
Corporate Company Culture Period Leave: मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास हा महिलांबरोबरच पुरुषांसाठीही महत्त्वाचा विषय आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिलांसोबत काम करणाऱ्या पुरुषांनाही त्या पाच दिवसांमध्ये आपल्या सहकारी महिलेसोबत अधिक काळजीपूर्वक वागलं पाहिजे याची जाणीव असते. खास करुन कॉर्परेट जगात हा ट्रेण्ड हल्ली प्राकर्षाने जाणवून येत आहे. मात्र सगळीकडे हेच चित्र असतं असं म्हणणं धाडसाचं ठरले. सध्या कॉर्परेटमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मासिक पाळीच्या काळातील अडचणी चर्चेत आहेत एका व्हायरल पोस्टमुळे!
…म्हणून दृष्टीकोन अधिक भावला
एका महिलेने तिच्या कंपनीच्या संस्थापकाकडून मासिक पाळीच्या आरोग्याबाबत आणि कामाच्या ठिकाणी आरोग्याबाबत शेअर केलेला एक मेसेज सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडिया मार्केटर असलेल्या अर्चना शर्मा यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवरुन मॅनेजरने केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. भूतकाळात कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या काळात काम करण्याचे कटू अनुभव पाठीशी असल्याने या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहाणारा कंपनीचा संस्थापक शर्मा यांना अधिक भावल्याचं दिसत आहे.
पोस्टमध्ये म्हटलंय काय?
“आज आम्हाला आमच्या संस्थापकाकडून हा मेसेज आला. पूर्वी कामाच्या ठिकाणी असलेल्या घातक वातावरणातून आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला या मेसेजचा अर्थ किती खास आहे हे शब्दात सांगता येणार नाही. हा मेसेज आपल्याला आठवण करुन देतो की कामाचं चांगलं ठिकाण म्हणजे केवळ भत्ते किंवा धोरणांच्या आधारे निश्चित करता येत नाही तर सहानुभूती, विश्वास आणि आदराच्या आधारावर निश्चित होते,” असं शर्मा यांनी म्हटलं आहे. शर्मा यांनी शेअर केलेल्या पोस्टसोबत संपूर्ण टीमला पाठवलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये नवीन कर्मचारी-केंद्रित तरतुदीची घोषणा संस्थापकांकडून करण्यात आली होती. मासिक पाळीसंदर्भात संस्थापकांनी केलेल्या मेसेजवर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.
संस्थापकाच्या मेसेजमध्ये काय?
संस्थापकांनी, “प्रिय टीम, मासिक पाळीच्या काळातील आरोग्य हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक आवश्यक भाग आहे. आजपासून, जर आमच्या महिला सहकाऱ्यांना मासिक पाळी येत असेल, तर त्या घरी आराम करू शकतात आणि केवळ आराम करू शकतात. मासिक पाळीत घरी आराम करण्यासाठी दिलेली सुट्टी ही अधिकृत सुट्टी म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कल्याण हे सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे,” असं आपल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
अनेकांनी केलं कौतुक
या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी संस्थापकांच्या सहानुभूतीपूर्ण भूमिकेचे कौतुक केले आहे. “कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित केल्याने नेहमीच सर्वोत्तम परिणाम मिळतात. ही पोस्ट इतर अनेकांना प्रेरणा देईल,” असा विश्वास एकाने व्यक्त केलाय तर दुसऱ्याने “कॉर्पोरेट जगात असे लोक फार मोजकेच असता. त्यांचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत,” असं म्हणत या भूमिकेबद्दल संस्थापकांचं कौतुक केलंय.








