पाटण; गणेशचंद्र पिसाळ : 21 जुलै 2021 ची ती काळीकुट्ट रात्र पाटण तालुक्यातील काही गावं व कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. भूस्खलन, महापूर आपत्तीत तब्बल अडतीसहून अधिक जणांचा मातीच्या ढिगार्याखाली अडकून तर काहींचा महापुरात वाहून मृत्यू झाला. राहती घरं, काडी काडी गोळा करून उभा केलेला संसार आणि आपल्या पोराबाळांसह अनेक कुटुंबांना निसर्गाने जलसमाधी दिली. हजारो एकर शेती, पिकं जमिनींसह वाहून गेली तर अब्जावधींचे वैयक्तिक, सार्वजनिक नुकसान झाले. कधीही न भरून येणार्या हानीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या काळ्या आठवणींच्या जखमा आजही भळभळत आहेत. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली.. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ याप्रमाणे या आपत्तीग्रस्तांच्या जीवनात बदल होण्यासाठी स्थानिकांसह प्रशासन, शासन अथवा लोकप्रतिनिधींनी नक्की काय धडा घेतला याचे उत्तर मात्र दुर्दैवाने अद्यापही अनुत्तरितच आहे.
आजवर अनेक वर्षे भूकंप,अतिवृष्टी, महापूर पाचवीलाच पूजलेल्या पाटण तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनामध्ये काही गावांतील कुटुंबेच्या कुटुंबे, घरादारांसह अक्षरशः मातीत गाडली गेली. शेवटचा मोकळा श्वासही त्यांच्या नशिबात नव्हता, यासारखे दुःख नाही. निसर्गाचा हा प्रकोप स्थानिकांच्या मुळावर नक्की का उठला याचे उत्तर कोणालाच मिळाले नाही. ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून याच तालुक्यात अनेक धरणे जन्माला घातली. राज्यातील जनतेची तहान भागवून त्यांच्या जीवनात प्रकाश पाडला, दुर्दैवाने त्याच भूमिपुत्रांच्या बहुसंख्य गावांतील हा अंधार जीवघेणा ठरला.
ढगफुटी, अतिवृष्टी, भूस्खलनामध्ये जीवित व वित्तहानी झाली. यापूर्वीही 11 डिसेंबर 1967 चा विनाशकारी भूकंप या तालुक्याने पचवला होता. त्याकाळातही धरतीने शेकडो भूमिपुत्रांना आपल्या मिठीत घेतले होते. दुर्दैवाने तो भूकंप आणि दोन वर्षांपूर्वीच्या प्रलयामध्ये अनेकांचे संसार, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक, जीवित व वित्तहानी झाली. निसर्गाच्या या प्रकोपामुळे तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटीमुळे नद्या, ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलून गेले. सागरासारखे पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसल्याने शेकडो एकर शेती, पिके जमिनींसह वाहून गेली. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, कोयना, मोरणा, पाटण, चाफळ, तारळे, ढेबेवाडी आदी भागात अनेक रस्ते खचले, वाहून गेले. तीच अवस्था छोटे पूल, फरशी पुलांचीही झाल्याने अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला .
शासन, प्रशासन, स्थानिक नेते मंडळींनी सार्वत्रिक खबरदारी व उपाययोजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न केले, वैयक्तिक व सार्वजनिक पंचनामे झाले. मात्र प्रत्यक्षात मदत किती व कोणाला मिळाली याचे सकारात्मक उत्तर दोन वर्षांनंतरही मिळालेले नाही. अब्जावधींच्या हानीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन तालुक्यासाठी खास बाब म्हणून राज्य व केंद्र शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते; पण दुर्दैवाने आजपर्यंत तसे घडलेच नाही.
कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा करत काही वर्षांपासून धरणातील बोटिंग बंद आहे. या आपत्ती काळात कोयनानरच्या नेहरू उद्यानाच्या पुढे अनेक ठिकाणी रस्ते पूर्णतः खचल्याने उद्यानाच्या मागील बाजूच्या बोटिंग धक्यावरून बोटींच्या आधाराने मिरगाव, नवजा, कामरगाव भागातील आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे काम सुरू होते. स्थानिकांना बोटिंगशिवाय पर्यायच नाही, हे त्या वेळी लक्षात येऊनही दोन वर्षांत मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (क्रमशः)







