माझ्या हिश्श्याचे किस्से: जी. पी. सिप्पींमुळे मुंबईत पहिल्यांदाच मिळाले होते फ्लॅटचे मालकी हक्क

0
20
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जी. पी. सिप्पींमुळे मुंबईत पहिल्यांदाच मिळाले होते फ्लॅटचे मालकी हक्क


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक21 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘शोले’च्या स्टारकास्टसोबत जी. पी. सिप्पी.

गेल्या महिन्यात मी ‘शोले’वर दोन कॉलम लिहिले. तेव्हा मला वाटले की, ‘शोले’विषयी बोलताना लोकांना तेव्हा त्यातील संपूर्ण स्टारकास्ट आठवते. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जयाजी, अमजद खान, सलीम-जावेद आणि अगदी विजू खोटे आणि मॅकमोहनही आठवतात. पण, ‘शोले’सारखा त्या काळातील सर्वांत मोठा आणि महागडा सिनेमा बनवण्याची हिंमत ज्यांनी दाखवली त्या व्यक्तीचा एक तर उल्लेख होत नाही किंवा झाला तर अपवादानेच तो होतो. ती व्यक्ती म्हणजे जी. पी. सिप्पी. जावेद साहेबांच्या मते, सिप्पी साहेबांचे विचार खूप नवे आणि मोठी असायचे. ते स्वत: येऊन प्रोत्साहन द्यायचे की, जावेद, मोठा विचार करा, भव्य सिनेमा बनवा, काही नवा विचार करा.. त्यामुळे आज माझ्या किश्श्यांमध्ये जी. पी. साहेबांबद्दल सांगणार आहे. योगायोग म्हणजे, गेल्या आठवड्यात म्हणजे १४ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवसही होता.

जी. पी. सिप्पी साहेबांचे खरे नाव गाेपालदास परमानंद सिपाहीमालानी होते. ते त्यांनी लहान बनवून जी. पी. सिप्पी केले होते. त्यांचा जन्म सिंध प्रांतातील हैदराबादमध्ये झाला, जे आता पाकिस्तानात आहे. नंतर तेथून त्यांचे कुटुंब कराचीला स्थलांतरित झाले. कराचीमध्ये त्यांचा खूप चांगला व्यवसाय होता. पण, १९४७ च्या फाळणीनंतर त्यांना घरदार, सर्व मालमत्ता सोडावी लागली. ते निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले आणि तेथून मुंबईला आले. त्यावेळी ते बॉम्बे नावाने ओळखले जायचे.

जावेद साहेबांनी मला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुंबईत काही प्रॉपर्टी घेऊन ठेवली होती, ती त्यांच्या कामी आली. त्या काळी मुंबईत फ्लॅट पगडी पद्धतीवर मिळत होते. पगडी पद्धत म्हणजे खरेदी करणाऱ्याची त्यावर पूर्ण मालकी नसायची. एक मोठी रक्कम दिल्यावरही त्याला दर महिन्याला भाडे द्यावे लागायचे. तो पूर्णपणे मालक कधीच बनू शकत नव्हता. जो खरा मालक असायचा, त्याचा त्यातही वाटा असायचा. म्हणजे ती प्रॉपर्टी त्याला विकायची असेल तेव्हाही अर्धे पैसे खऱ्या मालकाला द्यावे लागायचे.

जावेद साहेबांनी सांगितले की, सिप्पी साहेबांचे विचार एकदम नवे होते. त्यांना एक कल्पना सुचली की, आपण एक अशी इमारत बांधायची ज्यात फ्लॅट खरेदी करणाराच त्याचा मालक असेल. ही कल्पना मनात येताच त्यांनी एका जमिनीवर इमारत बांधायचे ठरवले. त्या काळातील एका मोठ्या वृत्तपत्राच्या ऑफिसात ते गेले. ‘मला तुमच्या वृत्तपत्रात एक जाहिरात द्यायची आहे,’ असे त्यांनी सांगितले. संपादकांनी विचारले, ‘काय जाहिरात आहे?’ सिप्पी साहेब म्हणाले, ‘जाहिरातीत लिहिलेले असेल – “Own your flat in Bombay” म्हणजे मुुंबईत आपल्या फ्लॅटचे स्वत:च मालक व्हा! संपादक म्हणाले की, आमचे वृत्तपत्र नामांकित आहे, आम्ही खोटी जाहिरात प्रसिद्ध करू शकत नाही. कोणी फ्लॅटचा मालक कसा असू शकतो?

मग सिप्पी साहेबांनी त्या वृत्तपत्राविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयानेही त्यांना विचारले की, या इमारतीत अनेक फ्लॅट असतील तर सगळेच कसे फ्लॅटचे मालक असू शकतात? त्यावर सिप्पी साहेबांनी युक्तिवाद केला की, एखाद्या कंपनीत अनेक शेअर होल्डर असू शकतात, तर जमिनीचे शेअर्स का नाही घेता येणार? हे ऐकून न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत वृत्तपत्राला जाहिरात छापण्याचे आदेश दिले. ती जाहिरात छापली गेली आणि या पद्धतीने प्रत्येक फ्लॅटचा खरेदीदार त्याचा मालक बनला. अशा प्रकारची मुंबईतील ही पहिली बिल्डिंग उभी राहिली. तिचे नाव होते ‘गोपाल मॅन्शन’. राहुल रवैलजींनी मला सांगितले की, वांद्रे स्टेशन रोडवर त्यांचे घर असलेल्या गल्लीच्या सुरूवातीची इमारत म्हणजे गोपाल मॅन्शन. सिप्पी साहेबांच्या आधुनिक, उदात्त विचारांची ही फलश्रुती आहे. यावरुन मला अख्तर नज्मी यांचा एक शेर आठवतोय…

छेड़-छाड़ करता रहा

मुझ से बहुत नसीब,

मैं जीता तरकीब से

हारा वही ग़रीब।

बहुतांश लोक त्यांना ‘शोले’साठी लक्षात ठेवतात. पण, त्यांनी त्याशिवायही अनेक संस्मरणीय सिनेमे बनवले. पाच सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि तीन सिनेमांत अभिनयही केला. त्यांनी १९५१ मध्ये ‘सजा’ हा पहिला सिनेमा बनवला, जो सलीम मिस्त्रींनी देवानंद यांच्यावर दिग्दर्शित केला होता. त्यानंतर ‘मेरे सनम’, ‘ब्रह्मचारी’, ‘अंदाज़’, ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘शान’, ‘सागर’, ‘भ्रष्टाचार’, ‘पत्थर के फूल’, ‘राजू बन गया जंटलमॅन’, ‘ज़माना’, ‘दीवाना’ आणि शेवटचा सिनेमा होता ‘हमेशा’. सिप्पी साहेब नेहमी पात्र लोकांनाच घेत. ६०-७० च्या दशकात त्यांनी आपली रायटिंग टीम बनवली होती, त्यात नरेंद्र बेदी, राजेंद्रसिंग बेदी, गुलज़ार साहेब, सचिन भौमिक, जावेद अख्तर हे होते. ‘मेरे सनम’साठी त्यांनी राजेंद्रसिंह आणि नरेंद्र बेदी या दोघांनाही लेखक म्हणून घेतले. आज सिप्पी साहेबांच्या आठवणीत त्यांचा सुपरहिट सिनेमा ‘अंदाज’चे हे गाणे ऐकू…

ज़िन्दगी एक सफर है सुहाना..

यहाँ कल क्या हो किसने जाना…

स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.



Source link