
Eknath Shinde Meets Amit Shah: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय चर्चा झाली याचा उलगडा केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भाजपाचं नेतृत्व आहे आणि मी शिवसेनेचा लीडर आहे. आम्ही आमच्या लोकांना काय सांगायचं ते ठरलं आहे अशी माहिती त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. नाराजीचा विषय स्थानिक पातळीवर होता असंही त्यांनी सांगितलं.
“दिल्लीमधून मी आता बिहारला निघणार आहे. बिहारच्या यशाचं अभिनंदन कऱण्यासाठी मी अमित शाह यांना भेटलो. यावेळी आमच्यात चांगली चर्चा झाली. त्यांचं अभिनंदन केलं. बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला असून, घटकपक्ष असल्याने आम्हालाही आनंद आहे. म्हणून मग जाताना भेटणं, शुभेच्छा देणं, अभिनंदन करणं हे आलंच,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
महाराष्ट्रात एनडीए आपापसात भांडत असल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, “एकनाथ शिंदे तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही. हा रडणारा नाही लढणारा आहे. छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नाही. बिहारमध्ये एनडीएत पाच पक्ष एकत्र होते. त्यांच्या एकजुटीमुळे प्रचंड मोठं यश बिहारच्या जनतेने दिलं. त्यांना जंगलराज नको होतं आणि विकासराज हवं होतं. मोदींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. नितीश कुमार यांनी पूर्वीचा काळ बदलला. एकजुटीने लढतो तेव्हा यश नक्कीच मिळतं. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत एकीचं बळ, एकजुटीची ताकद पाहिली आहे. महाराष्ट्रातील जनतेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला ही वस्तुस्थिती आहे”.
भाजपा विरुद्ध शिवसेना असं चित्र उभं राहिल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले. “हे सर्व कल्पनाविलास आहे. हे तुम्ही पतंग उडवत असता. मी आत बसलो आहे आणि बाहेर बातम्या सुरु आहेत. नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रश्न नसतो. काल मुख्यमंत्र्यासोबत बसलो, चर्चा झाली. त्यात महायुतीला कुठंही गालबोट लागणार नाही, मतभेद होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, आणि तशा सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाने दिल्या पाहिजेत अशी चर्चा झाली. तो विषय संपला आहे”, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“नाराजीचा विषय इथे नव्हताच. तो विषय स्थानिक पातळीवर होता. तो राष्ट्रीय पातळीवरील विषय नव्हता,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. गणेश नाईक यांच्याकडून आव्हान देण्यासंदर्भातील प्रश्नावर पक्षश्रेष्ठी यासंदर्भात निर्णय घेतील असं सांगितलं.
“तो विषय काल संपला आहे. मी तो फार गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भाजपाचं नेतृत्व आहे आणि मी शिवसेनेचा लीडर आहे. आम्ही आमच्या लोकांना काय सांगायचं ते ठरलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. ते त्यांसंदर्भात त्यांच्या नेत्यांना सूचना देतील. महायुती मजबीतूने निवडणुकीला सामोरी जात आहे. विधानसभेत मिळालं तसं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही यश मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.







