
शेखर गायकवाड17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
टपाल कक्षात समक्ष जाऊन नागरिक आपल्या अर्जाचा शोध घेतात, त्यावेळी बहुतेक वेळा चार दिवसांचे टपाल लिहिलेले नसते किंवा ते साहेबांकडे गेलेले असते. मग अशा वेळी त्या अर्जदारांकडूनच पुन्हा अर्जाची झेरॉक्स प्रत घेऊन ते आवक वहीत नोंदवले जाते. त्यामुळे एकाच अर्जदाराला दोन वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिली जातात आणि हे उत्तर नकारात्मक असेल, तर वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रामध्ये, सरकारी कारभार किती भोंगळपणे चालतो, याचे सुरस वर्णन वाचायला मिळते.
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ‘टपाल कक्ष’ हा एक विभाग असतो. शक्यतो ज्याला कोणतेही काम नीट जमत नाही, अशा कर्मचाऱ्याला टपाल कक्षात टाकायची एक जुनी प्रथा आहे. त्यामुळे टपाल वेळेवर न सापडणे, दिलेले टपाल हरवणे, अर्ज भलतीकडेच पाठवले जाणे अशा घटना घडतात आणि शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहते. लोकही सरकार दरबारी अनावश्यक अर्जफाटे करीत असल्यामुळे टपाल कक्षाच्या माणसाचे देखील डोके ठिकाणावर राहू शकत नाही. एखादा विशिष्ट अर्ज नक्की कोणाला पाठवावा, हे भल्या भल्या माणसांनाही कळत नाही. टपाल कक्षात काम करणारे कर्मचारी हाकलून द्यावेत, असा कुणाचा अर्ज आला, तरी ते निर्विकारपणे त्यावर शिक्का मारुन साहेबांकडे पाठवतात. एकदा एका कलेक्टर कचेरीत आलेल्या एका अर्जामध्ये ‘देवदासींचे पुनर्वसन’ करण्याची मागणी होती. कलेक्टर ऑफिसच्या टपाल पाहणाऱ्या अव्वल कारकुनाने तो जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याला पाठवला. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याने, ‘आपण धरणग्रस्तांचे पुनर्वसन करतो, देवदासींचे नाही,’ असे सांगून पाहिले. पण, चिटणीस पदनामावरील कर्मचारी काही ऐकेना. तो म्हणाला, ‘पुनर्वसन’ हा शब्द तुमच्याच पदनामात आहे! शेवटी त्या अधिकाऱ्याने अर्ज ताब्यात घेऊन हे कार्यालय देवदासींचे पुनर्वसन करीत नाही, असे उत्तर पाठवले. लोकांचे अर्जसुद्धा अनेक वेळा फार गंमतीशीर असतात. गावातल्या कामाची चौकशी करणारा अर्ज राष्ट्रपतींना, दुसऱ्या देशांची चौकशी करायचा अर्ज मामलेदारांना, बायको नांदत नसल्याचा अर्ज कलेक्टरला केला जातो. टपाल कक्षात नेमका महत्त्वाचा संदर्भ ऐनवेळी सापडण्याची शक्यता नसते. अमुक तारांकित प्रश्न तीन दिवस झाले तरी आणि मंत्रालयातून तगादे आले तरी का सापडत नाही, याचा पिच्छा पुरवला असता तो भलत्याच डिपार्टमेंटला गेल्याचे १०-१२ तास शोधाशोध केल्यावर कळते. अशा या टपाल कक्षात समक्ष जाऊन ज्यावेळी नागरिक आपल्या अर्जाचा शोध घेतात, त्यावेळी बहुतेक वेळा चार दिवसांचे टपाल लिहिलेले नसते किंवा ते साहेबांकडे गेलेले असते. मग अशा वेळी त्या अर्जदारांकडूनच अर्जाची झेरॉक्स प्रत पुन्हा घेऊन ते आवक वहीत नोंदवले जाते. त्यामुळे एकाच अर्जदाराला दोन वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे संबंधित विभागांकडून दिली जातात आणि हे उत्तर नकारात्मक असेल, तर वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रामध्ये, अशा प्रकरणात सरकारी कारभार किती भोंगळपणे चालतो, याचे सुरस वर्णन वाचायला मिळते. असा अर्जदार सराईत असेल, तर मग तो जावयासारखा वागायला लागतो आणि कर्मचाऱ्यांना दमबाजी करुन बेकायदेशीर काम करुन घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा परिणाम न झाल्यास, एकाच माणसाच्या दोन अर्जांना वेगवेगळे उत्तर दिल्यामुळे संबंधितांविरुध्द चौकशी करुन, त्यांना निलंबित करुन कारवाई करण्याबद्दल आणखी एक अर्ज केला जातो. अनेक वर्षांच्या कारभारानंतर आता या टपाल कक्षाची काही गंमतीशीर वैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत, ती अशी : – कोणत्याही डिपार्टमेंटच्या टपाल विभागात निनावी अर्ज कधीही हरवत नाहीत. पण, सही केलेले कागद मात्र कधीही वेळेवर सापडत नाहीत. – ‘गोपनीय’ असे लिहिलेले टपाल कोपऱ्यात फाडून वाचलेले असते आणि उघड पाठवलेले पत्र कोणीही वाचत नाही, असा या टपाल कक्षाचा अद्भूत महिमा आहे. – ‘फक्त साहेबांसाठी’ असे नमूद केलेला लिफाफा हमखास टपाल कर्मचारी उघडून वाचतात. – एकाच कार्यालयाला पाठवायच्या सर्व पत्रांना वेगवेगळे लिफाफे करुन तिकिटे लावली जातात आणि कमी महत्त्वाचे टपाल घेऊन गेलेल्या शिपायाला महत्त्वाचे टपाल घेऊन जाण्यासाठी पुन्हा दुपारी बोलावले जाते. – क्षेत्रीय स्तरावर ग्रामपंचायतीपर्यंत दिवस-रात्र, आवक नंबर, जावक नंबर, अर्ज, पोहोच, शेरा आणि त्याभोवती फिरणारी माणसं फिरत असतात. पण, त्यातील किती जणांचे काम प्रत्यक्षात होते, हा प्रश्नच पडावा! – टपाल शाखेत शक्यतो कानाने कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तीला नेमल्यास त्याला वारंवार अर्जफाटे करणारे लोक फार त्रास देत नाहीत! – कायद्यात आणि नियमांत बसणारे काम नसल्यास शक्यतो अशा अर्जाच्या प्रती टपाल कक्षात पुन्हा पुन्हा सादर केल्या जातात. – एकाच अर्जात वेगवेगळ्या विभागांशी संबंधित मागण्या केलेल्या असल्यास तो अर्ज एखाद्याच विभागाकडे जाण्याची आणि कोणतेच काम न होण्याची शक्यता प्रबळ असते. – टपाल दिलेल्या कक्षामध्ये अर्जदाराने ‘पुन्हा कधी चौकशी करु?’अशी विचारणा केल्यास आणि ‘दोन दिवसांनी’ असे उत्तर मिळाल्यास दोन दिवसाचा अर्थ बावीस दिवस असा घ्यावा लागतो! – अर्जदाराला घाईघाईने उत्तर प्राप्त झाल्यास, आपण नको त्या ऑफिसला अर्ज केला होता, असे त्याने बिनधास्त समजावे! – काही कार्यालये टपाल कक्ष लवकर सापडणार नाही अशा ठिकाणी, अडचणीच्या जागी किंवा दुसऱ्या मजल्यावर करतात.
shekharsatbara@gmail.com





