
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तीन दिवसांपूर्वी, म्हणजे गुरुवारी नीतू कपूरजींशी माझे बोलणे झाले, तेव्हा त्यांनी सांगितले की, १४ डिसेंबरला राज कपूर साहेबांची शंभरावी जयंती आहे. त्या निमित्ताने पीव्हीआरमध्ये एक रेड कार्पेट इव्हेन्ट होणार आहे. त्यावेळी राज साहेबांचे निवडक सिनेमेही दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाला सहकुटुंब येण्याचे आमंत्रण नीतूजींनी मला दिले. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये हिंदी चित्रसृष्टीतील महान व्यक्तित्व ठरलेल्या राज कपूर साहेबांविषयी…
हा योगायोग होता की, नीतूजींच्या फोननंतर लगेच मला एका पत्रकाराचा फोन आला. ‘तुम्ही आर. के. प्रॉडक्शनचे शेवटचे लेखक होतात,’ अशी त्यांनी मला आठवण करुन दिली. त्यावर मी त्यांना सांगितले की, मला लानपणापासूनच सिनेमे पाहण्याची आवड होती. विशेषत: मी जेव्हा आर. के. प्रॉडक्शनचे सिनेमे बघायचो, तेव्हा सिनेमाच्या सुरूवातीला पापाजी म्हणजे पृथ्वीराज कपूर शिवलिंगाच्या समोर बसून पूजा करत असल्याचे दिसायचे. त्यानंतरच टायटल सुरू व्हायचे.
राज कपूर यांच्या सोफ्यावर बसलेले त्यांचे पुत्र रणधीर कपूर.
त्यामध्ये सिनेमाशी संबंधित सगळ्या लोकांची म्हणजे दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक आदींची नावे यायची. जेव्हा जेव्हा मी ते दृश्य बघायचो तेव्हा वाटायचे की, यात आपलेही नाव असते तर..? आणि बघा, ईश्वराने माझी मनोकामना ऐकली आणि माझे हे स्वप्न साकार झाले. पण, दु:ख याच गोष्टीचे वाटतेय की, माझी इच्छा पूर्ण तर झाली, पण ती राज कपूर साहेबांच्या निधनानंतर. ते गेल्यानंतर मी आर. के. प्रॉडक्शनसाठी काम केले. या गोष्टीवरुन मला मिर्झा गालिब यांचा एक शेर आठवतोय…
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि
हर ख़्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मिरे अरमान
लेकिन फिर भी कम निकले।
तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी डब्बूजी म्हणजे रणधीर कपूर यांनी मला सांगितले की, आमचा देवनारमधील बंगला विकला आहे. काही दिवसांतच तो पाडला जाईल आणि तिथे एक नवी इमारत उभी राहील. मी डब्बूजींना सांगितले की तो पाडण्याआधी तुम्ही तिथे एक डिनर ठेवायला हवे. त्यांनी माझे म्हणणे ऐकले आणि मग त्या घरी डिनरचे आयोजन केले.
आम्ही सगळे जण तिथे गेलो. बोनी कपूर, शत्रुजी, पूनमजी, अंजू महेंद्रू, शशी रंजन, अनू रंजन यांच्यासह बरेच लोक होते. जावेद अख्तर साहेबही आले होते. आम्ही साऱ्यांनी तिथे एक संस्मरणीय संध्याकाळ अनुभवली. प्रत्येकाच्या मनात हिच भावना होती की, आपण या बंगल्याला शेवटचे बघतो आहोत, आता तो पुन्हा दिसणार नाही. मी नंतर घरी आलो आणि झोपून गेलो.
सकाळी उठल्यावरही माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की, आता ते घर पुन्हा पाहायला मिळणार नाही. मग माझ्या मनात काय विचार आला माहीत नाही. मी डब्बूजींना फोन केला आणि म्हणालो की, हा बंगला पाडला जाण्याआधी मला तिथली राज कपूर साहेबांची एखादी वस्तू हवी आहे. कपूर परिवार मनाने किती मोठा आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे. ते मला लगेच म्हणाले, बंगल्यावर जा आणि जे पाहिजे ते घेऊन ये.
मग मी माझ्या मुलाला- साहिलला घेऊन त्या बंगल्यावर पोहोचलो. त्या बंगल्याकडे मन भरून पाहून घेतलं. मी मुलाला म्हणालो, तू खूप नशीबवान आहेस, तुला हा बंगला पाहायला मिळाला. मग मी प्रत्येक ठिकाणचे; बंगल्यातील ड्रॉइंग रूम, राज कपूर – कृष्णा आंटींची बेडरूम, त्यांची मसाज चेअर, तिथले लॉन अशा अनेक गोष्टींचे फोटो काढले, व्हिडिओ बनवले. त्याचवेळी मनात हा विचारही येत होता की, राज कपूर साहेबांची कोणती वस्तू आठवण म्हणून आपण सोबत न्यावी?
पहिल्यांदा मी विचार केला की, त्यांचा बेड आणि ड्रेसिंग टेबल घ्यावा. पण, ते आकाराने खूप मोठे होते. आमचा फ्लॅट छोटा असल्याने त्यात एवढा मोठा बेड ठेवता आला नसता. मग विचार केला, पेंटिंग घेऊन जावे. ते फ्लॅटमध्ये लावता येईल. परंतु, मनात दुसरा विचार आला की, पेंटिंग तर लाखो-करोडोंचे असेल. डब्बूजींना वाटेल, याने दिलेल्या शब्दाचा गैरफायदा घेतला, लाखो रुपयांचे पेंटिंग घेऊन गेला.
मी व्हरांड्यात गेलो. तेथे झोक्याच्या जवळ एक सोफा ठेवलेला होता. डब्बूजींनी मला कधीतरी सांगितले होते की, राज कपूर साहेबांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची कामे याच सोफ्यावर बसून केली होती. मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम या सिनेमांच्या मीटिंग याच सोफ्यावर बसून केल्या होत्या. काही सिनेमांच्या लेखनाच्या बैठकाही त्यांनी याच सोफ्यावरुन केल्या होत्या. त्यामुळे आपण हा सोफाच घ्यावा, आपण यावर लिखाणासाठी बसू तेव्हा त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील, असे मला वाटले. म्हणून मग त्यांचा आशीर्वाद आणि आठवण म्हणून मी तो सोफा फ्लॅटवर घेऊन आलो.
हा सोफा आजही माझ्या घरी ठेवलेला आहे. तो माझ्या मित्रपरिवारातही प्रसिद्ध आहे. आमच्याकडे येणारे अनेक जण, ‘हा सोफा कुठे तरी पाहिल्यासारखा वाटतोय,’ असे म्हणतात, तेव्हा मी त्यांना हा राज कपूर साहेबांचा सोफा असल्याचे सांगतो. राज कपूर साहेब बंगल्यात ज्यावर बसलेले असायचे, तो हाच सोफा आहे ना? असे त्यातील काही जण विचारतात. मग मी त्यांना, ‘हो, हा तोच सोफा आहे,’ असे सांगतो. राज कपूर प्रॉडक्शनच्या सिनेमात आपले नाव येते आणि त्यांचा सोफा आपल्या घरी आहे, या जाणिवेने मला आपण खूप भाग्यवान आहोत, असे वाटत राहते. राज कपूर साहेबांच्या स्मृतींमध्ये आज त्यांच्या ‘श्री ४२०’मधील हे गाणे ऐका…
प्यार हुआ इकरार हुआ है,
प्यार से फिर क्यों डरता है दिल…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.