माझ्या हिश्श्याचे किस्से: नाव कमावण्याचा नव्हता उद्देश, केवळ चार गाणी लिहून हा दोस्त निघून गेला

0
22
माझ्या हिश्श्याचे किस्से:  नाव कमावण्याचा नव्हता उद्देश, केवळ चार गाणी लिहून हा दोस्त निघून गेला


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अरुण (मध्यभागी) यांच्यासह साजिद नाडियादवाला आणि या सदराचे लेखक रूमी जाफ़री. हे अगदी काही दिवसांपूर्वी घेतलेले छायाचित्र आहे.

जेव्हा मी कॉलम लिहायला बसतो, एखाद्या मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीबद्दल लिहू लागतो, तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो की, असे काही लोक असतात जे फारसे प्रसिद्ध नसतात, जगाच्या दृष्टीने मोठे नाव कमावत नाहीत, अशांच्या बाबतीत लिहायचे नाही का? आजही असाच विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी आज एका अशा व्यक्तीबाबत लिहिणार आहे, जो ११ ऑगस्टला आम्हा साऱ्यांना सोडून या जगातून गेला.

तो माझा आणि साजिद नाडियादवालाचा खूप जवळचा मित्र होता. त्याचे नाव अरुण खेडवाल. लोक त्याला अरुण भैरव नावानेही ओळखायचे. अरुण मूळचा राजस्थानातील फतेहपूर शेखावटीचा होता. साजिद ‘गुलामी’च्या शूटिंगसाठी तिथे गेला, तेव्हा त्याची अरुणशी मैत्री झाली आणि तो साजिदसोबत मुंबईला आला. तेव्हापासून आजतागायत साजिद आणि अरुण अगदी सख्ख्या भावासारखे राहत होते. १९८७ मध्ये मी साजिदला भेटलो, तेव्हापासून साजिद, अरुण आणि मी अशी आम्हा तिघांची मैत्री झाली. कितीतरी वर्षे आम्ही २४ तास एकत्र असायचो.

अरुण एक अफलातून माणूस होता. असे लोक फक्त कहाण्यांमध्येच भेटतात. आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी आम्ही खूप मेहनत करत होतो. जेव्हा आम्ही म्हणायचो, ‘अरुण काहीतरी कर..’ तेव्हा तो म्हणायचा, ‘तुम्हा दोघांना खूप काही करायचा शौक आहे, तर मग करा कष्ट. मला काहीच बनायचं नाहीय, तर मी का करू?’ अलीकडेच मी, साजिद आणि अरुण तिघे बोलत बसलो होतो, तेव्हा अरूण खूपच भावूक झाला. म्हणाला, ‘यार, मी देवाचे खूप आभार मानतो की आपण तिघंही यशस्वी झालोत..’ मी विचारलं, ‘तिघेही यशस्वी झालो? कसे?’ तर तो म्हणाला, ‘बघ.. साजिदला मोठा निर्माता व्हायचं होतं, तो मोठा निर्माता झाला. तुला मोठा लेखक व्हायचं होतं, तू मोठा लेखक झालास. मला काहीच बनायचं नव्हतं, त्यामुळं मी काहीच झालो नाही. म्हणजे मीही यशस्वी झालो..’ असा होता आमचा अरूण.

त्याचा म्युझिक सेन्स खूप कमालीचा होता. त्याच्याकडून पहिले गाणे सलमान खानने लिहून घेतले. सिनेमाचं नाव होतं ‘बंधन’ आणि ते गाणं होतं.. “तेरे नैना मेरे नैनों की क्यों भाषा बोले।’ नंतर दुसरं गाणं लिहून घेतलं ‘मिस्टर और मिसेस खन्ना’मधील, ज्याचे बोल होते.. “प्यार का वादा हम तोड़ दे, तुमने ये सोचा कैसे।’ मग तिसरं गाणं ‘वॉन्टेड’साठी लिहून घेतलं. त्याचे बोल होते.. ‘दिल लेकर दर्द ऐ दिल दे गए, तुम जान जान कहके मेरी जान ले गए।’ चौथं गाणं साजिदने ‘मुझसे शादी करोगी’साठी त्याच्याकडून लिहून घेतलं… “लाल दुपट्टा उड़ गया रे मेरा हवा के झोंके से, मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से।’

त्याची ही चारही गाणी हिट झाली. संगीत दिग्दर्शक, सलमान आणि आम्ही सगळे त्याला गाणी लिही, असं सांगायचो, तेव्हा तो गमतीने म्हणायचा की, तुम्ही लोकांनी माझ्याकडून ही चार गाणी लिहून घेतली. अजून किती काम करून घ्याल? एका आयुष्यात मी यापेक्षा जास्त काम करू शकत नाही.’ खरं तर अशी पात्रं गोष्टींमध्ये, पुस्तकातच आढळतात, ज्यांचं एकमेव उद्दिष्ट प्रेम मिळवणं आणि प्रेम देणं एवढंच असतं, प्रसिद्धी मिळवणं नाही. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला आणि तो अंथरुणाला खिळला तेव्हा साजिदने त्याची खूप सेवा केली. ज्या ज्या डॉक्टरांकडे वा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार होऊ शकतात, त्या सर्व ठिकणी प्रयत्न केले. त्याची मुले त्याला ‘ताऊ’ म्हणायची. साजिदची आईही त्याला आपला मुलगा मानत होती. तो अगदी कुटुंबाचाच एक सदस्य होता. त्याच्यावर सगळे किती प्रेम करायचे, हे मला त्याच्यावरील अंत्याविधीच्या वेळी जाणवले. साजिदचे सगळे कुटुंब, त्याचे मामा, मुले, पत्नी, बहीण, सासू-सासरे सगळे खूप रडत होते. मी मनातल्या मनात म्हणत होतो…

अरूण, तू आम्हाला सोडून गेलास. तुला माहीत नाही, तू आमच्यासाठी किती खास होतास. या वरुन मला एक खालिद शरीफ यांचा एक शेर आठवतोय…

बिछड़ा कुछ इस अदा से

कि रुत ही बदल गई

इक शख़्स सारे शहर को

वीरान कर गया।

लिहिता लिहिता आणखी एक व्यक्ती आठवली. त्यांचे नाव लच्छू मामा. अनु कपूर यांच्या वडिलांच्या थिएटर कंपनीमध्ये ते तरुणपणापासून काम करत होते. ते मूळचे भोपाळचे होते आणि त्यांनी आपलं सारं आयुष्य कपूर परिवाराच्या सेवेसाठी समर्पित केले होते. गेल्या २०-२२ वर्षांपासून ते गुड्डो बाजींसोबत म्हणजे अनु कपूर, रणजीत कपूर यांची बहीण आणि माझी मानलेली बहीण सीमा कपूर हिच्यासोबत राहात होते. गेल्या काही वर्षांपासून ते खूप आजारी होते. गुड्डो बाजीने त्यांची खूप काळजी घेतली. जानेवारीत राजस्थानच्या झालावाडमध्ये ती शूटिंग करत असताना लच्छू मामा पुन्हा आजारी पडले. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांना वयोमानामुळं आजारपण आलंय, त्यांनी नव्वदी ओलांडलीय, त्यामुळं हा त्रास होतोय. लच्छू मामा म्हणाले, माझं गुड्डोसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं करून द्या.. सीमा झालावाडमध्ये शूटिंग करत होती. त्यामुळं लच्छू मामांनी तिच्याशी रात्री व्हिडिओ कॉलवर बोलणं केलं. सीमा त्यांना पाहून भावूक झाली, मामांना होणारा त्रास तिला पाहवत नव्हता. तिने विचारलं, ‘कसे आहात मामा?’ ते म्हणाले, ‘मला तुझी काळजी वाटतेय..’ त्यावर सीमा म्हणाली, ‘मी ठीक आहे मामा. मी तुमची काळजी घेईन. आता तुम्ही त्रास करून घेऊ नका, माझी काळजी करू नका, जा तुम्ही..’ मामा उत्तरले, ‘ठीक आहे गुड्डो बाळा.. तू म्हणतेस तर जातो मी..’ फोन कट झाला आणि सकाळी पाहिलं तर मामांनी या जगाचा निरोप घेतला होता.

हे लिहित असताना माझे हात थरथरताहेत, डोळे भरुन आलेत. अशी माणसं आता जन्माला येत नाहीत. माझा आणखी एक मित्र होता, अरुण वर्मा. त्याच्याबद्दलही मी पुढे लिहीन. दोन वर्षांपूर्वी तो आम्हाला सोडून गेला. एका सिनेमात मी डायलॉग लिहिला होता- कभी आपकी ज़िंदगी में कोई आता है, तो आपको ये नहीं पता लगता कि आपने क्या पाया.. लेकिन जब वो चला जाता है, तो आपको जरूर पता लगता है कि आपने क्या खोया। आज या तिघांच्या आठवणीत ‘जाने चले जाते है कहां’चे हे गाणं ऐका..

दुनिया से जाने वाले,

जाने चले जाते हैं कहां…

स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link