Leopard Attack in Satara: ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर (Vilasrao Patil Undalkar) यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात अधिराज पाटील (Adhiraj Patil) यांना पायाला दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे–शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. अधिराज पाटील हे आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी दुचाकी चालवत असलेले धनाजी पाटील हे थोडक्यात बचावले.
Leopard Attack in Satara: प्रचार आटोपून परततानाच थरारक घटना
अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आहेत. प्रचार आटोपून परतत असतानाच ही थरारक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अधिराज पाटील यांना तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Leopard Attack in Satara: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान, उंडाळे आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सातत्याने होत असलेल्या मानव–बिबट संघर्षाच्या घटनांमुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी वेशीपर्यंत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे होणाऱ्या मानव–वन्यजीव संघर्षावर उपाय म्हणून काही स्तरातून बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी होत असली तरी, वन्यजीवप्रेमी आणि तज्ज्ञ मात्र या भूमिकेला विरोध करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वन विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रचारसभेत बोलताना अधिराज पाटील म्हणाले होते की, परिसरातील तीनही उमेदवार येथे निवडून येतील, असे मी तुम्हाला आश्वासन देतो. परिसरातील नागरिकांची छोटी-मोठी कामे बाकी आहेत. कोणाला व्यायाम शाळा पाहिजे, कुणाला ग्रंथालय पाहिजे, रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशा मागण्या होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण सत्तेत नव्हतो. मात्र, आता आपण सत्ताधारी पक्षात आहोत. चार वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे आपल्याकडे निधी नव्हता. आता या निवडणुकीनंतर राहिलेले कामे पूर्ण करू, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा








