रसिक स्पेशल: हात हातात अन् ‘स्व’बळ मनात!

0
21
रसिक स्पेशल:  हात हातात अन् ‘स्व’बळ मनात!


प्रशांत कदम2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भाजपचं शिवसेनेसोबतचं मूळ भांडण हे स्वबळाच्या महत्त्वाकांक्षेपोटीच सुरू झालं होतं. आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यानंतरही ती पूर्ण होऊ शकत नसेल, तर भाजपला महाराष्ट्रातील आपल्या विस्ताराच्या प्लॅनचा नीट फेरविचार करावा लागेल. त्या दृष्टीने येत्या तीन-चार महिन्यांतील घडामोडी खूप महत्त्वाच्या असतील.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीची एकत्रित ताकद महायुतीला भारी पडली, हे दाखवून दिलं. अवघ्या तीन – चार महिन्यांत विधानसभेची निवडणूक असल्यानं या निकालाचा परिणाम पुढे कसा दिसणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. महाराष्ट्रात आजवर दोन पक्षांची आघाडी आणि युती एकमेकांविरोधात लढत होती. पण, तीन पक्षांची महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांविरोधात लढण्याची ही पहिलीच वेळ होती. साहजिकच, ज्या बाजूला मतांचं हस्तांतरण अधिक सुलभ झालं, ती बाजू उजवी ठरली. लोकसभेला हे गणित तसं सोपं होतं, पण विधानसभेला ते तितकं सोपं नक्कीच नसेल. अगदी जागावाटपाच्या चर्चेपासूनच हे काम किती महाकठीण आहे, याची प्रचिती यायला लागेल. शिवाय, लोकसभेला राष्ट्रीय मुद्द्यांवर मतांचं हस्तांतरण होणं सोपं असतं, पण विधानसभेला स्थानिक मुद्दे, स्थानिक समीकरणांची सरमिसळ झाल्यानंतर हा गुंता अधिक किचकट ठरु शकतो.

विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार, असं आपण आत्ता गृहीत धरतोय. पण, दोन्ही बाजूंनी तशी जाहीर स्पष्टता अद्याप झालेली नाही. त्यातल्या त्यात महाविकास आघाडीत निकालानंतर फक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं एक विधान कुरबुर वाढवणारं होतं. आम्हीच मोठे भाऊ आहोत, असा त्यांचा दावा होता. पण, हा वाद पुढे फार वाढला नाही. निकालानंतर महाविकास आघाडीने एकत्रित पत्रकार परिषदही घेतली, विधानसभा एकत्रितच लढू, असं एक प्राथमिक वक्तव्यही त्यावेळी केलं गेलं. पण, महायुतीत मात्र निकालानंतरची दरी वाढत चालली आहे. निकालाआधी अनेक राजकीय पंडितांचा अंदाज होता की, भाजपला वैयक्तिक फटका तुलनेनं कमी बसेल, सर्वाधिक नुकसान मित्रपक्षांचं म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदेंचं होईल. पण, प्रत्यक्षात तसं झालं नाही. महायुतीत भाजपचंही पानिपत झालं. महायुतीत त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंचीच कामगिरी बरी राहिली. त्यांनी 15 जागा लढून 7 जिंकल्या. भाजपला 28 जागा लढवून अवघ्या 9 मिळाल्या.

आता या निकालानंतर कुणामुळे किती फायदा झाला, याची चर्चा महायुतीत जोरात सुरू झाली आहे. वणवा पेटल्याप्रमाणे वक्तव्यांची मालिका सुरू आहे. संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रात, अजितदादांना सोबत घेण्याची गरज नव्हती, असं म्हटलं गेलं. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तर थेट अजित पवार महायुतीत थोडे उशिरा आले असते, तर चालले असते, असं विधान केलं. त्या वक्तव्यावरुन उडालेल्या गदारोळात प्रकरण अगदी लंगोटापर्यंत पोहचलं आहे.

आमच्यामुळे महायुतीचं लंगोट तरी वाचलं, हे विधान अजितदादा गटाच्या प्रवक्त्यांनी केलं. भाजपच्या दृष्टीनं अजित पवारांची उपयुक्तता ही मराठा चेहरा म्हणून आहे. पण, त्यांच्या या चेहऱ्याचा उपयोग महायुतीच्या विरोधातला मराठा असंतोष कमी करण्यात भाजपला झालाच नाही, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचं सोबत येणं भाजपच्या केडरनं जितक्या सहज स्वीकारलं, ती सहजता अजित पवारांच्या बाबतीत नव्हती.

या पार्श्वभूमीवर सध्या तरी महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची जितकी शक्यता वाटते आहे, त्यापेक्षा कमीच शक्यता महायुतीच्या बाबतीत दिसते आहे. भाजपला स्वबळावरच लढण्याची मनातून कितीही इच्छा असली, तरी सोयीपुरतं या पक्षांना वापरुन घेतलं, हा आरोपही परवडणारा नाही. त्यामुळे एक तर तीन पक्ष एकत्रित लढतील किंवा दुसरी शक्यता म्हणजे तिघांपैकी किमान दोन पक्ष एकत्रित राहतील आणि तिसऱ्या पक्षाला स्वतंत्र राहण्यासाठीची एक सैद्धांतिक वाट मोकळी करुन दिली जाईल. अर्थात, हे सगळं अनुमान सध्याच्या स्थितीवरच. अनेकदा राजकारणात होणाऱ्या तडजोडी युती-आघाडीच्या समीकरणापलीकडेही कशा काम करतात, यासाठी 2014 चे उदाहरण लक्षात ठेवायला हवे. तेव्हा ज्या क्षणी शिवसेना आणि भाजपची युती तुटली, बरोबर त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीही तुटली होती. युतीच्या बाजूनं भांडण हे ताकद वाढल्याचं होतं. पण, आघाडी तर त्यावेळी संकटात होती आणि देशाच्या सत्तेवर मोदी बसलेले दिसत असतानाही भांडत होती, ती नेमकी कुणाच्या फायद्यासाठी?

हा सगळा इतिहास पाहता, येत्या तीन – चार महिन्यांतील घडामोडी खूप महत्त्वाच्या असतील. शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या बाबतीत जे झालं आहे, त्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयातून येणं बाकी आहे. त्या निकालाचा निवडणुकीवर कसा परिणाम होतो, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. 2014 ला देशात मोदी-शाहांच्या उदयानंतर भाजपला महाराष्ट्रात सातत्यानं स्वबळाचं स्वप्न पडतं आहे. शिवसेनेसोबतचं त्यांचं मूळ भांडण हे त्या महत्त्वाकांक्षेपोटीच सुरू झालं होतं. आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यानंतरही ती पूर्ण होऊ शकत नसेल, तर भाजपला महाराष्ट्रातल्या आपल्या विस्ताराच्या प्लॅनचा नीट फेरविचार करावा लागेल. 105 आमदार असतानाही भाजपने 40 आमदारांच्या पक्षाला मुख्यमंत्री केलं आहे, दुसऱ्या 40 आमदारांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रिपद दिलं आहे. ही सगळी रचना केवळ या पाच वर्षांसाठीच आहे. साहजिकच, पुढच्या वेळी मुख्यमंत्री आपला असावा या दृष्टीनेच ते रणनीती आखतील. त्यामुळे मिशन 150 जाहीर केलेल्या भाजपला त्यासाठी किमान 180 ते 190 तरी जागा लढाव्या लागतील. मग महायुतीच्या जागावाटपात शिंदे-अजितदादांसाठी काय शिल्लक राहते, हाही प्रश्न आहे. केंद्रात भाजप बहुमताच्या खाली असल्याने भाजपला शिंदेंच्या सात खासदारांची गरज दिल्लीतही पडणार आहेच. त्यामुळे या जागावाटपाच्या चर्चांमध्ये शिंदेंचा भाव अधिक राहणार, असं दिसतंय.

लोकसभेच्या निकालानंतर लगेच होणारी पहिली निवडणूक ही महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यांच्या विधानसभेची आहे. त्यात महाराष्ट्रासारखं राजकीय आणि महसुलाच्या दृष्टीनंही महत्त्वाचं राज्य गमावणं परवडणार नाही, याची पुरेपूर कल्पना भाजपच्या नेतृत्वाला आहे. त्यामुळेच दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शाहांनी राज्यातल्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारमधून मोकळं करा, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर न पडताच काम करावं लागणार आहे. सामूहिक नेतृत्वाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

एक स्पष्ट आहे की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकी महायुतीपेक्षा जास्त भक्कम राहिली, मतांचं एकमेकांना हस्तांतरणही अधिक सुलभ पद्धतीने झालं. आता या निकालानंतर आपले आमदारही आपल्याच बाजूने राहतील, याची काळजी अजित पवार-एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच महायुतीत सगळे काही आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक जण आपापला चष्मा घेऊन निकालाचे विश्लेषण करताना दिसतोय. देवेंद्र फडणवीस 0.3 टक्क्यांच्या फरकाचं गणित सांगतायत, एकनाथ शिंदे स्ट्राइक रेट सांगतायत, 13 जागा ठाकरेंसमोर लढलो, त्यातल्या 7 जिंकलो म्हणजे आपलीच खरी शिवसेना, असाही दावा करतायत. पण शेवटी निकालपत्रावर येणारे 31विरुद्ध 17 हे आकडेच महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत जनमताचं हे चित्र बदलण्याचं काम महायुती करु शकते का, की महाराष्ट्र एका अनोख्या सत्तांतराला सामोरं जाणार, हे लवकरच कळेल.

(संपर्कः pshantkadam@gmail.com)



Source link