पाय काढायची भाषा खपवून घेणार नाही : खा. रणजितसिंह ना. निंबाळकर | पुढारी

0
20


फलटण, पुढारी वृत्तसेवा : बापजाद्यांनी काढलेला कारखाना स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन चालवत आहात. कारखाना तुमच्या खाजगी मालकीचा नाही. तो शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे. त्या शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ, अशी तुमची अपेक्षा असेल तर मुळीच घेणार नाही. विश्वासराव भोसले यांच्या केसाला धक्का लावून दाखवा. फलटणची जनता तुमच्या कमरेला लंगोटी सुद्धा ठेवणार नाही, इशारा खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजे ना. निंबाळकर यांना पत्रकार परिषदेत दिला.

श्रीराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत विश्वासराव पायात पाय घालाल तर पाय काढला जाईल, असा इशारा आ. रामराजेंनी जाहीर सभेत दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजे यांना प्रति आव्हान दिले आहे. यावेळी प्रल्हाद साळुंखे, जयकुमार शिंदे उपस्थित होते.

खा. रणजितसिंह म्हणाले, श्रीरामच्या सभेत स्वतःला फलटणचे अधिपती म्हणवून घेणार्‍या रामराजेंनी निवृत्त आयएएस अधिकारी विश्वासराव भोसले यांचे पाय काढले जातील, अशा प्रकारची भाषा केली. मी कधीही श्रीराम कारखान्याच्या कारभारावर किंवा कुठल्याही विषयावर आजपर्यंत बोललो नाही. सहकारामध्ये राजकारण नको म्हणून आम्ही जाणीवपूर्वक टाळत आलो. कुठलीही सहकारी संस्था अडचणीत आणण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. आम्ही नव्याने संस्था उभारल्या, चालवल्या पण जी संस्था स्वतःची नाही जी संस्था शेतकर्‍यांच्या मालकीची आहे त्या शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही जाहीरपणे करत असाल आणि आम्ही ते खपवून घेण्याची तुमची अपेक्षा असेल तर असं मुळीच होणार नाही.

स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन बापजाद्यांनी काढलेले कारखाने दुसर्‍याला चालवायला द्यायचे. गेल्या पंधरा वर्षात त्या कारखान्याचा हिशोब नाही, कर्ज किती आहे ते माहिती नाही. जमिनी विकल्यानंतर कर्ज किती आहे ते माहिती नाही. कारखान्याला मिळणारे वार्षिक उत्पन्न किती? सगळा भोंगळ कारभार आहे. ज्या कारखान्याला 12 ते 13 कोटी भाडे मिळायला पाहिजे. तेथे आम्ही ऐकतो सुरुवातीला दहा कोटी केले, नंतर पाच कोटी, आता तर 50 लाखच केलेत. दोन कोटी पैकी दीड कोटी त्यांना व्याजाचे द्यायचेत. अहो एखादा पेट्रोल पंप सुद्धा लोक त्याच्यापेक्षा जास्त किंमतीला चालवायला देतात. इथे पैशाचा भ्रष्टाचार होतोय हे न कळण्या इतकं आम्ही दूधखुळे आहोत का? शेतकर्‍यांनी दराविषयी बोलणं, दर मागणं हा शेतकर्‍यांचा हक्क आहे. कारखाना तुमच्या मालकीचा नाही. पाय काढण्याची भाषा जर तुम्हाला करायची असेल तर स्वतःच्या मालकीचा कारखाना काढा. स्वराजवर बोलण्याचा तर तुम्हाला मुळीच अधिकार नाही. स्वराज कारखाना गेले अनेक वर्ष श्रीराम पेक्षा जादा दर देत आहे.

कोणतीही पार्श्वभूमी नसताना हिम्मतीने आम्ही कारखाना उभा करुन तो चालवत आहोत. हा कारखाना तालुक्यातील सर्वात मोठा कारखाना आहे. तसेच देशामधला सर्वात मोठा डिसलरीचा प्रकल्पही स्वराज कारखान्याचाच आहे. दरही जास्त देतो, पेमेंटही देतोय. तुम्हाला बँक, चालवता आली नाही, दूध संघ बंद पाडला, खरेदी विक्री संघ बंद पाडला. साखरवाडीचे वाटोळे केले. तासगावकरांना कारखाना काढू दिला नाही. मी कारखाना काढतो म्हणून गेली अनेक वर्ष फलटणला फसवले. तुम्हाला नेमकं खुपतंय तरी काय? स्वतः काही करायचं नाही. करतोय त्याला करू द्यायचं नाही. मागे स्वराज कारखान्याच्या बाबतीतही प्रांताधिकार्‍यांना हाताला धरुन कारखाना बंद करण्याच्या उलाढाली केल्या. माझ्या विरोधात अनेक राजकीय षड्यंत्र करत असता, त्या षडयंत्राला मी अजिबात भीक घालत नाही. तुमच्यात जेवढा दम आहे तेवढी षडयंत्र करत रहा. माझ्या विरुद्ध षडयंत्र करताल ती सर्व सामान्य लोकांना चालतील असं नाही.

तालुक्यात मी तीन वर्षांमध्ये विकास कामांसाठी भरीव योगदान दिले आहे. निरा देवघरचे टेंडर झाले, त्याची काम चालू होतील. धोम-बलकवडी बारमाही करण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण बारामती रेल्वेचे काम चालू झाले आहे. फलटण-पुणे रेल्वे चालू झाली. फलटण-बारामती, आदर्की-फलटण रस्त्याचे काम चालू झाले आहे. 50 हजार कोटी रुपयांच्या पालखी मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. शेकडो कोटींची कामे या तालुक्यात आणली आहेत. एवढे वर्ष तुम्ही मंत्री होता, तुमच्यात हिम्मत होती, तर तुम्ही ही सर्व कामे करून दाखवायची होती ना? मी स्वतःहून कधी बोलत नाही. माझ्यावर बोलणार्‍याला सोडत नाही, असा इशाराही खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी दिला.

तुमचा कारभार पारदर्शक तर तुम्हाला गुंड कशाला पाहिजेत…

सर्व सामान्य शेतकर्‍यांच्या मुलांना दर, हिशोब मागण्याचा अधिकार आहे. कारखान्याचा मालक म्हणून बसण्याचा अधिकार आहे. 15 वर्ष तुम्ही दादागिरी करून सभा घेतल्या. तुमचा कारभार पारदर्शक असेल तर तुम्हाला गुंड कशाला पाहिजेत. शेजारील माळेगाव-सोमेश्वर कारखान्याचा कारभार बघा. त्यातून शिका, आदर्श कारभार करा आणि सुसंस्कृतपणा दाखवा, असा टोलाही खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी लगावला.



Source link