- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Purvani Samkal By Mahendra Kadam On Moments Disappearing, Appearances Disappearing
महेंद्र कदम11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपल्याकडे कालगणनेच्या दोन पद्धती आहेत. प्रशासकीय पद्धत ही ख्रिस्त इसवी सनाची म्हणजे इंग्रजी कॅलेंडरची आहे, तर दुसरी सांस्कृतिक परंपरा ही शकाची म्हणजे मराठी महिन्यांची आहे. चैत्र ते फाल्गुन या कालगणनेवरच आपले सगळे सण आधारित आहेत, जे शेतीशीही संबंधित आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना ही भारतीय परंपरा समजून घ्यायला हरकत नाही. कारण भारतीय शालिवहन शके ही कालगणना सुरू करणारे सातवाहन राजे महाराष्ट्रातील आहेत.
पैठण म्हणजे पूर्वीचे प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी. सम्राट अशोकानंतर उतरती कळा लागलेल्या भारतीय राजन्य पद्धतीला पुन्हा सन्मान मिळवून देणाऱ्या सातवाहन राजा शतकर्णी याने इ. स. ७८ मध्ये शकांच्या परकीय सत्तांचा पराभव केला आणि त्या विजयाची आठवण म्हणून शक सुरू केले. तर ख्रिस्त सन हे पहिल्या शतकापासून सुरू झाले आहे. म्हणूनच सन आणि शकामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे. याच परंपरेतील सातवाहन राजा हाल याने कृषिजीवन समजून घेण्यासाठी ग्रामीण गीतांचे संकलन केले. ‘गाथासप्तशती’च्या रूपाने प्राकृत मराठीत तो प्रकाशित करून दोन हजार वर्षांपूर्वीचा सामाजिक – सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला आहे. शककर्त्या सातवाहनांची महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी चारशे वर्षे सत्ता राहिली. हे राजे आपल्या नावांच्या आधी आईचे नाव लावत असल्याने त्यांना मातृसत्ताक राजे म्हणत. सर्वात पहिला शिलालेख आणि सगळ्यात मोठी मूर्ती सातवाहन राणी नयनिका हिच्या आहेत. ती स्वत: राज्यकर्ती असावी, असा दाखला मिराशी यांनी दिला आहे. सातवाहन काळात मातृसत्ताक परंपरा बळकट असाव्यात, असा निर्वाळा गेल ऑम्वेट देतात. ही मातृसत्ताक परंपरा शेतीनिष्ठ असल्याने आजही सगळ्या सण- उत्सवांमध्ये कृषितत्त्व निष्ठेने जपले आहे. सातवाहन राज्यात स्त्रियांना स्वतंत्र अधिकार होते. त्या काळात महाराष्ट्राचा थेट रोमशी व्यापार होत होता. अनेक सातवाहन स्त्रियांनी विहारांना आणि वैदिकांना दान दिल्याचे उल्लेख आहेत. हा समाज बऱ्यापैकी पुरोगामी होता. हा संपूर्ण इतिहास विसरून आपण येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू झालेले इसवी सन मोठ्या प्रमाणात साजरे करत निघालो आहोत. इंग्रजांनी जगभर सत्ता गाजवल्याने आपण ती कालगणना स्वीकारली आहे. जगाबरोबर चालायला हरकत नाही, पण त्यात आपण आपला इतिहास विसरून चालणार नाही. हा इतिहास सांस्कृतिकदृष्ट्या विषमतेने भरलेला असला, तरी वंचितांच्या इतिहासाची न्याय्य व्यामिश्रता नाकारता येणार नाही. इतिहासाची ही गणना एका बाजूला काळाची, तर दुसऱ्या बाजूला वेळेची आहे. ही वेळगणनाही आपल्याकडे निसर्गाशी बांधलेली होती. वाळूतलं, सावलीतलं, हाताच्या वितीचं घड्याळ ते झाडाच्या सावल्या, आकाशातील चंद्र – ताऱ्यांचा अंदाज – जसं की, तिकटणं निघालं, चांदणी उगवली- यावरून वेळ ठरवली जायची. तर पळ, घटिका, प्रहर या रूपांचा वापर करून सेकंद, तास, दिवसातला विशिष्ट काळ यांची नोंद केली जायची. यातूनच पुढे हातातल्या घड्याळाचा शोध लागला. हातातलं हे घड्याळ आज मोबाइलमध्ये आलं आहे. या सगळ्या जाणिवांसह डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आमचं नवीन वर्ष सुरू व्हायचं. पंधरा पैशांच्या पोस्टकार्डवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहून ते पोस्टात टाकायचं. एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता तासभर अभ्यासाला बसून, रेल्वे स्टेशनच्या टपरीवरचा चहा पिऊन, स्वप्न पाहात गोधडीत गुडूप होऊन जायचं. या प्रवासातला माणूस आजही तोच आहे. भूक तीच आहे. गरजा त्याच आहेत. परंतु, त्याचा कब्जा तंत्रज्ञानानं आणि आभासी दुनियेनं घेतल्यानं तो जगण्यातली मौज हरवून बसला आहे. छोट्या – छोट्या गोष्टीतला आनंद विसरला आहे. कुटुंबात संवाद राहिला नाही. मित्रांचे ग्रुप दिसत नाहीत. दिसले तरी ते मोबाइलमध्ये व्यस्त आहेत. आपल्या सभोवती काय सुरू आहे? देश कुठं चाललाय? आपण काय हरवत चाललोत? माणसा – माणसांत पडत चाललेल्या अंतरानं कोणता दिवस उगवणार आहे? याचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही. जगणं सुसह्य करण्यासाठी नववर्षाचं स्वागत करताना, सरत्या वर्षांची गणना करणं आवश्यकही असतं, नाही असं नाही. भारत हा बहुसांस्कृतिक व्यवस्था असलेला देश आहे. सातवाहन राजांसह अनेकांनी तो उभा केला आहे. तांत्रिक, वैदिक, जैन, बौद्ध, मुस्लिम या सगळ्यांनी हजारो भारतवर्षे घडवली आहेत. सम्यक समतेला सतत खुणावणारी ही भूमी आपण अधिक सर्जक बनवायला हवी. त्यासाठी थोडं मागं वळून पाह्यलं, तर काही सुवर्ण पाऊलखुणा आपल्याला दिसतील. त्या खुणांमध्ये नवं बळ बांधूनच आपल्याला नव्या वर्षात पुढचं पाऊल टाकता येईल.
(संपर्क- mahendrakadam27@gmail.com)





