देश – परदेश: परक्या भूमीतील लाल दिवे

0
20
देश – परदेश:  परक्या भूमीतील लाल दिवे


ज्ञानेश्नर मुळे6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या फक्त अमेरिकेपुरत्या मर्यादित नाहीत. विदेशात गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अगणित समस्या असतात. नवा देश, परकी भाषा, वेगळे लोक, आगळी विचारपद्धती आणि जीवनशैली या गोष्टी त्यांना सतावतात. त्यातून त्यांचे मानसिक ताणतणाव वाढत जातात…शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाणारे भारतीय आणि त्यांच्या समोरच्या अडचणींचा दोन भागांत घेतलेला वेध.

केल्याने देशाटन,

पंडित मैत्री, सभेत संचार,

शास्त्र ग्रंथ विलोकन,

मनुजा चातुर्य येतसे फार।

कवी मोरोपंतांच्या या ओळी आजच्या युगातही सार्थ वाटतात. जग जवळ येत चालले आहे, तसेच आपणही जगाच्या जवळ जात आहोत. एकेकाळी समुद्रपर्यटन केल्यावर प्रायश्चित्त करायला लावणारा आपला समाज आज परदेशी जाण्यासाठी धडपडतोय. त्यासाठी अभ्यास करतोय, देवाची मनधरणी करतोय आणि जायचे ठरले की पेढे वाटतोय. आपण गेलो नाही, तर आपल्या मुलांनी विदेशात जावे, अशी आकांक्षा मध्यमवर्गातील बहुसंख्य लोक बाळगून आहेत. मोरोपंतांच्या ओळी सार्थ असल्या, तरी विदेशात गेलेल्या व्यक्तींच्या संघर्षाचा, त्यांना तिथे भेडसावणाऱ्या समस्यांचा बोध मात्र त्यातून होत नाही. स्वत:च्या अनुभवातून आणि निरीक्षणातून मी असे म्हणू शकतो की, विदेशात जाणे सोपे असले, तरी तिथले जगणे शाप किंवा वरदान काहीही ठरू शकते. या भागात आपण त्यावर विचार करू.

खरे तर सगळेच लोक स्वेच्छेने विदेशात जातात असे नव्हे. जायला भाग पाडणारे जसे काही घटक असतात, तसे जाण्याचे आकर्षण वाटावे, असेही काही घटक असतात. उदा. अनेक कामगार, स्त्रिया आणि काही वेळा मुलांनाही त्यांच्या मनाविरुद्ध फूस लावून किंवा धमकावून गुलामीचे जीवन जगण्यासाठी विदेशात पाठवले जाते. या विरुद्ध शिक्षणासाठी, नोकरी वा उद्योग-व्यवसायासाठी आणि मुख्य म्हणजे ‘कुंपणापलीकडचे सुंदर जग’ जगण्यासाठी लोक विदेशात जातात. विशेषत: अमेरिका, इंग्लंड अशा देशांत जाण्यासाठी अनेक जण एजंटांना पैसे देतात. अनेक जण घर आणि शेत विकून, सर्वस्व पणाला लावून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अवैधपणे, कधी कधी गोठवणाऱ्या थंडीत कित्येक तास ट्रकमध्ये बसून किंवा तासन् तास बर्फात चालून अमेरिकेत वा युरोपात सीमा पार करुन घुसण्याचा प्रयत्न करतात.

जगभरात साधारणत: ३० कोटी लोक अशा देशांमध्ये राहतात, जिथे त्यांचा जन्म झालेला नाही. ९० च्या दशकात २.८८ टक्के लोक आपल्या देशाऐवजी विदेशात राहात होते. २०१९ पर्यंत हे प्रमाण ३.६ टक्क्यांपर्यंत वाढले. विदेशात जाऊन वास्तव्य करु पाहणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे.

आज कुठून सर्वाधिक लोक विदेशात जाताहेत? सुमारे साडेतीन कोटी भारतीय विदेशात वास्तव्य करीत आहेत. यातील सव्वाकोटी लोक अशा लोकांचे वंशज आहेत, ज्यांचे २० लाख पूर्वज ब्रिटिशांनी शेतमळ्यातील मजूर म्हणून १८३४ ते १९१७ पर्यंत मॉरिशस, श्रीलंका, मलेशिया, फिजी, त्रिनिदाद, गयाना, टोबॅगो अशा २१ देशांत पाठवले होते. स्वातंत्र्योत्तर काळात विदेशात जावून स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या साधारण दोन कोटींच्या आसपास आहे. शिक्षण, नोकरी याशिवाय स्वदेशातील राजकीय त्रास, युद्ध किंवा युद्धसदृश परिस्थिती, आर्थिक विपन्नता, नैसर्गिक संकटे यामुळेही अनेक देशांतील लोक देशांतर करतात. या व्यतिरिक्तही विविध कारणांनी विस्थापित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी आयोगाच्या मते, २०२२ मध्ये जगभरात ३.५ कोटी विस्थापित लोक होते.

भारतामध्येही विदेशात जाण्यासाठी अनेकांची धडपड असते. यातील काही ट्रेंड चिंताजनक असले, तरी त्याबाबत फारशी चर्चा होत नाही. २०२१ मधील ४ लाख ४४ हजार ५५३ विद्यार्थ्यांच्या तुलनेत २०२२ मध्ये ६८ टक्के अधिक म्हणजे ७ लाख ५० हजार ३६५ भारतीय विद्यार्थी अन्य देशांमध्ये गेले. साधारणपणे २१ लाख विद्यार्थ्यांचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आणि त्यासाठी वर्षाला प्रत्येकी एक कोटीचा खर्च गृहीत धरला तर दरवर्षी सुमारे २० लाख कोटी रुपये भारतातून विदेशात जातात. हे फक्त मुलांच्या शिक्षणासाठी. एकतर युवा पिढीचा भारतातील शिक्षण पद्धतीवर विश्वास नाही किंवा इथे करिअरला वाव नाही, असा याचा अर्थ काढता येईल का? मध्यमवर्गीय पालक विनाकारण हा आर्थिक बोजा आपल्यावर का लादून घेताहेत? आपल्या शिक्षण पद्धतीत नेमक्या काय उणिवा आहेत ज्यामुळे विदेशाचे इतके आकर्षण वाटावे? विश्वमंचावर वेगाने स्वत:चे आगळे स्थान निर्माण करत असलेल्या भारतातील ही ‘युवासंपदा’ मात्र विदेशात स्वत:चे भवितव्य का घडवू इच्छिते? या प्रश्नांतून भविष्यातील भारताविषयी चिंता निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.

विदेशातील वास्तव्याची सोनेरी स्वप्ने – महागडी कार, प्रशस्त बंगला – अशा कल्पनाविलासाला वास्तवाचा आधार किती आहे? माझ्याकडे दर आठवड्याला किमान २-३ विद्यार्थ्यांचे पालक अशा तक्रारी घेऊन येतात. अलीकडेच बोस्टनमध्ये अभिजीत पारुचरु या आंध्रातील विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाल्याची बातमी आली. या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत एकट्या अमेरिकेत अशा प्रकारे सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. याची गंभीर दखल घेऊन वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या पुढाकाराने अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांसोबत ऑनलाइन बैठका घेऊन, तेथील वास्तव्यात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन केले गेले. पण, भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या फक्त अमेरिकेपुरत्या मर्यादित नाहीत. २०२१ च्या आकडेवारीनुसार, साधारण १० लाख भारतीय विद्यार्थी विदेशात आहेत. पण, ही आकडेवारी विश्वासार्ह वाटत नाही किंवा हे फक्त एका वर्षाचे आकडे असावेत. विद्यार्थी साधारणत: दोन – तीन वर्षे तरी अभ्यासाला देतात. त्यामुळे एकूण वीस लाख भारतीय विद्यार्थी विदेशी असण्याची शक्यता आहे. युक्रेन – रशिया युद्ध सुरू झाले तेव्हाच सगळ्यांना कळले की युक्रेनमध्ये २५ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. जगातील ८५ देशांत भारतीय विद्यार्थी आहेत. त्यात अगदी कझाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत आपल्याला विश्वास बसणार नाही असे देशही आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांच्या अगणित समस्या असतात. नवा देश, परकी भाषा, वेगळे लोक, आगळी विचारपद्धती आणि जीवनशैली या गोष्टी भारतीय विद्यार्थ्यांना सतावतात. त्यातून त्यांचे मानसिक ताणतणाव वाढत जातात. प्रत्येकाला तिथले हवामान किंवा अभ्यास पद्धती मानवतेच असे नाही. काही जण चुकीच्या मार्गाला लागून कायद्याच्या कचाट्यात सापडतात. परवाच चीनमधील एका भारतीय विद्यार्थ्याच्या आईने माझ्याशी संपर्क केला. त्यांच्या मुलाला चीनमध्ये अटक झाली आहे. आई कशीबशी एकटी चीनमध्ये पोहोचली. मुलाने आपला गुन्हा अंशत: मान्य केल्याने शिक्षा होणे अटळ आहे. अशावेळी दूतावासाच्या मदतीवरही मर्यादा येतात. या आणि अशा प्रकारच्या तक्रारी मी नियमितपणे ऐकत असतो. पण, प्रत्येक तक्रारीचे निवारण होणेही शक्य नसते. एकूणच, दूरवरच्या लखलखत्या देशाचे, तिथल्या चमकदार संधींचे आणि सुखवस्तू जीवनशैलीचे प्रत्येकाला आकर्षण असते. पण, तिथे जाण्यापासून ते तिथल्या वास्तव्यापर्यंत पावलापावलावर असे धोक्याचे लाल दिवेही लुकलुकत असतात. ते वेळीच ओळखता आले पाहिजेत.

(पूर्वार्ध)

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link