी ही त्यामागची सामान्य कारणं आहेत. स्ट्रोकची लक्षणे अचानक दिसून येतात.  त्यात शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा, बोलताना अडखळणे, चेहऱ्याची एक बाजू लुळी पडणे, शारीरक संतुलन गमावणे, अंधुक दृष्टी किंवा तीव्र डोकेदुखी यांचा समावेश असू शकतो. अशी लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे आणि त्वरित उपचारांमुळे पुर्ववत आयुष्य जगता येऊ शकते.

Add Zee News as a Preferred Source

स्ट्रोकसाठी धोक्याचे घटक

* रक्तदाबात वाढ : बऱ्याचदा थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि स्ट्रोकची शक्यता वाढते.

* निर्जलीकरणामुळे , पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

* शारीरिक हालचालींचा अभाव : कमी हालचालींमुळे रक्ताभिसरण आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे स्ट्रोकची शक्यता असते.

* चरबीयुक्त आहार : तेलकट आणि गोड पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि स्ट्रोक येऊ शकतो.

* हृदयाच्या समस्या : हृदयावर अतिरिक्त ताण येणे विशेषतः हृदयरुग्णांमध्ये ही समस्या आढळून येते ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

* अति मद्यपान : अल्कोहोलमुळे हृदयाची लय आणि रक्तदाब बिघडतो आणि स्ट्रोक येऊ शकतो.

* धूम्रपानाची सवय : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि गुठळ्या होण्याचा व स्ट्रोकचा धोका वाढतो.

* वैद्यकीय उपचारांना विलंब : शारीरीक संतुलन गमावणे, बोलण्यात अडचण, चेहरा लुळा पडणे आणि हातामध्ये अशक्तपणा यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. स्ट्रोकला वेळीच उपचारांची आवश्यकता असते.

स्ट्रोकच्या वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, कारण उपचारांना विलंब झाल्यास मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो. टिपीए इंजेक्शन आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसारख्या उपचारांमुळे जगण्याची आणि रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि विलंब न करता रुग्णालयात उपचारांसाठी  धाव घेणे गरजेचे आहे. हे एकाद्याचा अमूल्य जीव आणि मेंदूचे कार्य वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरते. वेळीच केलेली कृती आणि वेळेवर मिळणारी वैद्यकीय सेवा हे स्ट्रोकपासून बचावासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.





Source link