पुस्तकामागच्या गोष्टी: तेच ते ठरावीक (पुरस्कारप्राप्त) ठोकळे

0
16
पुस्तकामागच्या गोष्टी: तेच ते ठरावीक (पुरस्कारप्राप्त) ठोकळे


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Special Supplement Things Behind The Book That Is The Specific Block Rwite By AADUBAL

आदूबाळ6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अरविंद अडिगा

‘महत्त्वाचा’ लेखक आपल्याला आवडलाच पाहिजे अशी काहीच सक्ती नसते. किंबहुना अनेक ‘महत्त्वाचे’ मानले गेलेल्या पुरस्कारप्राप्त लेखकांचं लेखन महाभयंकर कंटाळा आणू शकतं. सुरुवातीला ते आपलं वाचक म्हणून अपयश वाटतं – सगळ्या जगाला भावलेला हा लेखक आपल्या पचनी का पडत नसेल? म्हणून आपण त्या लेखकाचं पुढचं पुस्तक (आणि आणखी पुढची पुस्तकं) वाचायला घेतो. तिथेही नावड निदर्शनास येते आणि मग मात्र आपण जास्त खोलात शिरून विचार करायला लागतो. आणि नावडीमागची कारणं उलगडत जातात. त्या कारणमीमांसेच्या दरम्यान इतर लोकांना हा लेखक का आवडत असेल, याची कल्पनाही येत जाते. आपलं मत बदलत नाही, पण दुसऱ्याच्या मताला आदर दिला जातो. माझ्याबाबत हे अनेकदा घडलं आहे. पण, अरविंद अडिगा या बुकर विजेत्या लेखकाबद्दल जितक्या तीव्र भावना आहेत, तितक्या क्वचितच कोणाबद्दल असतील.

अरविंद अडिगांचा जन्म भारतातला, शिक्षण भारत आणि ऑस्ट्रेलियामधलं आणि सुरुवातीची नोकरी भारतात –जाहिरात क्षेत्रात. भारतातील जाहिरात क्षेत्राने आजवर अनेक लेखक – कवी – नाटककारांना आश्रय दिला आहे. जाहिरात करणे म्हणजे वेगळ्या माध्यमातून सांगितलेली कथाच असते, त्यामुळे हे कदाचित त्यांचं सोयीचं क्षेत्र असेल. अडिगांनी इंग्रजीत कथा लिहायला सुरुवात केली. अनेक लेखकांप्रमाणे त्यांच्या पहिल्या कथा त्यांच्या लहानपणाच्या अनुभवविश्वाशी जुळलेल्या होत्या. दक्षिण भारतातील एका काल्पनिक, लहानशा शहरात घडणाऱ्या या कथांचा संग्रह नंतर ‘बिटविन द अॅसॅसिनेशन्स’ या नावाने प्रसिद्ध झाला. इंदिरा गांधी यांची हत्या ते राजीव गांधी यांची हत्या या कालखंडात घडलेल्या या कथा आहेत, म्हणून हे नाव. कथा स्वतंत्र असल्या, तरी त्या एकाच परिसरात एकाच काळात घडतात. त्या अर्थाने त्यांच्यात एक सलगतेचा धागा आहे.

हे वर्णन वाचून आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी’ कथांची आठवण होणं स्वाभाविक आहे. साम्यस्थळं आहेत : दक्षिण भारत, गाव / लहान शहर आणि तिथली स्थानिक पात्रं. किंबहुना मालगुडीकथांच्या ढाच्यावर या कथा बेतल्यासारख्या वाटू शकतील. पण, एक मूलभूत फरक आहे. आर. के. नारायण प्रामाणिकपणे त्यांना दिसलेल्या / अभिप्रेत असलेल्या खेडेगावाबद्दल, त्यातल्या माणसांबद्दल लिहितात. प्रसंगी त्यात भोळसटपणाचा (Naivety) दोष असला, तरी दिखाऊपणाचा आणि कृत्रिमतेचा दोष मात्र नारायण यांच्या पदरी बांधता येत नाही. ते त्यांना भावलेली कथा सांगत होते, कोणत्याही ‘बाजारपेठे’साठी त्यांना हवं ते लिहीत नव्हते. अडिगांबाबत मात्र असं म्हणणं कठीण आहे. अडिगांची लेखनशैली चार्ल्स डिकन्सच्या पद्धतीने गरीब – श्रीमंतांतला भेद ठळक बटबटीतपणे दाखवते. डिकन्सबाबत हे चालून गेलं, कारण तो एकोणिसाव्या शतकात लिहीत होता. इथे या बटबटीतपणाच्या मोहापायी पुढचे अनेक प्रमाद घडतात.

‘बिटविन द अॅसॅसिनेशन्स’मधल्या कथा आणि ‘व्हाइट टायगर’ ही बुकर विजेती कादंबरी या दोन्हींबद्दल साकल्याने पाहू. बटबटीतपणाचा दोष दोन्हीकडे आहे. म्हणजे कोणताही प्रसंग, धागा, मुद्दा सूचक ठेवायचा नाही. तो शक्य तितका पिळून त्यातून नाट्यमयतेचा रस काढायचा. असं नाट्य घडवण्यासाठी विशिष्ट प्रकारची पात्रं लागतात. ती शक्यतो दुरंगी हवी; नायक किंवा खलनायक यात मोडणारी. ती शक्य तितकी ठोकळेबाज असल्यास उत्तम; म्हणजे वाचकाच्या अपेक्षेप्रमाणे ती वागतात आणि ते नाट्य पेलून धरणं कथानकाला शक्य होतं. कथानकात नाट्य निर्माण करणं लेखकासाठी व्यसनासारखं असतं. एकदा सवय लागली की सुटता सुटत नाही. अडिगाच नव्हे, तर अनेक लेखक या सापळ्यात अडकतात.

कथेत काही ‘घडत’ नसेल, तर ते अस्वस्थ होऊन बळेच काहीतरी ‘घडवतात’ आणि एकंदर कृत्रिमतेत भर घालतात. या ‘घडवण्या’साठी चावून चोथा झालेल्या क्लृप्त्या वापरल्या जातात. ‘व्हाइट टायगर’ ही कादंबरी अशिक्षित नायकाने चीनच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रांतून उलगडत जाते. हा नायक चहाच्या ठेल्यावर वेटरचे काम करताना ग्राहकांच्या संवादांतून व्यवहारज्ञान शिकत जातो. धनिक पण क्रूर मालकांच्या तावडीतून स्वतःची चमत्कारिक पद्धतीने सुटका करून घेत, स्वतःचा यशस्वी धंदा देशाच्या दुसऱ्या टोकाला उभारतो. अडिगा अनेक पातळ्यांवर आपल्या पाश्चिमात्य (आणि मॉलमध्ये जाणाऱ्या शहरी भारतीय) वाचकवर्गाला खूषच खूष करून टाकतात.

अडिगांची बलस्थानेही दुर्लक्षित करायला नकोत. भारतात अनेक पातळ्यांवर जाणवत राहणाऱ्या आणि शहरांमध्ये भांडवलशाही कॉर्पोरेट रूप धारण केलेल्या जातिवादावर अडिगा चरचरीत शरसंधान करतात. त्यांची पात्रं गरिबीतून निर्माण होणाऱ्या संताप आणि हतबलतेने प्रेरित होतात. पण, ती ठरल्यासारखी साचेबद्ध वागतात, हाच काय तो दोष!

(संपर्क – aadubaal@gmail.com)



Source link