डायरीची पाने: पेरणीचे दिवस

0
22
डायरीची पाने:  पेरणीचे दिवस


इंद्रजित भालेराव9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पेरणी हा एक धार्मिक विधीच असल्यामुळं त्याचे काही नियम होते. त्या काळात काही पथ्य पाळणं आवश्यक असायचं. ती सगळी पथ्ये शेतकरी आवर्जून पाळायचा.

कधी नव्हे तो यावर्षी मृग बरसतो आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत असा मृग कधी बरसला नव्हता. मृगातल्या पेरण्या झालेल्या नव्हत्या. मिर्गी पेर होणं ही दुर्लभ गोष्ट समजली जायची. अशी मिर्गी पेर व्हायची, त्यावर्षी सुगी उधाणून यायची. शेतकरी आनंदीत व्हायचा. यंदा तशी वेळ आली आहे. यावर्षीचं हे असं मृगातलं वातावरण पाहून मला माझीच, अगदी सुरूवातीच्या काळातली, १९८७ मध्ये लिहिलेली कविता आठवायला लागली…

गुज बोले गुज बोले

गुज मिरोग बोलला,

तेला पाणी लावा काव

आता तिफणी उचला।

जुन्या काळी दिनदर्शिका किंवा पंचांग उपलब्ध नसायचं. त्यामुळं त्या काळात मृग निघाल्याचं कसं समजायचं? तर घरात मिरगाचा किडा निघायचा. तो विशिष्ट किडा पाहिला की, सगळ्यांना आनंद व्हायचा. ‘मृग निघाला, मृग निघाला..’ असं सगळे एकमेकांना आनंदानं सांगायचे. तो किडा मृगाचा संदेश घेऊन आलेला असायचा, शुभ समजला जायचा. घराच्या कोपऱ्यात बसलेल्या त्या किड्याकडं सगळे कौतुकानं पाहायचे. आई त्या किड्यावर कुंकू वाहायची. मिरगाची पूजा करायची. वरील कवितेत गुज बोले, गुज बोले हा शब्द आलेला आहे. तो त्या किड्यासाठीच आहे. मिरोग असं ग्रामीण भागात त्या किड्याला म्हणतात. त्याला मिरगाचा किडा असंही म्हटलं जातं. तो जणू गुज म्हणजे कानात सांगत असतो की, आता तिफणी उचला आणि पेरायला लागा.

तिफण उचलणे हा एक खास प्रकार आहे. कधीही तिफण घरून बैल लावून शेताला नेली जात नाही. मुळामध्ये तिफण हे काही वर्षभर लागणारं इखन म्हणजे औजार नाही. पावसाळ्याच्या सुरूवातीला पेरणी करण्यासाठीच ते लागतं. त्यामुळं ते त्याच काळात तयार केलं जातं. खाली फण बसवले जातात. वर नळे बसवले जातात. त्याच्यावर मोघं बसवलं जातं. आणि पेरणीची यंत्रणा म्हणजे तिफण तयार केली जाते. सुतारदादा आपल्या नेहावर हे सगळं तयार करून देतो. या काळात सगळेच शेतकरी त्याच्याकडं गर्दी करतात. सगळ्यांची गडबड सुरू असते. सुतारदादा रात्रंदिवस काम करून या तिफणी तयार करून देत असतो. तयार केलेली तिफण बैल लावून शेताला न नेता ती खांद्यावर उचलून नेली जाते. तिफणीचं जणू लग्न सुरू आहे, ती जणू नवरी आहे, असं समजून तिच्यावर पीतांबर झाकला जातो. तिची पूजा केली जाते.

नवरीची डोली उचलून न्यावी, तशी ती तिफन खांद्यावर उचलून शेताला नेली जाते. तिथंही विधिपूर्वक पूजा केल्यावर तिला बैल जुंपले जातात. आणि मग पेरणी सुरू होते. पेरणी हा एक विधीच आहे आणि तो विधिवत झाला पाहिजे, अशी श्रद्धा एकेकाळी सगळ्या शेतकऱ्यांची होती. म्हणूनच मी माझ्या कवितेत लिहिलं होतं…

तिफणीला घाला साज

तिला नवरी नटवा,

लया दिसाची घरात

तिला सजन भेटवा।

तिफणीला घाला साज

तुम्ही बैराग भोगावा,

भाकरीला लागू कुखू

रात शेतीच जागवा।।

पेरणी हा एक धार्मिक विधीच असल्यामुळं त्याचे काही नियम होते. त्या काळात काही पथ्य पाळणं आवश्यक असायचं. ती सगळी पथ्ये शेतकरी पाळायचा. तिफणीला साज घातला आणि तिला नवरीसारखं नटवलं असलं, तरी तिफण हाकणाऱ्याने मात्र त्या काळात बैराग भोगायचा असतो. म्हणजे काय? तर पेरणी सुरू असेपर्यंत त्यानं आपल्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवायचा नाही. जसं बहिणीची सोयरीक झाल्यापासून विवाह होऊन ती नांदायला जाईपर्यंत तिच्या भावानं आपल्या स्त्रीशी संबंध ठेवायचा नसतो, तसंच हे तिफणीच्या बाबतीतही समजलं जात होतं. म्हणून तिफणीला साज घालायचा, पण आपण बैराग भोगायचा. वर कवितेच्या ओळीत भाकरीला कुखू लागण्याचा संदर्भ आला आहे. तोही ग्रामीण भागातला एक संकेत आहे.

पूर्वी लग्न झाल्यानंतर कितीतरी दिवस नवरा आणि बायको एकमेकांना सार्वजनिक ठिकाणी बोलत नसत. वडीलधाऱ्या माणसांसोबत नवरी कधीच आपल्या नवऱ्याशी बोलत नसे. त्यामुळे त्या काळात आपल्या पतीने झोपायला घरी यावं, असा तिला निरोप सांगायचा असेल, तर तिनं काय करावं? त्यासाठी तिला घरातल्या अनुभवी बायका सांगायच्या की, तू शेताला जी भाकरी बांधून देशील, तिला कुंकू लावून देत चल.. त्या नवरदेवालाही दुसरीकडून ती अनुभवी बाई सांगायची की, बाबा रे, ज्या दिवशी तुझ्या भाकरीला कुंकू लागलेलं दिसंल, त्या दिवशी तू घरी झोपायला येत जा.. मी लहानपणी अशी दादाची भाकर घेऊन जायचो, तेव्हा दादा ती खायला बसला आणि त्याला कुंकू दिसलं की तो भलता आनंदित व्हायचा. त्याचा हा आनंद त्याच्या कामातही उतरायचा. शेतात नांगर इतका झन्नाट चालायचा की, दोन दिवसाचं वावर तो एका दिवसात नांगरून टाकायचा. असा तो संकेत आहे. पण, आता पेरणी सुरू आहे. म्हणजे तिफणीचं लग्न सुरू आहे. आणि हाकणारा तिचा भाऊ आहे. तेव्हा त्यानं भाकरीला कुंकू लागलं, तरी झोपायला घरी यायचं नाही. बैराग भोगायचा.

गर्दाबाजलं आभाळ

पाण्यापावसाचा जोर,

बइलाच्या पोटाखाली

घेऊ बसाया आधार।

दूरदूरचं शेत असतं. तिथं आखाडा, झोपडी नसते. आजूबाजूला कधी कधी झाडझाडोराही नसतो. अशावेळी पेरणीत अचानक पाऊस आला तर त्याचा मारा चुकवण्यासाठी बसायचं कुठं? तर आपल्या बैलाच्या पोटाशी हे जोडपं बसलेलं असायचं. तिफण हाकणारा आणि पेरणारी त्याची बायको असे दोघे जण त्या बैलाच्या पोटाखाली बसून पावसाचा मारा चुकवायचे. आजूबाजूला कुणी नसलं, तरी ती बाई आपल्या मालकाला लाजून थोडी दूरच बसायची आणि पलीकडून भिजायची. त्यामुळं तो तिला म्हणायचा…

अशी लाजू नको येडे

भिजू नको पावसात,

बस खेटून जवळ

नाही कोणाला दिसत।

पावसानं केला कोट

दिसंना की झाडझुड,

हाय माय बाळापाशी

करू नको अवघड।।

ती इथं बैलाच्या पोटाखाली आपल्या मालकाजवळ सुरक्षित बसलेली असली, तरी तिला आठवतं की, घरी आपलं लेकरू बाहेर खेळत असंल, अचानक आलेल्या पावसामुळं जनावरं उधळली असतील, आपलं लेकरू रस्त्यात खेळत असंल, तर त्याचं कसं होईल? अशी चिंता ती आपल्या धन्याजवळ व्यक्त करायची. तेव्हा तो तिला आठवण करून देतो की, घरी आई आहे, तिला त्याची काळजी आहेच ना? त्याची काळजी तू इथं बसून कशाला करतेस? आपण आईच्या भरोशावर त्याला सोडून आलो आहोत आणि आपल्यापेक्षा आईच त्याची काळजी घेत असते. शेवटी तो तिला म्हणतो…

उठ आता राणी

लाऊ नगस उशीर,

आडतास घेऊ आज

उद्या कशाला चक्कर।

हे दूरदूरचं शेत आहे. फार थोडं पेरायचं राहिलं आहे. तेवढ्यासाठी उद्या पुन्हा कशाला इकडं यायचं? म्हणून लवकर उठ आणि हा सगळा पेरा आपण आज उरकून टाकू. अगदी आडतासासह…

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link