
- Marathi News
- Opinion
- Rumi Jaffrey Article On Sunil Dutt Nargis Gave The Advertisement For The Name Sanjay Dutt
रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस यांच्यासह संजय दत्त. हा फोटो काही वर्षांपूर्वी संजय दत्तनेच गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तिने तो वाचला. एकाएकी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र भाव उमटले आणि तिने ‘ओह शिट!’ असे उद्गार काढले. आम्ही सगळ्यांनी एकदमच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्या व्यक्तीने संजूकडे बघितलं आणि म्हणाला, “बॉस, फाइव्ह ईयर, पांच साल..’ मी त्या स्थितीचे, त्यावेळच्या भावनेचे वर्णन करू शकत नाही.
आज मी माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये संजय दत्तबद्दल सांगणार आहे. काल संजूचा वाढदिवस होता. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आमचे नाते जवळपास ३४ वर्षे जुने आहे आणि तो फक्त माझा मित्रच नाही, तर अगदी भावासारखा आहे. तो नेहमी सर्वांसाठी उभा राहतो. संपूर्ण इंडस्ट्रीला माहीत आहे की, कुणाची कसलीही अडचण असो; संजू आणि सलमान हे दोघेच असे आहेत, जे प्रत्येकाच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. संजूने बहुतांश चित्रपट मित्रांसाठी, गरजूंसाठी केले. पैसे मिळाले की नाही मिळाले, अर्धे मिळाले वा पूर्ण मिळाले, तरी त्याने कधीही कोणा निर्मात्याला त्रास दिला नाही.
मला आठवतंय, ही बहुधा २० मार्च २०१३ ची ही गोष्ट असावी. उद्या सकाळी सुप्रीम कोर्ट संजय दत्तचा निकाल जाहीर करणार, अशी त्या दिवशी ब्रेकिंग न्यूज सुरू होती. रात्री मला संजूचा फोन आला आणि म्हणाला की, हुजूर उद्या सकाळी १० ला घरी या, निकाल लागणार आहे. मी आणि संजू एकमेकांना ‘हुजूर” म्हणतो. संजय दत्तच्या आवाजात मला ती अस्वस्थता, तो त्रास स्पष्टपणे जाणवत होता. त्याने ती रात्र कशी घालवली असेल, हे मी समजू शकतो. कारण त्या रात्री मीसुद्धा खूप अस्वस्थ होतो. सकाळी दहा-सव्वादहाच्या सुमारास मी संजय दत्तच्या घरी पोहोचलो. सगळ्या गल्लीत गर्दी होती. मीडियाचे लोक उभे होते. पण घरात मात्र अगदी शांतता पसरली होती. संजूने सर्वांना तिथं येण्यास मज्जाव केला होता. घरात एक गोल डायनिंग टेबल होता, तिथे एका खुर्चीवर संजू बसला. मान्यता उजवीकडे आणि मी डावीकडे बसलो. मी संजूचा हात हातात घेऊन बसलो होतो. आमचा आणखी एक मित्र बिट्टूही तिथं बसला होता आणि आणखी एक व्यक्ती बसली होती, तिचे नाव मला माहीत नाही. या व्यक्तीला कोर्टातून सतत मेसेज येत होते. सर्वांचे मोबाइल आणि टीव्हीही बंद होता. वातावरणात एक विचित्र शांतता दाटली होती. जिला वादळापूर्वीची शांतता म्हणतात, अगदी तशीच. जसा त्या व्यक्तीला मेसेज यायचा तसे सगळे चमकून त्यांना विचारायचे, ‘काय झाले?’ ती व्यक्ती म्हणायची, ‘नथिंग..’ साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तिने तो वाचला. एकाएकी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र भाव उमटले आणि तिने ‘ओह शिट!’ असे उद्गार काढले. आम्ही सगळ्यांनी एकदमच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्या व्यक्तीने संजूकडे बघितलं आणि म्हणाला, “बॉस, फाइव्ह ईयर, पांच साल..’ मी त्या स्थितीचे, त्यावेळच्या भावनेचे वर्णन करू शकत नाही. मान्यताच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. माझेही डोळे आेले झाले. आमच्यात बहादूर तर संजू होता. त्याने मला आणि मान्यताला मिठी मारली, जसे काय तोच आम्हाला धीर देतोय. कुणी काहीच बोलत नव्हते. फक्त शांतताच बोलत होती. तेवढ्यात शारान आणि इकरा ही दोन्ही मुलं आली नि संजूचे पाय धरू लागली, इकडे तिकडे धावू लागली. आपल्या घरात नेमकं काय झालंय, त्यांच्या वडिलांसोबत काय झालंय, हे या मुलांना माहीतही नाही, या विचारानेच माझे हृदय विदीर्ण होत होते.
एवढ्यात तिथं सलमान आणि संजूचा खास मित्र असलेला नदीम डबडबलेल्या डोळ्यांनी आला. मग हळूहळू इतर लोकही यायला लागले आणि संजूला धीर देऊ लागले की, काळजी करू नकोस, आपण अजूनही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो.. संजूने त्याच्या वकिलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन लागत नव्हता. संजू मला म्हणाला, ‘हुजूर, कपिल सिब्बल यांना फोन लाव..’ मी कपिल सिब्बलजींना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. दहा मिनिटांत त्यांचा कॉल आला आणि ते म्हणाले, ‘हं, रूमी बोल..’ मी म्हणालो की, आपण अजूनही आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो, असं काही जण म्हणताहेत..’ सिब्बल साहेब म्हणाले, ‘जो कुणी असं म्हणतो आहे, तो केवळ खोटा दिलासा देतो आहे..’ मला वाटले, संजूने पाच वर्षांची शिक्षा झाल्याची बातमी ऐकली आणि सहनही केली. पण, रिव्ह्यू पिटिशनही दाखल करता येणार नाही, हे एेकून तो कोलमडेल. म्हणून मी सिब्बलजींना म्हणालो की, हे संजूला जाऊन सांगण्याची माझी हिंमत नाही, कृपया तुम्हीच बोला.. मी फोन घेऊन संजूकडे गेलो आणि म्हणालो, ‘हे कपिल सिब्बल साहेब आहेत, त्यांच्याशी बोल..’ तेव्हा सिब्बल साहेबांनीच संजूला, ‘तुला तुरुंगात जावे लागेल,’ असे सांगितले.
असो. लोक येत-जात राहिले, रिव्ह्यू पिटिशनही फेटाळली गेली आणि संजूला तुरूंगात जावं लागलं. नंतर शिक्षा भोगून तो बाहेर आला, हे आपल्याला माहीत आहेच. आयुष्यात इतके काही घडून गेले तरी तो हसत राहिला. तो अभिनयही करायचा, विनोदही करायचा, व्यायामही करायचा. त्याच्या या गोष्टींमुळेच मी त्याचा फॅन झालो. कोणत्याही माणसाच्या बाबतीत असं घडलं असतं, तर तो हसणं, काम करणं, शरीरयष्टी बनवणं विसरला असता. पण, प्रत्येक संकटाशी दोन हात करुन पुन्हा कसं उभं राहिलं पाहिजे, याची प्रेरणा संजय दत्तकडून मिळते.
संजय दत्तच्या वाढदिवसापासून आपली चर्चा सुरू झाली होती, म्हणून मी तुम्हाला त्याच्या वाढदिवसाचा एक रंजक किस्सा सांगतो. २९ जुलै १९५९ ला संजय दत्तचा जन्म झाला, तेव्हा सुनील दत्त आणि नर्गिसजी यांनी त्या काळातील सर्वांत प्रसिद्ध चित्रपट मासिक “शमा” आणि ‘सुषमा’मध्ये एक जाहिरात दिली होती की, आम्हाला आमच्या मुलाचे नाव आमचे चाहते आणि हितचिंतकांना विचारून ठेवायचे आहे. या प्रकारे सर्वांकडून नावे मागवण्यात आली आणि देशभरातून सुमारे १५ हजारांहून अधिक नावे आली. ‘शमा’ आणि ‘सुषमा’ यांच्या टीमने त्यातून खास नावे निवडली आणि ते दत्त साहेब – नर्गिसजींकडे आले. त्यांनी ती नावे वाचून दाखवली. त्या नावांमध्ये; अनिल, संजय, रोहित कुमार अशी अनेक नावे होती. पण, त्यातून सुनील साहेब आणि नर्गिसजींना आवडलेले नाव होते – संजय. हे नाव ‘पुष्पा अग्रवाल, द्वारा राजनारायण वकील, गोलसराय कोठी, जलेनगंज, आग्रा’ या पत्त्यावरून आले होते. मग हेच नाव निवडले गेले. नंतर नर्गिसजींनी संजूच्या फोटोसह स्वत: लिहिलेले पत्र पुष्पा अग्रवाल यांना पाठवले. तर संजय हे नाव पुष्पा अग्रवाल यांनी ठेवले आहे आणि मला वाटते, एखाद्या स्टारने आपल्या मुलाचे नाव आपल्या चाहत्यांना विचारून ठेवल्याची ही पहिलीच घटना असावी. ही सारी नावे घेऊन आले होते, त्यांचे नाव युसूफ देहलवी. ते या मासिकांचे संपादक होते. नामकरणाचा हा सारा किस्सा १९६० मध्ये ‘शमा’ आणि ‘सुषमा’च्या अंकांत प्रकाशितही झाला होता. संजूच्या या किश्श्यानंतर मला वडील कौसर सिद्दिकी यांनी लिहिलेला एक शेर आठवतो… महफ़िल में जलाते हैं दीया दूसरे लोग, लेते हैं उजाले का मज़ा दूसरे लोग। मुजरिम कभी पकड़े नहीं जाते लेकिन, पाते हैं अदालत से सज़ा दूसरे लोग। यासोबतच संजूच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटातील हे गाणे ऐका… क्या यही प्यार हैं.. हां, यही प्यार हैं… स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.





