मुंबई : राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) दोन दिवसात सातारा दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला त्या अभिवादन करणार आहेत. तसेच अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचं बारामती विमान अपघातात निधन झालं होतं. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे होते. त्यांच्या निधनानंतर या आधी पवार कुटुंबीयांतील आमदार रोहित पवारांनी भेट घेतली होती. आता सुनेत्रा पवारही त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला जाणार आहेत.
Vidip Jadhav : विदीप जाधव यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आलं. तरडगावमध्ये 29 जानेवारी रोजी रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांना पोलीस सलामी देऊन अखेरचा निरोप देण्यात आला. विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार आणि गावावर मोठी शोककळा पसरल्याचं दिसून आलं.
सुनेत्रा पवारांची पोस्ट
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा पदभार असेल. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक्स पोस्ट केली. ती खालीलप्रमाणे,
आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट केली. कठीण प्रसंगातही सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला. तो कौतुकास्पद आणि धाडसी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसंचं अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे चालवतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा







