माझ्या हिश्श्याचे किस्से: साहिर लुधियानवी : कल कोई मुझको याद करे,  क्यों कोई मुझको याद करे…

0
22
माझ्या हिश्श्याचे किस्से:  साहिर लुधियानवी : कल कोई मुझको याद करे,  क्यों कोई मुझको याद करे…


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी साहिर लुधियानवी यांच्याविषयी सांगणार आहे. साहिर साहेबांबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. त्यांच्या गझला, त्यांची गाणी, त्यांची चित्रपटगीतं, अगदी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही. पण, आज मी जे किस्से सांगणार आहे त्यापैकी एक त्यांच्या आयुष्यातील आहे आणि दुसरा ते गेल्यानंतरचा आहे.

मी मुंबईत येण्याच्या कितीतरी वर्षे आधी साहिर साहेब हे जग सोडून गेले होते. मी त्यांच्या बहिणीला भेटलो आहे. साबिर दत्त हे त्यांचे अगदी जवळचे सहकारी होते. त्यांनाही मी भेटायचाे. त्यांच्यांकडून साहिर साहेबांचे अनेक किस्से मी ऐकले. हा त्यापैकीच एक…

साहिर साहेब सिनेमाच्या संगीत दिग्दर्शकापेक्षा जास्त पैसे घ्यायचे. त्यामुळे ज्या संगीत दिग्दर्शकांचे मानधन कमी असायचे, त्यांच्यासोबतच त्यांनी अधिक चित्रपट केले. एकदा नौशाद साहेबांनी त्यांना फोन करून सांगितले की, माझा एक मित्र सिनेमा बनवतोय आणि तुम्ही त्यासाठी गाणी लिहावीत, असं मला वाटतं. साहिर साहेबांनी त्या निर्मात्याला भेटायला बोलावलं. नौशाद साहेब त्या काळातील सर्वात जास्त मानधन घेणारे संगीत दिग्दर्शक होते. साहिर साहेबांनी त्या निर्मात्याला, ‘मी तुमच्यासाठी गाणी लिहीन,’ असं सांगितलं. त्यावर निर्मात्याने विचारलं, ‘तुम्ही मानधन किती घेणार‌?’ साहिर साहेब उत्तरले, ‘हे बघा, नौशाद साहेब तुमचे मित्र असल्यामुळं ते तुमच्याकडून कमी पैसे घेतील. पण, मी मात्र नौशाद साहेब दुसऱ्या निर्मात्यांकडून जेवढे मानधन घेतात तेवढेच तुमच्याकडून घेईन!’

म्हणूनच साहिर साहेबांएवढी संपत्ती इतर कोणत्याही शायर वा गीतकाराकडे नव्हती. साहिर साहेबांचा वर्सोव्यात बंगला होता आणि जुहूला हॉलिडे इनच्या समोर ‘पराछाइयाँ’ नावाची एक इमारत होती. त्यांनी आपल्या एका पुस्तकाच्या नावावरुन हे नाव ठेवलं होतं. त्या इमारतीच्या जागीही पूर्वी एक बंगला होता. तेव्हा एकदा साहिर साहेब निर्माता करीमभाई नाडियादवालांना म्हणाले, ‘माझं घर समुद्रकिनारी आहे खरं, पण माझ्या घरातून समुद्रच दिसत नाही.’ त्यानंतर करीमभाईंनी ताे बंगला पाडून तिथं एक इमारत बांधली. त्यात साहिर साहेबांना पाच फ्लॅट आणि एक टेरेस फ्लॅटही दिला. तिथून समुद्र दिसू शकत होता.

साहिर साहेबांना ते म्हणाले, ‘आता तुम्ही इथं आरामात बसून गाणी लिहा.’ काळ पुढे सरकत गेला. मी नेहमी त्या ‘परछाइयाँ’समोर उभा राहायचो. तिच्याकडं पाहायचो आणि विचार करायचो की, मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव ‘साहिर’ ठेवेन. ईश्वराच्या कृपेने २००१ मध्ये मला मुलगा झाला, मी त्याचं नाव ‘साहिर’ ठेवलं.

असो. मी लोखंडवालामध्ये राहत होतो तेव्हा माझी मुलगी शाळेत जायला लागली होती. लोखंडवालाच्या बाजूला नेहमी खूप रहदारी असते. त्यामुळं मी वर्सोव्याला शिफ्ट होण्याचा विचार केला आणि तिथं घर शोधू लागलो. एक दिवस माझे मित्र दीपक आनंद यांच्या पत्नी कमलाजींचा फोन आला. त्यांनी मला जुहूला शिफ्ट होण्याचा सल्ला दिला. माझं बजेट जुहूच्या इतकं नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला वर्सोव्यापेक्षाही स्वस्त फ्लॅट जुहूमध्ये मिळवून दिला तर?’ मी विचारलं, ‘पण, स्वस्त कसा काय मिळतोय?’ त्यांनी सांगितलं की, एखाद्या फ्लॅटचा कोणीही वारस नसेल तर सोसायटीला तो विकण्याचा अधिकार मिळतो.

एकेदिवशी मी पत्नीला घेऊन जुहूला कमलाजींकडे गेलो. त्यांनी आम्हाला त्या इमारतीकडे नेले. तिथे मला जुन्या काळातील नायिका रिहाना सुलताना भेटल्या. आम्ही येण्याचं कारण कळल्यावर त्या म्हणाल्या, ‘घर बघून तर घ्या.’ मी इमारत पाहिली आणि अवाक होऊन म्हणालो, ‘ही तर परछाइयाँ आहे!’ माझं हृदय धडधडू लागलं. मी विचारलं, ‘या फ्लॅटचा मालक कोण आहे?’ कमलाजी म्हणाल्या, ‘साहिर लुधियानवी.’ विश्वास ठेवा, माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी आभाळाकडं पाहिलं. मनात विचार आला की, मी माझ्या मुलाचं नाव साहिर ठेवलं म्हणून कदाचित साहिर साहेब हे असं काहीतरी घडवंत असावेत.. मी त्यांच्या घरात राहावं म्हणून.. मी खूप भावुक झालो होतो. पत्नीसोबत दुसऱ्या मजल्यावर गेलो. दरवाजावर एक तुटलेली लाकडी पाटी लटकत होती, त्यावर लिहिलं होतं.. साहिर लुधियानवी.

वॉचमनने कुलूप काढलं. मी आणि पत्नी आत गेलो. ड्रॉइंग रूम, बेडरूम असं एकदम तयार घर होतं. पण, घरात जवळपास पाचशे मेलेली कबुतरं होती. वाळवी, जाळ्या-जळमटं अन् इतकी धूळ होती की, आधीच अस्थम्याचा त्रास असलेली माझी पत्नी खोकत खोकतच बाहेर धावली. मी जळमटं सारंत आत गेलो. साहिर साहेबांची लायब्ररी पाहिली. तिथं खूप सारी पुस्तकं अन् दुर्मिळ फोटो होते. साहिर साहेबांचे पं. नेहरू तसंच जोश मलिहाबादींसह मोठमोठ्या शायरांसोबतचे फोटो होते. बऱ्याचशा फोटोंना वाळवी लागली होती. मी हे सगळं पाहत होतो नि नकळत माझ्या डोळ्यांत पाणी आलं. क्षणभर वाटलं.. साहिर साहेब पाठीमागून मला ऐकवताहेत… कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे। मसरूफ़ ज़माना मेरे लिए, क्यों वक़्त अपना बर्बाद करे। मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…

मी बाहेर आलो अन् सोसायटीवाल्यांवर खूप रागावलो. त्यांना म्हणालो, ‘कमीत कमी महिन्यातून दोनदा तरी वॉचमनला सांगून या फ्लॅटची साफसफाई केली असती, खिडक्या स्वच्छ केल्या असत्या, पेस्ट कंट्रोल केलं असतं, तर साहिर साहेबांच्या या आठवणी नीट तरी राहिल्या असत्या..’ मी एक-दोन मीडियावाल्यांनाही याविषयी सांगितलं. नंतर अली पीटर जॉनसोबत मी यश चोप्रांच्या घरी गेलो. यशजींना अनुभवलेला सगळा प्रकार सांगितला. ते म्हणाले, ‘सोसायटीमध्ये मतदानाने निर्णय होतो आणि तिथले सगळे सदस्य माझे मित्र आहेत. इब्राहिम नाडियादवाला, फारूख नाडियादवाला, हबीब नाडियादवाला या सगळ्यांचे दोन-दोन फ्लॅट आहेत.” एक फ्लॅट राज कपूर यांची बहीण उम्मी आंटी यांचाही होता. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्यामुळे त्यांचे मतही माझ्याच बाजूने आले असते.यशजी म्हणाले, ‘माझे मोठे भाऊ धरम चाेपडा तेथे राहत होते. त्यांच्या पत्नीला मी सांगेन, त्यादेखील तुझ्या बाजूने मत देतील.’ मीडियावाल्यांना मीच सांगितलं होतं. त्यामुळं ते तेथे पाेहोचलेे. त्यांनी बातमी दाखवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सोसायटीच्या चेअरमनने मला बोलावलं. म्हणाले, ‘आता येऊन बघा, तुमची कसलीही तक्रार राहणार नाही.’ मी गेलो आणि पाहिलं तर त्यांनी सगळं सामान भंगारवाल्याला साडेचार हजार रुपयांत विकलं होतं. फ्लॅट पूर्ण रिकामा केला होता. या लोकांनी साहिर साहेबांच्या सगळ्या वस्तू भंगारात विकल्या म्हणून मी डोक्यावर हात मारून घेतला. सोसायटीवाले माझ्यावर नाराज झाले होते. त्यामुळं त्यांनी तो फ्लॅट मला दिला नाही. मी खूप प्रयत्न केला, पण तो मला मिळाला नाही. मी म्हणालो, ‘आठवण म्हणून साहिर साहेबांची एखादी वस्तू तरी द्या.’ पण, त्यांंनी तीही दिली नाही. यावरून साहिर साहेबांचा एक शेर आठवतोय…

दुनिया ने तजरबात-ओ-

हवादिस की शक्ल में,

जो कुछ मुझे दिया है

वो लौटा रहा हूँ मैं।

मला चांगलं आठवतंय, वर्साेव्यातील सात बंगल्यांमध्ये एक बंगला साहिर साहेबांचा होता. तो खूप प्रशस्त होता. अगदी बीचपर्यंत पसरलेला होता. प्लॉटही बराच मोठा होता, तिथं शूटिंगही व्हायचं. त्यांची बहीण तिथलं भाडं घ्यायची आणि साबीर दत्त ते घ्यायला यायचे. साहिर साहेबांनी बंगल्यात प्रत्येक जागी, खिडक्यांत, दरवाजांमध्ये वाट्या बसवल्या होत्या आणि त्यात ते पक्ष्यांसाठी दाणे टाकायचे. एकदा शूटिंगच्या वेळी कृष्ण चंदर यांच्या पत्नी सलमा सिद्दीकींनी मला त्या दाखवल्या होत्या. त्या साहिर साहेबांच्या आठवणी होत्या. आता तिथून जाताना पाहतो, तर बंगला पाडण्यात आला आहे आणि नव्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय. असो. साहिर साहेबांच्या आठवणीत त्यांचेच हे गाणे ऐका…

ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया,

ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया,

ये दौलत के भूखे रिवाज़ों की दुनिया,

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link