सातारा : बारामती विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित दादांच्या रुपाने महाराष्ट्राने मोठा नेता गमावला, तर अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. तर, विदीप जाधव (Vidip Jadhav) यांच्या मृत्यूने जाधव कुटुंबीयांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवार आणि जाधव कुटुंबीय दु:खात असून दोन्ही कुटुंबीयांकडून एकमेकांचे सांत्वन करण्यात आले. अजित दादांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे आली. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच सुनेत्र पवार यांनी कराडमधील प्रितीसंगम म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, दिवंगत विदीप जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा शब्द देत त्यांनी जाधव कुटुंबीयांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थितांचे डोळे पाणावले. पतीच्या निधनाने स्वत:वरही आधीच दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्यपथ सांभात अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला. त्यांच्या या कृतीने संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेतली होीती. “विदीप जाधव यांनी अजितदादांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले होते. दुर्दैवाने दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जसा दुःखात आहे, तसेच विदीप जाधव यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःख वाटल्याने कमी होते, म्हणून आज फलटण (तरडगाव) इथं जाधव कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला.”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. तसेच, आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा







