
Don’t Take Any Medicine Without Doctor’s Advice: हिवाळा ऋतु गुलाबी थंडीसह अनेक आजारही सोबत घेऊन येतो. यावेळी सर्दी आणि खोकला या सामान्य आजारांना सर्वांनाच सामोरे जावे लागते. अशात हवेतील प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे संक्रमण वाढले आहे. ज्यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. अनेकजण ‘अशा साधारण सर्दी-खोकल्यासाठी दवाखान्यात कशाला जायचं’ असा विचार करतात, आणि जवळच्या मेडिकलमधून काही ठराविक औषधे घेतात. पण तुम्हाला माहित आहे का? की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे काहीवेळा तुमच्या जीवावरही बेतू शकतात. यामुळे आरोग्यास कोणते गंभीर धोके होऊ शकतात? हे जाणून घ्या आणि वेळीत सावध व्हा.
कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे का आहे आवश्यक?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुकीची औषधे घेतल्यास साधारण सर्दी खोकलाही हृदयविकार, मेंदू, लिव्हर आणि मूत्रपिंडाच्या गंभीर समस्येचे कारण बनू शकते. या औषधांमध्ये कंजेस्टंट्स, अँटीहिस्टामाइन्स, खोकला आणि वेदना कमी करणाऱ्या गोळ्यांचा किंवा कफ सिरपचा समावेश असतो. काहीवेळा घरात पूर्वीच्या उरलेल्या औषधांचा साठा असल्यास सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसताच लगेचच त्या औषधांचे सेवन केले जाते. या औषधांमुळे काही प्रमाणात आराम तर मिळतो. पण अतिप्रमाणात घेतल्यास उलट परिणाम होऊन औषधे बाधू शकतात.
आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतील?
डेक्स्ट्रोमेथोर्फन सारखे खोकला कमी करणारे औषध अतिप्रमाणात घेतल्यास त्याचा मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे चक्कर येणे, मती गोंधळल्या सारखी होणे, असामान्य वर्तन आणि मूड स्विंग्स होऊ शकतात. तसेच ताप असल्यास सर्वात अधिक पॅरासिटामॉल आणि डोलो यांसारख्या औषध गोळ्या घेतल्या जातात. पण जर तुम्ही आधीच इतर औषधे घेत असाल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिप्रमाणात या गोळ्या घेतल्या तर त्या यकृत आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकतात. काही प्रकरणांमध्ये यामुळे पोटात रक्तस्त्राव होणे, हृदयविकाराचा धोका वाढणे अशा जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.
इतरांनाही सावध करा!
यामुळे कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. तसेच कोणत्याही औषधांचे सेवन अतिप्रमाणात करू नका. यामुळे तात्पुरता आराम मिळेल पण आयुष्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच ही बातमी तुमचे कुटुंबिय आणि जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. वेळीच सावध व्हा!
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)







