फडणवीस प्रामाणिक, विश्वासार्ह राजकारणी ! शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्तुतिसुमने

0
5
फडणवीस प्रामाणिक, विश्वासार्ह राजकारणी ! शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्तुतिसुमने


मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय प्रामाणिक व हुशार राजकारणी आहेत. भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात आलेल्या आव्हानांवर आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने मात करून त्यांनी आपली विश्वासार्हता वाढविली आहे, अशी स्तुतिसुमने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उधळली आहेत. फडणवीस यांच्या कार्याचा झपाटा आणि कामाचा उरक मोठा आहे. ते थकत कसे नाहीत, असा प्रश्न मला पडतो, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांचा गौरव केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द पाळला नाही, असा गेली काही वर्षे सातत्याने आरोप करणाऱ्या आणि शहा-फडणवीस यांच्यावर कायम टीकास्त्र सोडणाऱ्या ठाकरे यांनी त्याचबरोबर पवार यांनीही फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. भाजपवर शब्द मोडण्याचा आरोप असूनही फडणवीस हे प्रामाणिक व विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तीपत्र ठाकरे यांनी दिले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्ताने ‘महाराष्ट्राचा नायक’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. या कॉफी टेबल बुकमध्ये ठाकरे, पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांनी फडणवीस यांचा गुणगौरव केला आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. त्यांचा हा वारसा देवेंद्र फडणवीस हे अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही जवळून पाहिला आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांच्या कामाचा झपाटा व उरक पाहिल्यावर मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हाचा काळ आठवतो. फडणवीस यांच्या कार्याची गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत कायम राहो व वृद्धिंगत होवो, अशा शुभेच्छा पवार यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा

कार्यक्षमतेत स्थूलपणा आडवा आला नाही

क्रियाशील राहण्यासाठी प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. यातील विनोदाचा भाग सोडला, तरी त्यांचे कष्ट पाहून ‘ते थकत कसे नाहीत?’ असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे, असे शरद पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पट्टीचे हजरजबाबी

फडणवीस हे पट्टीचे हजरजबाबी व संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले आहेत.





Source link